Father's Day : जन्मदात्याचं ऋण | पुढारी

Father's Day : जन्मदात्याचं ऋण

अरुणा सरनाईक 

आईइतकेच वडीलही श्रेष्ठ असतात. जशी बाबांविना आई मुलांना त्यांची उणीव भासू देत नाही. तसेच वडीलसुद्धा प्रसंगी मुलांची आई होऊ शकतात. तितक्याच प्रेमाने मुलांचा सांभाळ करू शकतात. प्रेम शरीर मर्यादांच्या पलीकडे जाऊन सर्वव्यापी होतं, हेच खरंय! आज (19 जून) फादर्स डे. त्यानिमित्ताने…

आपली संस्कृती ‘मातृदेव भव! पितृदेव भव! गुरुदेव भव!’ असं सांगते. आपल्यासाठी या तीनही व्यक्‍ती देवस्थानी आहेत. जे आपल्याला जन्म देतात किंवा ज्यांच्यामुळे आपण या जगात आलेलो आहोत, त्यांच्याविषयी कायमच ऋणी राहणे, कृतज्ञता व्यक्‍त करणे किंवा कायमस्वरूपी कृतज्ञ राहणे, हीच आपली शिकवण आहे. यासाठीच ‘मदर्स डे’, ‘फादर्स डे’, ‘गुरुपौर्णिमा’ यांसारख्या दिवसांचे महत्त्व आजही कायम आहे. आज ‘फादर्स डे’च्या निमित्ताने मनात विविध प्रकारच्या भावनांचा कल्लोळ दाटला आहे. फक्‍त एक दिवस उत्साहात साजरा करून बाकीचे दिवस काय? हा विचार करणे गरजेचे आहे. आवर्जून सांगोवेसे वाटते की, आपल्या मातापित्यांचे सण मनात सतत जागृत ठेवावे, ही भावना केवळ 19 जून या दिवसापुरती मर्यादित न ठेवता सर्वदिवसव्यापी असावी. अर्थात, हाही दिवस आठवणीने साजरा करणार्‍या नवीन पिढीचे विशेष कौतुकच आहे!

पाश्‍चात्त्य देशातील एका मुलीने हा दिवस साजरा करण्याची परवानगी मागितली होती. त्याच्यामागे एक खास कारण होते. त्या मुलीला तीन बहिणी होत्या. तिच्या जन्मानंतर काही दिवसांतच तिच्या आईचे निधन झाले. आईच्या पश्‍चात तिच्या वडिलांनी त्या तीनही मुलींचा सांभाळ आईच्या मायेने केला. ती कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी वडिलांचा वाढदिवस ‘फादर्स डे’ म्हणून साजरा करावा, असा आग्रह तिने धरला. तिच्या भावनांचा आदर करीत अमेरिकन सरकारने तिला परवानगी दिली. तोच हा दिवस! असं म्हणतात, भावना, कृतज्ञता व्यक्‍त करायला देेश अथवा भाषा आड येत नाही. भावना या नेहमी सर्वव्यापी, देशव्यापी असतात. यामुळेच ‘फादर्स डे’ सर्व जगात साजरा केला जातो. तसं पाहू जाता, बंधुत्व भावनेनं जर सर्वांनी राहायचे ठरवले तर वर्षाचे सारे 365 दिवस उत्साहाचे समारंभाचेच होऊन जातील.

आई बाळाला 9 महिने पोटात वाढवते. तिच्या कष्टाला कोणतीच उपमा नाही. पण आज वडीलसुद्धा आईच्या बरोबरीने बाळाची काळजी घेताना दिसून येतात. आमच्या हॉस्पिटलमध्ये या प्रकारचा अनुभव मी नेहमीच घेत असते. बाळाचे आई-वडील एकमेकांची घेत असलेली काळजी कौतुकास्पद असते. बाळ तिच्या पोटात वाढतंय, जरा काही कमी जास्त झालं, जरा वेदना झाली तर त्याचे प्रतिबिंब बाळाच्या बाबाच्या चेहर्‍यावरदेखील दिसतं. हे असं एकमेकांत गुंतलेपण बघण्यात एक आनंद असतो.

