सिंहायन आत्मचरित्र : डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव | पुढारी

सिंहायन आत्मचरित्र : डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव मुख्य संपादक, दैनिक पुढारी

पाच नोव्हेंबर 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमाप्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहे, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

सामाजिक समतेची द्वाही

सामाजिक कार्याचं बाळकडू मला घरातूनच मिळालं. आबा सत्यशोधक चळवळीतून आलेले असल्यामुळे माझ्यावरही तेच संस्कार होणं अपरिहार्यच होतं. त्यामुळे त्याबर हुकूमच माझी वाटचाल होत राहिली.

‘धरिली तींच दिसती।
डोळां तींच दिसती।’

‘जे प्रिय होतं तेच मी चित्तामध्ये धारण केलं आहे आणि माझ्या डोळ्यांतही तेच दिसतं आहे.’
या अभंगातील तुकारामांची भावावस्था आणि माझी भावावस्था यामध्ये फारसा फरक नाही. विशेषतः दलित वर्गासाठी काम करीत असताना नेहमीच तुकारामांची ही मनोभावना माझ्या मनीमानसी गुंजत राहिली.

एक क्षण आत्मसाक्षात्काराचा :

असं म्हणतात, की कपिलवस्तू नगरीत भ्रमण करीत असताना, युवराज सिद्धार्थच्या द़ृष्टीस एक भणंग भिकारी, एक विकलांग वृद्ध, एक जराजर्जर रुग्ण आणि एक प्रेतयात्रा पडली आणि तो अंतर्मुख झाला. त्याला त्याच क्षणी कळून चुकलं, की आपलं सुख हे केवळ एक अपवाद आहे आणि जगात केवळ दुःखाचंच साम्राज्य आहे. तो क्षण सिद्धार्थसाठी आत्मसाक्षात्काराचा क्षण ठरला आणि त्याच क्षणी युवराज सिद्धार्थाचा ‘भगवान बुद्ध’ होण्याच्या प्रक्रियेनं जन्म घेतला.

मला वाटतं, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशा तर्‍हेने अंतर्मुख होण्याचा एक क्षण केव्हा ना केव्हा येतच असतो आणि तोच क्षण त्याच्या आत्मसाक्षात्काराचाही असतो, यात मुळीच शंका नाही. माझ्या जीवनातही असाच एक हृदयद्रावक क्षण येऊन गेला, की ज्यानं माझं जीवनच पालटून टाकलं.

1960 च्या सुमारातील गोष्ट. तो एक रविवार होता. साहजिकच मला शाळेला सुट्टी होती. त्या दिवशी आबांना मात्र एका महत्त्वाच्या कामासाठी कोल्हापूरबाहेर जायचं होतं. अर्थात, सकाळी जाऊन त्याच दिवशी संध्याकाळी ते परत येणार होते. असं एखादं काम निघालं आणि त्या दिवशी मला सुट्टी असेल, तर ते मला हमखास त्यांच्याबरोबर घेऊन जायचे. मीही आनंदानं जायचो. माझ्यासाठी ती पर्वणीच असायची म्हणा ना! त्या दिवशीही मी त्यांच्याबरोबर गेलो होतो.

आबांच्या बरोबरचा प्रवास म्हणजे माझ्यासाठी वैचारिक मेजवानीच असायची. त्यांच्याबरोबर फक्त गप्पाच व्हायच्या नाहीत, तर अनेक सामाजिक गोष्टीही ते मला उलगडून सांगायचे आणि वर म्हणायचे, ‘हे लक्षात ठेव बाळ! तुला हे ठाऊक असलंच पाहिजे.’

त्या दिवशीही आमची अशीच गप्पांची मैफील रंगली होती. सडक कच्ची असल्यानं आमची गाडीही सावकाश, हळूहळू पुढे जात होती. त्यामुळे गप्पांना भरपूर वेळ मिळाला होता. अशा तर्‍हेनं मी त्या प्रवासाचा आनंद घेत असतानाच अचानकपणे माझ्या द़ृष्टीला एक विदारक द़ृश्य पडलं.

