पर्यटन : बॉलीवूडला भुरळ तुर्कस्तानची | पुढारी

पर्यटन : बॉलीवूडला भुरळ तुर्कस्तानची

सुट्ट्या म्हटलं की, बॉलीवूड सेलिब्रिटींची पावलं मालदिवकडे वळतात. यावेळी मात्र हे ठिकाण मालदिव नाहीये, तर मध्यपूर्वेतला मोठा देश आणि आशिया आणि युरोपच्या सीमेवर असलेला ‘तुर्कस्तान’ आहे. मलायका अरोरा, मौनी रॉय, सारा अली खान, सुजैन खान या बॉलीवूडच्या सेलिब्रिटी मंडळींचे तुर्कस्तानमध्ये सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत. त्यामुळे त्यांच्या तुर्कस्तानमधल्या फिरस्तीची सगळीकडे चर्चा होतेय.

गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटनसाठी तुर्कस्तान चर्चेत आहे. भूमध्य समुद्रातल्या हवामानामुळे असंख्य पर्यटकांना तुर्कस्तान खुणावत राहतो. वैविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थितीमुळे हा देश सध्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र बनलाय. बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनाही या पर्यटन स्थळांनी मोहिनी घातलीय. तुर्कस्तानचं ‘इस्तंबूल’ शहर पर्यटनाचं महत्त्वाचं केंद्र आहे. इस्तंबूल मोठं आणि सर्वाधिक लोकसंख्येचं शहर म्हणून ओळखलं जातं. या शहरानं रोमन आणि ऑटोमन साम्राज्याच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. इथल्या तत्कालीन राज्यकर्त्यांनी इथं उभी केलेली शहरं, मागे सोडलेले स्थापत्यकला, वास्तुकलेचे नमुने आजही जगभरातल्या पर्यटकांना भुरळ घालतात.

सुलतान अहमद मशीद इस्तंबूलमधलं महत्त्वाचं ऐतिहासिक स्थळ आहे. या मशिदीच्या बाहेरच्या भिंतींना असलेल्या निळ्या रंगामुळे ही निळी मशीद म्हणून ओळखली जाते. ऑटोमन वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेली सहा मिनारांची जगातली ही एकमेव मशीद आहे. या मशिदीच्या मुख्य खोलीत अनेक घुमट आहेत.

आतमध्ये नैसर्गिक प्रकाश जावा म्हणून 200 पेक्षा अधिक काचेच्या खिडक्या आहेत. या मशिदीच्या बांधकामात स्थापत्यकलेच्या अनेक छटा दडल्यात. दर शुक्रवारी इथं इमाम भाषण देतात. ते देताना मशिदीच्या प्रत्येक कोपर्‍यातून ते भाषण स्पष्ट ऐकू जाईल, अशी व्यवस्था ही मशीद उभी राहताना करण्यात आलीय. जगातल्या 7 प्राचीन आश्‍चर्यांपैकी दोन आश्‍चर्ये तुर्कस्थानमधली आहेत. त्यातलं एक आश्‍चर्य म्हणजे आर्टेमिसचं मंदिर. आर्टेमिस ही ग्रीक देवता सर्वोच्च ग्रीक देव झ्यूस याची कन्या आणि आरोग्य, धनुर्विद्येचा देव अपोलोची जुळी बहीण होती. इसवी सन पूर्व 550 मध्ये बांधलेलं हे मंदिर आधुनिक तुर्कस्तानातल्या ‘इफेसूस’ या शहरात आहे. या मंदिराचे भग्‍नावशेष तुर्कस्तानच्या इफेसूसमध्ये पाहायला मिळतात.

दुसरं आश्‍चर्य असलेली हॅलिकार्नसस कबर ही तुर्कस्तानच्या सध्याच्या ‘बोर्डम’ शहरात आहे. मकबूलची कबर म्हणून ओळखली जाणारी ही कबर इसवी सन पूर्व 353 मध्ये बांधली गेली. राजा मॉसोलस याच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्याची पत्नी राणी आर्टिमिझियाने ही कबर बांधली होती. संगमरवरामुळे ती लक्षवेधक ठरली. ऐतिहासिक खाणाखुणा असलेल्या या वास्तू पाहायला दरवर्षी लाखो पर्यटकांची इथं रीघ लागते.
बाहेर कुठं फिरायला गेलं की, खरेदी आलीच. तुर्कस्तानच्या इस्तंबूलमधला ग्रँड बाजार जगातल्या मोठ्या बाजारांपैकी एक आहे. या बाजारामुळे तुर्कस्तानच्या ऐतिहासिक पाऊलखुणांची ओळख पर्यटकांना होते. या बाजारात जवळपास 64 गल्ल्यांमध्ये 4 हजारच्या आसपास दुकानं आहेत. तिथं 25 हजार लोक काम करतात.

या बाजारात वेगवेगळ्या ठिकाणांहून प्रवेश करण्यासाठी म्हणून 22 दरवाजे आहेत. इथं अगदी टेबल लॅम्पपासून ते कपडे, घड्याळं, अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेता येतात. जगप्रसिद्ध ब्रँडच्या पर्स आणि इतर अनेक वस्तू या बाजारात हमखास मिळतात. इथल्या वेगवेगळ्या लॅम्पवरची अगदी छोटी छोटी रंगबिरंगी कलाकुसर लक्ष वेधून घेते. या बाजाराला दरदिवशी तीन लाखांच्या आसपास लोक भेट देतात. त्यातून कोट्यवधींची उलाढाल होते, त्यामुळे हा बाजार आर्थिक घडामोडींचं केंद्र बनलाय. 16 व्या शतकात इथं आलेल्या भूकंपामुळे हा बाजार पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. पण त्यातून टर्किश लोकांनी ग्रँड बाजार पुन्हा उभा केला.