शरीर आणि मानसिक एकत्व ही आजच्या तरुणाईनं जपलेली धरोहर आहे. बाळाचे आगमन ते जन्मोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. अशा वेळी आई श्रेष्ठ की बाबा? असा प्रश्‍नच उद्भवत नाही. आईइतकेच वडीलही श्रेष्ठ असतात. जशी बाबाविना आई मुलांना त्यांची उणीव भासू देत नाही. प्रसंगी ती दोन्ही भूमिका उत्तम प्रकारे पार पाडते. तसेच वडीलसुद्धा प्रसंगी मुलांची आई होऊ शकतात. तितक्याच प्रेमाने मुलांचा सांभाळ करू शकतात. प्रेम शरीर मर्यादांच्या पलीकडे जाऊन सर्वव्यापी होतं, हेच खरंय!

आपल्याकडे पित्यांनी जसा मुलांसाठी त्याग केला; तसाच कित्येकदा मुलांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्व सुखाचा त्याग केलेला आहे. राजपुत्र देवव्रत हा त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्याकाळी ‘फादर्स डे’ हा शब्द नव्हता. पण त्याने जो त्याग केला, त्याला आपल्याला असं म्हणता येईल की, भीष्म यांनी आजन्म ‘फादर्स डे’ साजरा केला.

राजा ययातीचा मुलगा पुरू यानेदेखील आपले तारुण्य पित्याला देऊन त्याचे वृद्धत्व घेतले. हा पितृत्व ऋणातून मुक्‍त होण्याचा मोठा प्रसंग आहे. राजा दशरथाचा वचनभंग होऊ नये म्हणून श्रीरामांनी वनवास पत्कारला. ही सारी उदाहरणे पित्यावरील अपार प्रेमाचीच आहेत ना? म्हणूनच म्हणतात ना, माता-पित्याचे ऋण फेडू म्हणता फिटत नाहीत. हा जरी जुना जमाना झाला तरी भावना, कृतज्ञता कधीच जुन्या होत नाही. त्या नित्य नवीन, अपरिवर्तनीय आहेत. प्रकटीकरण वेगवेगळे जरूर राहील, पण अर्थाचा मूळ गाभा बदलत नाही.

पण आज जग बदलतंय. व्यवहार बदलत आहेत. वाहत्या प्रवाहाचा रोख बदलतो आहे. जीवनमान यांत्रिक होऊ लागलंय. मनात असलं तरी बर्‍याचदा वेळ नसल्यामुळे काही गोष्टींवर बंधनं आलेली आहेत. घरचं एक तरी मूल परदेशात असतं, अशी आजची स्थिती आहे. अशा वेळी खूप पंचाईत होते. पण मोबाईल इंटरनेट याच्या माध्यमातून संपर्क साधला जातो.

म्हणूनच मग या दिवसांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्‍त होतं. धावपळीच्या जीवनात असे क्षण कधी येतात? कधीतरी सहजच वडिलांच्या हातावर हात ठेवून आपण बसलो आहे किंवा आईच्या मांडीवर डोकं ठेवलंय? तिच्या वृद्ध हातांचा खरखरता स्पर्श संध्याकाळी कधी अनुभवलाय? आज आपण आपल्या आई-वडिलांपासून तसंच आपल्या मुलांपासूनदेखील दूर होतोय. म्हणूनच आता विचार करू नका… ‘फादर्स डे’ला हे सर्व संपवून टाका. आपल्या आई-वडिलांना एक अख्खा दिवस गिफ्ट द्या! पूर्णवेळ त्यांच्यासोबत घालवा. अशासाठीच या दिवसांचं प्रयोजन असतं!

Back to top button