आंतरराष्‍ट्रीय : युक्रेनची ड्रोन आर्मी

आंतरराष्‍ट्रीय : युक्रेनची ड्रोन आर्मी
Published on
Updated on

अक्षय शारदा शरद

रशिया आणि युक्रेन यांच्यातले युद्ध गेले सहा महिने सुरू आहे. वेगवेगळ्या आघाड्यांवर युक्रेनला नामोहरम करायचा प्रयत्न रशिया करतो आहे; पण त्याला जशास तसे उत्तर देण्याचे युक्रेनने ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून युक्रेनने 'आर्मी ऑफ ड्रोन' नावाची मोहीम सुरू केली आहे.

रशिया-युक्रेनमधल्या युद्धाला अद्यापही पूर्णविराम मिळालेला नाही. गेली सहा महिने युक्रेनची अनेक शहरे रशियाकडून लक्ष्य करून बेचिराख केली जात आहेत. हल्ले होत आहेत. युक्रेनियनही लढत देतायत. रशियाला जशास तसे उत्तर देण्याची तयारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनीही केली आहे. झेलेन्स्की स्वतः आपल्या सैनिकांसोबत युद्धभूमीवर उतरून त्यांना आत्मविश्वास आणि बळ देण्याचा प्रयत्न करतायत.

रशियासारख्या महाशक्तीशी दोन हात करणे ही साधी गोष्ट नाही. युक्रेनची संसाधने कमी करण्यासाठी रशियाकडून प्रयत्न होत आहेत. दुसरीकडे युद्ध जिंकण्यासाठी युक्रेनही अनेक देशांची मदत घेत आहे. लष्करी पातळीवरही ती घेतली जातेय. अशाच एका मदतीसाठी सध्या युक्रेनने जगभरातल्या देशांना आवाहन केले आहे. त्यांच्याकडून आर्थिक मदत आणि जुने ड्रोन घेण्याची ही योजना आहे. त्यातून युक्रेनला ड्रोन आर्मी उभी करायची आहे.

25 जुलै 2022 ला युक्रेनचे उपपंतप्रधान मायखाइलो फेडोरोव यांनी 7.1 मिलियन डॉलरच्या करारावर सही केली. 'आर्मी ऑफ ड्रोन' नावाचा हा प्रकल्प आहे. याची घोषणा स्वतः युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी केली होती. त्यासाठी 'ग्लोबल डोनेशन एनिशिएटिव्ह' या नावाखाली जगभरातल्या देशांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

या देणग्या जमा करण्यासाठी युक्रेनच्या संरक्षण खात्याने 'युनायटेड 24' नावाची स्वतंत्र वेबसाईटही बनवली आहे. तिथल्या देणग्या थेट 'नॅशनल बँक ऑफ युक्रेन'मधल्या संरक्षण खात्यात हस्तांतरित केल्या जात आहेत. मदतीचे आवाहन केल्यावर पहिल्याच दिवशी 2.3 दशलक्ष डॉलरची मदत झाली. पुढच्या दोन आठवड्यांत ही रक्कम 10.9 दशलक्ष डॉलरवर पोहोचल्याचे युक्रेनच्या संरक्षण खात्याची आकडेवारी सांगते.

या आंतरराष्ट्रीय देणग्यांच्या माध्यमातून ड्रोनची देखभाल आणि पायलट प्रशिक्षणाच्या खर्चाचे नियोजन करण्यात येत आहे. आलेले हजारो ड्रोन हाताळण्यासाठी सैन्याची ऑपरेटिंग यंत्रणाही युक्रेनकडून उभी केली जात आहे. 150 लोकांना ड्रोन हाताळण्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे. हा आकडा लवकरच 500 पर्यंत घेऊन जायचे सरकारचे लक्ष्य आहे. त्यासाठी प्रशिक्षण केंद्रही उभे करण्यात आलेय.

25 जुलैला युक्रेनने पोलंडशी काही करार केलेत. मानवरहित हवाई वाहने खरेदी करणे हा त्यामागचा उद्देश होता. त्यासाठी 7.1 दशलक्ष डॉलर इतका खर्चही करण्यात आला. त्यातून 'मॅट्रिस 300 आरटीके'सारखा व्यावसायिक ड्रोन खरेदी करण्यात आला आहे. ज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अगदी तपशीलवार माहिती मिळवणारे थर्मल कॅमेराही आहेत. टेहळणी करण्यासाठी म्हणून सर्वोत्तम समजल्या जाणार्‍या '20 फ्लाय आय' या ड्रोनचा समावेशही यात आहे.

पोलंडसोबतच्या करारातून 'वॉर्मेट लोइटरिंग' युद्धसामग्री आणि नेमके लक्ष्यभेद करू शकणारे 20 ड्रोनही खरेदी करण्यात आलेत. यात सेन्सर आणि वेगवेगळे सॉफ्टवेअरही टाकण्यात आले आहेत. हे ड्रोन 5 ते 160 किलोमीटरपर्यंत उडू शकतील. त्यामुळे या ड्रोनच्या मदतीने रशियन सैन्याचा नेमका शोध घेणे शक्य होईल. तसेच ही माहिती आपल्या लष्करी अधिकार्‍यांपर्यंतही सहजपणे पोहोचवता येईल. त्यामुळे पुढचे संकट टळेल.

