क्रिकेट : ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट? | पुढारी

क्रिकेट : ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट?

निमिष वा. पाटगावकर

सन 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेश केला जाण्याची शक्यता आहे. मात्र ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष काय ठरवायचे आणि किती संघाना ऑलिम्पिक प्रवेश द्यायचा, याचे नियोजन करायचे करण्याचा अधिकार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आयसीसीला देईल का? हा प्रश्न आहे. बारा देशांचा विचार केला तरी त्यात गोंधळ आहे. सामन्याचा कालावधी कमी करावा लागेल. आयसीसीचे आर्थिक, तांत्रिक पाठबळ आणि ऑलिम्पिक समितीची इच्छाशक्ती यावरच खूप काही अवलंबून असेल.

नुकत्याच संपलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने उत्तम कामगिरी केली. ऐनवेळी ऑस्ट्रेलियासमोर कच खाल्ल्याने आपल्याला रजत पदकावर समान मानावे लागले. राष्ट्रकुल ही सहभागी देशांसाठी ऑलिम्पिकची पूर्व तयारी असते; तेव्हा राष्ट्रकुलच्या पाठोपाठ आता क्रिकेट ऑलिम्पिकमध्येही प्रवेश करणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. तसे बघायला गेले तर क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये प्रवेश 1900 सालीच झाला होता.

पहिल्यावहिल्या ऑलिम्पिकमध्ये तो 1896 सालीच तो होऊ शकला असता; पण इंग्लंड सोडून कुणी संघांनी भागच घेतला नाही. 1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला तेव्हा इंग्लड आणि फ्रेंच ऍथलेटिकक्लब हे दोन संघ स्पर्धेत उतरले होते. हा जो दुसरा फ्रेंच संघ होता, तो फ्रान्सचा नसून एक मिश्र संघ होता. 12 खेळाडूंच्या संघात 3 फ्रेंच, तर 9 ब्रिटिशच खेळाडू होते. थोडक्यात काय, तर ब्रिटनने आपलेच दोन संघ खेळवत सुवर्णपदक नक्की केले होते. यानंतर क्रिकेट ऑलिम्पिकच्या वाटेला पुन्हा फिरकले नाही.

राष्ट्रकुल म्हणजे ज्या देशांवर एकेकाळी ब्रिटिशांचे राज्य होते, ते सदस्य देश. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत 72 देश उतरले होते; पण राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक यात खूप अंतर आहे. जागतिक पटलावर दबदबा निर्माण करणारे अमेरिका आणि चीन राष्ट्रकुलमध्ये नसल्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या देशांचे फावते. क्रिकेटचा विचार राष्ट्रकुलसाठी झाला तरी ऑलिम्पिकसाठी क्रिकेट पुन्हा पात्र ठरण्यासाठी क्रिकेट जगताला खूप मेहनत करावी लागेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे(आयसीसी)ने 2017 च्या सुमारास क्रिकेट आता ऑलिम्पिक पुनरागमनासाठी तयार आहे, असे निवेदन करत ऑलिम्पिकसाठी तयारी चालू केली, असेही म्हणता येईल. सुरुवातीला बीसीसीआय आणि इंग्लिश क्रिकेट बोर्ड हे श्रीमंत सदस्य क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशासाठी उत्सुक नव्हते; पण आता त्यांचा विरोध मावळल्याने 2028 च्या लॉस अँजेलिस ऑलिम्पिकसाठी क्रिकेटच्या समावेशाची स्वप्ने आपण बघत आहोत.