रस्त्याशेजारीच असलेल्या एका आडावर गावातील काही महिला आणि पुरुष पाणी भरत होते. अर्थातच तो त्या गावचा पाणवठा होता; मात्र त्याचवेळी त्या पाणवठ्यापासून बर्‍याच अंतरावर पाणी भरण्याची भांडी, म्हणजे खापराची मडकी आणि डिचक्या घेऊन काही लोक त्या आडाकडे पाहत धुळीतच बसले होते. अंगावर पुरेसं वस्त्र नाही, काही जण तर सदरा आणि लंगोटवरच होते. अनेकांच्या कमरेला तर केवळ फाटके टॉवेलच गुंडाळलेले. त्यांच्यातल्या महिलांची स्थितीही तितकीशी चांगली नव्हती. जीर्ण, ठिगळं लावलेली लुगडी नेसून, त्या कशीबशी आपली अब्रू झाकून घेण्याचा प्रयत्न करीत होत्या.

त्यांना पाणी हवं होतं. आडावर पाणी भरणार्‍यांपैकी कुणी ना कुणी पाणी आणून वाढेल या प्रतीक्षेत ते बसलेले होते. डोक्यावर ऊन तापू लागलेलं आणि त्यांचा जीवही पाण्यासाठी कासावीस झालेला! बसल्या जागेवरूनच ते पाणी भरणार्‍यांना पाणी देण्याबाबत आर्जव करीत होते. आबांनी ड्रायव्हरला गाडी उभी करायला सांगितली आणि खाली उतरून ते त्या पाणवठ्याकडे गेले. त्यानंतर सुमारे अर्धा तास त्या गावकर्‍यांची आबांनी जी काही शिकवणी घेतली, ती मी आजपर्यंत विसरू शकलो नाही. सुरुवातीला उद्धटपणे उत्तरं देणारे गावकरी, जेव्हा आबा दै.‘पुढारी’चे संपादक आहेत, हे कळल्यावर एकदम मेणासारखे मऊ झाले आणि त्यांनी त्या अस्पृश्यांचा पाणी भरण्याचा अधिकार मान्य केला.

एका क्षणात तिथलं चित्र पालटलं आणि मघापासून दूर बसलेले अस्पृश्य त्या पाणवठ्यावर अक्षरशः तुटून पडले. त्या क्षणी त्या दीनदलितांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वाहताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिला होता. मला वाटतं, तोच क्षण माझ्या आयुष्यातील आत्मसाक्षात्काराचा क्षण होता.

कारण त्याच क्षणी ती घटना माझ्या मनावर कायमची कोरली गेली. महार, मातंग, चांभार आदी मागासवर्गीय म्हणून गणला गेलेला समुदाय संख्येनं सुमारे तीस-पस्तीस टक्के, पण चातुर्वर्ण्य व्यवस्थेत त्यांच्या भाळी दुःखाचा मळवट भरला गेलेला! जवळ शेती नाही, की कसला उद्यम-व्यापार नाही. चांभार आणि मातंग समुदायाकडे त्यांचे पारंपरिक व्यवसाय असले, तरी तेही वरिष्ठ वर्गावरच अवलंबून. गावकीमध्ये उच्चवर्णियांनी द्यावं तेव्हाच ते त्यांच्या पदरात पडणार, अशी परिस्थिती. महार समाजाचे हाल तर विचार करण्यापलीकडचे!

नदीसारख्या नैसर्गिक स्रोतातही सवर्णांचा घाट वरच्या बाजूला, तर त्यापासून दूरवर खाली मागासवर्गीयांचा घाट. सवर्णांना त्यांनी स्पर्श करायचा नाही हा दंडकच. तसेच त्यांना मंदिर प्रवेशाची परवानगीही नाही. सवर्णांच्या घरी जेवणावळ असली तरी अस्पृश्यांनी घराबाहेरच एखाद्या उकीरड्याजवळ बसून पत्रावळीवर जेवायचं! एक प्रकारे समाजानं त्यांना दूर लोटलेलं होतं. सर्व सुख-सुविधांपासून वंचित केलं होतं. एकंदरीतच माणूस म्हणून जगण्याचा त्यांचा हक्कच हिरावून घेण्यात आला होता. ही परिस्थिती भीषण होती.