याशिवाय अमेरिकेने युक्रेनला सहजपणे मारा करता येतील असे 700 'स्विचब्लेड ड्रोन' दिलेत. तसेच दीर्घकाळ हवेत राहू शकतील असे 580 'फिनिक्स घोस्ट ड्रोन' देण्याचीही अमेरिकेची योजना आहे. काही किलोमीटरपर्यंत सहजपणे मारा करू शकतील, अशा छोट्या ड्रोनच्या शोधात युक्रेन आहे. त्यासाठी पोलंड, नॉर्वे, कॅनडा अशा देशांची मदत घेतली जात आहे.

युक्रेनियन सैन्याला मदत करणार्‍या 'कम बॅक अलाईव्ह फाऊंडेशन'नेही 300 ड्रोनची खरेदी केलीय. आपण स्वदेशी ड्रोन बनवत असल्याचे सरकारने संरक्षण खात्याच्या वेबसाईटवरून जाहीर केले आहे. त्यात जमिनीवरचा लक्ष्यभेद करू शकणारे पनीशरसारखे ड्रोन असतील. तसेच 'ए 1-एसएम फुरिया' आणि 'स्पेक्टेटर-एम 1' हे स्वदेशी बनावटीचे ड्रोनही बनवले जातील.

सध्यातरी युक्रेनला थेट हल्ला करू शकतील, असे हजारो ड्रोन घ्यायचेत. त्यातून रशियन सैन्याशी थेट भिडणे, आपल्या सैन्याचा जीव वाचवणे, हजारो किलोमीटर दूरपर्यंत लक्ष ठेवणे शक्य होईल. रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे युक्रेनला मोठ्या प्रमाणात महागडी मिसाईल आणि शस्त्रास्त्रे घेणे शक्य नाही. अशा वेळी हे ड्रोन युक्रेनसाठी फायद्याचे ठरतील.

रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पहिल्या टप्प्यात तुर्कस्थानने दिलेला 'बायरॅक्टर टीबी 2' हा ड्रोन युक्रेनसाठी फार फायदेशीर ठरला होता. या ड्रोनच्या मदतीने रशियाचे तोफखाने, बोटी, वाहने लक्ष्य करण्यात आली होती. त्यामुळे रशियाचे 1 अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याचे युक्रेनने म्हटले होते. अशाच प्रकारचे ड्रोन मिळवण्यासाठी युक्रेन प्रयत्नशील आहे.

ड्रोनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रशियाच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देणे युक्रेनला शक्य आहे. त्यासाठी 'बायकर माकिना'सारख्या ड्रोन बनवणार्‍या कंपन्या पुढे आल्यात. त्यांच्या अत्याधुनिक ड्रोनमुळे जीवितहानीही थोड्या फरकाने का होईना टाळता येईल. होणारे नुकसानही त्यामुळे कमी होईल.

रशियासोबतच्या युद्धात युक्रेनचे हजारो सैनिक मारले गेलेत. अशा वेळी या बलाढ्य शक्तीशी लढण्यासाठी ड्रोनची अत्याधुनिक यंत्रणा महत्त्वाची ठरेल. दुसरीकडे काही समस्याही येऊ शकतात. विशेषतः नीट सिग्नल न मिळणे ही ड्रोन हाताळणार्‍या ऑपरेटर समोरची मोठी समस्या असू शकते. शिवाय हे ड्रोन हाताळणारा प्रशिक्षित वर्गही कुशल असायला हवा. होणारे नुकसान हे आर्थिक आघाड्यांवर परवडणारे नसेल. त्यामुळे ड्रोन हाताळताना पुरेशी काळजी घ्यायला हवी.

गेले सहा महिने रशिया-युक्रेनचे युद्ध चालू आहे. युक्रेन 'नाटो'कडे झुकल्यामुळे मागच्या तीन दशकांपासून त्यांच्यातले संबंध बिघडलेत. एका प्रबळ आणि शक्तिशाली राष्ट्राशी दोन हात करायची भूमिका युक्रेनने घेतली आहे. जगातल्या अनेक देशांची युक्रेनला मदत मिळते आहे. विशेषतः अमेरिकेसारखे देश मदत करतायत. तर रशियाच्या लष्करी सामर्थ्याचीही जोरदार चर्चा आहे. दोन्ही देशांच्या लष्करी सामर्थ्याची तुलना केली, तर रशिया आपल्या लष्करावर 61.7 अब्ज डॉलर इतका खर्च करते. युक्रेनचे संरक्षण बजेट हे 5.4 अब्ज डॉलर इतके आहे. आजच्या घडीला रशियाकडे 9 लाख, तर युक्रेनकडे 2.10 लाख इतके सैनिक आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीतही रशियाच्या तुलनेत युक्रेन फार कमकुवत आहे. त्यामुळे रशियाला टक्कर देण्यासाठी युक्रेनने उतरवलेली ड्रोन आर्मी कितपत चालते हे येणार्‍या काळात कळेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news