अनेक शहरांनी तुर्कस्तानच्या वैभवात भर घातलीय. ‘कप्पडोसिया’ हे असंच एक महत्त्वाचं शहर आहे. हे शहर तुर्कस्तानच्या अगदी मधोमध वसलंय. इथलं प्राचीन शहरांपैकी एक असलेलं इफेसूस शहर येशू ख्रिस्ताच्या आईचं उत्तर आयुष्यातलं निवासस्थान म्हणून ओळखलं जातं. हे तुर्कस्तानमधलं महत्त्वाचं सांस्कृतिक आणि व्यापारी केंद्र आहे. इथं ऐतिहासिक बंदरही आहे. यालाच लागून असलेल्या ‘मार्दिन’ शहरात अनेक प्राचीन घरं पाहायला मिळतात. त्यामुळे पर्यटक या शहराला आवर्जून भेट देतात. मार्दिनचाच एक भाग असलेलं ‘न्यू मार्दिन’ शहर इथल्या इमारतींच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलींसाठी ओळखलं जातं. तुर्कस्तानचं बोर्डम हे शहर राहण्या-जेवणासाठीची मोठमोठी हॉटेलं, क्लब यासाठी प्रसिद्ध आहे. निवांतपणा घालवण्यार्‍या पर्यटकांसाठी हे हक्‍काचं ठिकाण आहे. विशेषतः बोर्डममधला पारंपरिक टर्किश ब्रेकफास्ट खवय्यांमध्ये चर्चेचा विषय असतो. त्याचा तिथल्याच पारंपरिक पद्धतीने आस्वाद घेण्यासाठी अनेक खवय्ये इथं हजेरी लावतात.

तुर्कस्तानमध्ये ‘बाबाडग’ नावाचं एक प्राचीन शहर आहे. या शहरात असलेली ‘बटरफ्लाय व्हॅली’ पर्यटक आणि ट्रेकर्ससाठी आकर्षणाचं केंद्र आहे. इथं फूलपाखरांच्या 80 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. त्यामुळेच याला ‘बटरफ्लाय व्हॅॅली’ म्हटलं जातं. या व्हॅलीतली वेगवेगळ्या प्रकारची झाडं, निसर्गाच्या अदा मोहात पाडतात. त्यामुळे लोक इथं ट्रेकिंगलाही प्राधान्य देतात.

ज्यांना निसर्गाची वेगवेगळी रूपं पाहायची आहेत; त्याचा ‘याची देही, याची डोळा’ आनंद घ्यायचाय अशांसाठी ‘लायकियन वे’ नावाचं ठिकाण सगळ्यात चांगलं समजलं जातं. हा तुर्कस्तानमधला पायी प्रवासासाठी सगळ्यात लांब पल्ल्याचा रस्ता आहे. अनेक ट्रेकर्सना हे ठिकाण खुणावत असतं. तुर्कस्ताननं पर्यटनाच्या द‍ृष्टीने प्रयत्नपूर्वक काही पावलं उचलली आहेत. इथं मोठ्या प्रमाणात पर्यटक हे रशियातून येतात. जगभरातून ही संख्या वाढावी यासाठी इथलं सरकार सातत्याने काही प्रयत्न करतंय.

त्यात तुर्कस्तानचे संस्कृती आणि पर्यटन खात्याचे मंत्री मेहमत नुरी एरोसी यांनी जाणीवपूर्वक काही उपाययोजना आखल्यात. त्याचाच भाग म्हणून तुर्कस्तानमधल्या पर्यटनस्थळांची माहिती जगभरातल्या देशांना व्हावी म्हणून 140 देशांमध्ये प्रचार मोहीम राबवली गेलीय. 130 हून अधिक कंपन्यांचा समावेश असलेल्या युरोपातली आघाडीची प्रवासी संस्था ‘डीईआर टुरिस्टीक ग्रुप’ची एप्रिल 2022 मध्ये एक बैठक झाली होती. या बैठकीत एरोसी यांनी 2022 मध्ये तुर्कस्थानात 42 दशलक्ष पर्यटक येतील आणि त्यातून 35 अब्ज डॉलरचं उत्पन्‍न मिळेल, असं लक्ष्य ठेवलं होतं.

कोरोना काळातही तुर्कस्तानमधल्या पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यासाठी मागची दोन वर्षं सरकारने 22 देशांमध्ये तुर्की पर्यटन संवर्धन आणि विकास या नावाने वेगवेगळ्या परिषदांचं आयोजन केलं होतं. त्यातून देशातल्या पर्यटन स्थळांची माहिती जगभर पोहोचवली गेली. यावर्षी 140 देशांमध्ये इथल्या पर्यटनाच्या जाहिराती देण्यात आल्या. 2028 पर्यंत देशाला 120 दक्षलक्ष लोक भेट देतील आणि त्यातून 100 अब्ज डॉलरचं उत्पन्‍न आपण देशाला मिळवून देऊ, असा विश्‍वास एरोसी यांनी एका मुलाखतीत व्यक्‍त केला आहे.
अक्षय शारदा शरद

Back to top button