त्या पाणवठ्यावरच्या प्रसंगानं मी हेलावून गेलो होतो. तेव्हा माझं वय पोरसवदाच होतं. पण ती घटना माझ्या मनःपटलावर कायमची कोरली गेली होती. पुढे मी पुण्यापासून अगदी परदेशातही शिक्षणासाठी गेलो, तरीही इथल्या सामाजिक विषमतेनं माझी पाठ सोडली नव्हती. जातिव्यवस्थेबाबत इंग्रजांचा काय द़ृष्टिकोन होता, हेही मी समजून घेण्याचा प्रयत्न केला, तसेच ही समस्या मुळापासून समजून घेण्यासाठी मी अगदी वेदांपासून, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महनीय व्यक्तींचे ग्रंथही वाचू लागलो.

पुढे तर ‘पुढारी’ची सूत्रं माझ्याच हातात आली. तेव्हा संधी मिळेल तिथं मी सामाजिक विषमतेवर प्रहार करू लागलो. शक्य तिथं दलित वर्गाला मदतीचा हात देऊ लागलो. माझ्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत मी दलित-पददलितांचे पाण्याचे असोत, जमिनीचे असोत वा सामाजिक समतेचे असोत, असे असंख्य प्रश्न हाताळले आणि ते तडीसही नेले आहेत. सुरुवातीच्या काळात दलितमित्र बापूसाहेब पाटील यांच्यासारख्या व्यक्ती माझ्या या कार्यातूनच माझ्या संपर्कात आल्या. तसेच शशिकांत दैठणकर यांच्यासारख्या आयएएस अधिकार्‍यांची ऊठबसही माझ्याकडे वाढली.

‘हक्क मागून मिळत नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागतो,’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं ऐतिहासिक विधान! त्यांनी याच विचारातून समाजातील वंचित घटकाला लढण्याचं बळ दिलं. ‘मी अशा धर्माला मानतो जो समता, बंधुता आणि स्वातंत्र्य देऊ शकेल,’ असंही आंबेडकरांनी निक्षून सांगितलं होतं. त्यामुळे कोणताही धर्म हा माणसामाणसांत भेदभाव करीत नाही, असले जहाल विचार माझ्याही अंगी चांगलेच बाणले गेले होते.

शशिकांत दैठणकर यांच्यासारख्या प्रशासनातील उच्च अधिकार्‍यालाही या गोष्टीचं आश्चर्य वाटल्यावाचून राहिलं नाही. राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक कार्य व आबांचं सामाजिक कार्य यांचा विशाल वारसा घेऊनच माझी वाटचाल सुरू झालेली. त्यामुळे राज्यात घडणार्‍या सामाजिक परिवर्तनाच्या घटनांकडेही मी अत्यंत डोळसपणे पाहत आलेलो आहे. त्यातलीच ही एक घटना –

दलितांसाठी पंढरीच्या विठुरायाचं द्वार खुलं
धाव घाली विठू आता । चालू नको मंद ।
बडवे मज मारिती । ऐसा काहीतरी अपराध ।
जोहार मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार ।
बहु भुकेला जाहलो । तुमच्या उष्ट्यासाठी आलो।
आमची केली हीन याती । तुज का न कळे श्रीपती ।