क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यासाठी सर्वात प्रथम आयसीसीला तजवीज करावी लागेल, ती क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकात जागा निर्माण करण्याची. आयसीसी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक दर पाच वर्षांसाठी जाहीर करते आणि याच आठवड्यात त्यांनी 2023-27 चे वेळापत्रक जाहीर केले. या व्यस्त वेळापत्रकात आयपीएलसारखी प्रचंड उलाढालीची स्पर्धाच भरवायला जेमतेम वेळ मिळतो तेव्हा ऑलिम्पिकसाठी वेळ काढणे नक्कीच आव्हानात्मक असेल. यंदाच्या राष्ट्रकुलमध्येही पुरुष क्रिकेटचा समावेश होऊ शकला नाही कारण आयसीसीच्या वेळापत्रकात त्याची तजवीज नव्हती आणि कुठचेही वेळापत्रकातले दौरे रद्द करणे म्हणजे प्रचंड आर्थिक नुकसान.

वेळापत्रकाबरोबरच क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश व्हायची इच्छा असेल, तर सामन्याचा कालावधी कमी करावा लागेल. कसोटी आणि एकदिवसीय प्रकारचा समावेश होणे निव्वळ अशक्य आहे. ऑलिम्पिक समावेश आणि क्रिकेटची बाजारपेठ वाढवायच्या द़ृष्टीने क्रिकेटचा प्रसार करायचा, तर क्रिकेटच्या सामन्याचा कालावधी कमी आणि थरार जास्त, हे समीकरण अमलात आणणे ही काळाची गरज ओळखून आयसीसीने क्रिकेटमध्ये योग्य तो बदल केला. यातून ट्वेन्टी-ट्वेन्टी सामन्यांचा उदय झाला.

अबूधाबीत तर 10 षटकांची स्पर्धा होते आणि इंग्लंडमध्ये 100 म्हणजे एका डावासाठी 100 चेंडू अशी ट्वेन्टी-ट्वेन्टी पेक्षाही कमी वेळाची क्रिकेटची रूपे तयार झाली. आजच्या घडीला फुटबॉल हा निर्विवादपणे सर्वात लोकप्रिय खेळ आहे. 90 मिनिटांच्या थरारात प्रत्येक मिनीट उत्कंठावर्धक असते. फुटबॉलशी टक्कर घेण्यासाठी क्रिकेटचे हे संक्षिप्त रूप गरजेचे होते.

ऑलिम्पिकसाठी जरी साडेतीन तासांत संपणार्‍या ट्वेन्टी-ट्वेन्टी क्रिकेटचा विचार करायचा झाला तरी संघांवर मर्यादा असेल कारण पात्रता फेरी ते पदक फेरी यात फार अंतर नसते. आज आयसीसीचे 12 देश हे पूर्ण सदस्य आहेत, तर 94 देश हे सहभागी सदस्य आहेत. ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष काय ठरवायचे आणि किती संघांना ऑलिम्पिक प्रवेश मिळेल याचे नियोजन करायचे अधिकार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आयसीसीला देईल का? याचप्रमाणे या बारा देशांचा जरी क्रिकेटसाठी विचार केला तरी त्यात गोंधळ आहे.

ऑलिम्पिकमध्ये युनायटेड किंगडम हे ग्रेट ब्रिटन या एकाच नावाखाली स्पर्धेत उतरत असले तरी त्यात इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स या तीन देशांचे खेळाडू असतात.नॉर्दन आयर्लंडच्या खेळाडूंना एकतर ग्रेट ब्रिटनबरोबर किंवा आयर्लंडबरोबर ऑलिम्पिकमध्ये उतरायचा पर्याय असतो पण क्रिकेटचा विचार केला तर इंग्लंड, आयर्लंड हे पूर्ण वेळ सदस्य असलेले वेगवेगळे संघ आहेत; तर स्कॉटलंड हा सदस्य देश असून, त्यांचा वेगळा संघ आहे.

वेस्ट इंडिजबाबत तर अजून गोंधळ आहे. क्रिकेट जगतात वेस्ट इंडिज म्हणून एकाच नावाने खेळत असलेल्या क्रिकेट संघात तब्बल बारा कॅरिबियन बेटांमधले खेळाडू खेळू शकतात; पण हे बारा देश ऑलिम्पिकला स्वतंत्रपणे खेळतात. आताच्या राष्ट्रकुल स्पर्धेतही महिलांचा वेस्ट इंडिजचा संघ न उतरता बार्बाडोसचा संघ उतरला होता, जो या बारा देशांपैकी एक आहे. तेव्हा इंग्लंड आणि वेस्ट इंडिजला ऑलिम्पिकमध्ये खेळायचे असेल, तर काही वेगळे नियम करावे लागतील.

क्रिकेटचा प्रसार आज जरी अनेक देशांत होत असला तरी स्पर्धात्मक दर्जाचे क्रिकेट अजूनही या देशात पोहोचलेले नाही. मूळ भारतीय, पाकिस्तानी, ऑस्ट्रेलिया किंवा जिथे क्रिकेट उत्तम प्रस्थापित झाले आहे, अशा देशाच्या वंशाचे खेळाडू या सदस्य देशातून खेळताना दिसतात. त्यामुळे या सदस्य देशात प्रथा दर्जाच्या क्रिकेटच्या सुविधा, स्पर्धा यांचा अभावच आहे. आयसीसीचा क्रिकेट अमेरिकेत लोकप्रिय करण्याचा मोठा मनसुबा आहे. याच कारणाने नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेत फ्लोरिडाला ठेवले होते.

अमेरिकेत स्थायिक झालेले भारतीय हे भारतीय कलाकारांचे लाईव्ह करमणुकीचे कार्यक्रम किंवा क्रिकेट यांना भुकेले असतात, त्यामुळे वेस्ट इंडिजसारख्या दुबळ्या संघाविरुद्धच्या सामन्यांनाही मैदाने प्रेक्षकांनी भरली होती; पण यात बहुतांशी भारतीय वंशाचे प्रेक्षक होते. मूळ अमेरिकन लोकांत ब्रिटिशांचे क्रिकेट लोकप्रिय होणे हे दिवास्वप्न बघितल्यासारखे असेल. हे फ्लोरिडाचे मैदान, खेळपट्टी यथातथाच होते. 2028 चे ऑलिम्पिक लॉस अँजेलिसला आहे. तिथे लिओमॅग्नस क्रिकेट संकुल आहे, ज्यात चार मैदाने आहेत. आयसीसीने 2016 साली तिथे डिव्हिजन 4 स्पर्धा भरवली होती; पण जर ऑलिम्पिकसाठी 12 पूर्णवेळ सदस्य संघांनी मैदानात सुवर्णपदकासाठी खेळायची अपेक्षा ठेवायची असेल, तर खेळपट्ट्यांपासून बाकीच्या गोष्टींवर आतापासूनच मेहनत घ्यावी लागेल.

2024 पॅरिस ऑलिम्पिक किंवा 2028 चे लॉस अँजेलिसचे यजमान फ्रान्स असो अथवा अमेरिका, आयसीसीचे बहुतांशी देश सदस्य आहेत तेव्हा तिथे लीग क्रिकेट खेळले जाते. क्रिकेटची मैदाने आहेत. प्रश्न आहे तो ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा पुनर्प्रवेश करायचा झाला तर ऑलिम्पिक सुवर्णपदकाचा मान राखण्याच्या द़ृष्टीने इथे उत्तम खेळपट्ट्या आणि सोयीसुविधा कराव्या लागतील. जर इथे क्रिकेटचा प्रसार अपेक्षित नसला, तर यजमान देश हा खर्च उचलतील? राष्ट्रकुलमध्येही 2008 नंतर 2022 साली फक्त दुसर्‍यांदा क्रिकेटचा समावेश झाला. थोडक्यात, क्रिकेटचा ऑलिम्पिक पुनर्प्रवेश हा आयसीसीचे आर्थिक, तांत्रिक पाठबळ आणि ऑलिम्पिक समितीची इच्छाशक्ती यावरच अवलंबून असेल.

Back to top button