इसवी सनाच्या चौदाव्या शतकात चोखामेळ्यानं फोडलेला हा टाहो. विसाव्या शतकाचा अर्धा भाग संपत आला, तरी त्याचा आवाज निनादत होता. समाजातील मोठ्या जनसमूहाला विठुरायाचा चरणस्पर्श हवा होता व तो मिळू नये, यासाठी सनातनी पराकाष्ठा करीत होते. अखेर त्यासाठी साने गुरुजींनी आमरण उपोषणाद्वारे प्राण पणाला लावल्यानंतर हरिजनांना पंढरपूरच्या विठू माऊलीच्या मंदिराचं द्वार उघडलं गेलं. गुरुजींच्या या आंदोलनात आबाही सामील झाले होते. आमच्यासाठी भूषणावह ठरलेल्या अनेक बाबींपैकी ही महत्त्वाची घटना होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे महामानव. त्यांच्यामुळेच या देशातील हजारो वर्षे खितपत पडलेल्या दलित समाजाला न्याय मिळाला. त्यांच्या ‘शिका व संघटित व्हा,’ या विचारानं हरिजन समुदायाला प्रेरणा दिली, त्यांच्या अंगात चेतना ओतण्याचं काम केलं. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह असो, वा नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशासाठी केलेला सत्याग्रह… यांसारखी आंदोलने डॉ. आंबेडकरांनी केवळ छेडली नाहीत, तर त्या त्या ठिकाणी हरिजनांना न्याय मिळवून दिला. त्यांना त्यांचे हक्क प्राप्त करून दिले. या सर्व कार्यकाळात आबा म्हणजे ‘पुढारी’चे संस्थापक-संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावून चळवळीत सहभागी झाले होते.

आबांचं हरिजन उद्धाराचं काम कृतिशील होतं. आबा फक्त विचार मांडून थांबले नाहीत, तर त्याच्या अंमलबजावणीसाठी शड्डू ठोकून मैदानातही उतरले. ही बाब तत्कालीन दलित समाजाच्या चांगलीच नजरेत भरलेली. ते प्रेमानं आबांना छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना बोलवायचे. त्यामुळे त्यांना आपला माणूस भेटल्याचा आनंद व्हायचा. दलित जनतेचा आबांवर इतका विश्वास होता, प्रेम होतं, की बाबासाहेबांचा भव्य नागरी सत्कार करण्याचा प्रसंग आला तेव्हा अध्यक्षपदासाठी त्यांच्या ओठावर आबांचच नाव होतं. 5 सप्टेंबर 1943 रोजी मुंबईत दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नागरी सत्कार झाला होता. त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आबांनी भूषवलेलं.

आबांचा पिंडच मुळी स्वातंत्र्ययुद्धात आणि सामाजिक चळवळीत घडलेला. दै.‘पुढारी’ची स्थापनाही त्यांच्या आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या सहवासातून लाभलेल्या पुरोगामी विचारसरणीतूनच झालेली. जो विचार माणसाच्या रक्तात भिनलेला असतो, तो त्याला कधीच स्वस्थ बसू देत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य. आबांचंही तसंच होतं. कुठलाही सामाजिक अन्याय त्यांना सहन होत नसे. दलितांवरील अन्यायानं तर ते पेटून उठत असत.

आंबेडकरांच्या पावलावर पाऊल

1949 मध्ये कोल्हापूर संस्थानच्या अखेरच्या काळात कॅ. नंजाप्पा यांची इथं प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली. त्या काळात कोल्हापूरपासून जवळच असलेल्या वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिरात दलितांना दर्शनासाठी प्रवेश नव्हता. ही गोष्ट आबांच्या लक्षात आली. त्याचं आबांना अत्यंत वाईट वाटलं. त्यामुळे ते अस्वस्थ झाले व आपण दंड थोपटून उभा राहिल्याशिवाय दलितांना मंदिर प्रवेश मिळणार नाही, हेही त्यांच्या लक्षात आलं. काहीही करून दलितांना मंदिरप्रवेश मिळवून द्यायचाच, अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली व ते त्वरेनं कामाला लागले.

त्यांनी कोल्हापूर संस्थानचे प्रशासक कॅ. नंजाप्पा यांची भेट घेतली व त्यांच्या निदर्शनाला हा अन्याय आणला. कॅ. नंजाप्पा हेही पुरोगामी विचारसरणीचेच गृहस्थ होते. त्यांनी आबांच्या त्या क्रांतिकारी सूचनेचं मनापासून स्वागत केलं आणि अतिशय सावधगिरीनं प्लॅन तयार करून 13 मार्च 1949 रोजी जोतिबाच्या मंदिरात दलित बांधवांचा प्रवेश घडवून आणला. ही घटना शांततेत पार पडली असली, तरी तो एक अनोखा सत्याग्रहच होता. त्यावेळी अनेक दलित बांधवांसह स्वतः आबा, कॅ. व्ही. नंजाप्पा, पी. बी. पाटील, सौ. ललितादेवी नंजाप्पा इत्यादी जोतिबाच्या डोंगरावर उपस्थित होते. अशा तर्‍हेनं दलितोद्धारक राजर्षी शाहू महाराजांच्या कर्मभूमीत त्यांचं कार्य आबांनी पुढे नेलं.

पूर्वसुरींच्या पावलांवर माझं पाऊल

चवदार तळे सत्याग्रह आणि काळाराम मंदिर प्रवेश हे महाराष्ट्रातील दोन ऐतिहासिक सत्याग्रह. या सत्याग्रहांनी समतेच्या दिंडीचा मार्ग प्रशस्त केला. पण खरं तर त्या आधीच दलितोद्धारक राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानात समतेचा झेंडा फडकावला होता. शंभर वर्षांपूर्वी माणगाव परिषदेत त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तुमचे भविष्यातील नेते होतील,’ अशी भविष्यवाणी वर्तवली होती. डॉ. आंबेडकरांच्या अलौकिक कार्याचा भक्कम पायाच माणगाव परिषदेत घातला गेला होता. याच प्रेरणेतून पुढे चवदार तळे, काळाराम मंदिर प्रवेश यांसारखे लढे उभारले गेले. या सत्याग्रहात सहभागी होऊन आबांनी समाजातील एका दुर्लक्षित मोठ्या जनसमुदायाला मानाचे पान मिळवून दिले होते.

या थोर पूर्वसुरींनी दाखवलेल्या समतेच्या मार्गावरच माझीही वाटचाल सुरू होती व आजही सुरू आहे. एखाद्या विशिष्ट समाजावर किंवा व्यक्तीवर अन्याय होतो आहे, असं निदर्शनास आल्यावर माझं रक्त पेटून उठतं. त्या अन्यायाचं परिमार्जन झाल्याशिवाय मला स्वस्थता लाभत नाही. मनातली खदखद नाहीशी होत नाही.
याच पार्श्वभूमीवर एक धक्कादायक गोष्ट माझ्या निदर्शनास आली आणि मी कमालीचा अस्वस्थ झालो, अंतर्बाह्य हादरलो.

केवळ धक्कादायक

कोल्हापूरचं श्री अंबाबाई मंदिर हे जगप्रसिद्ध मंदिर. साडेतीन पीठांपैकी एक. अंबामातेच्या दर्शनाला महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून लाखो भाविक येत असतात. परदेशातून आलेल्या भक्तांचीही वानवा नाही. मीही श्री अंबाबाईचा निस्सीम भक्त. त्यामुळे कोल्हापुरात असलो, की दर शुक्रवारी अंबाबाईच्या दर्शनाला न चुकता जात असतो. हा माझा नित्यक्रमच आहे.

असाच मी एकदा देवीच्या दर्शनाला गेलो असताना, एक धक्कादायक प्रसंग माझ्यासमोरच घडला. त्या ठिकाणी एक दलित जोडपं आपल्या चार-पाच महिन्यांच्या मुलासह दर्शनाला आलं होतं. आपल्या मुलाला देवीच्या पायांवर घालावं, अशी ते पुजार्‍यांकडे विनवणी करीत होतं. पण, पुजारी काही ऐकायला तयार नव्हते. गर्भागारात कोणालाही प्रवेश नसल्याचं पुजारी त्या जोडप्याला निक्षून सांगत होते.

प्रथमतः माझ्या लक्षात काही आलं नाही, पण अधिक चौकशी करता जी माहिती मला मिळाली, ती चांगलीच धक्कादायक होती. कोल्हापूर नगरीच्या पुरोगामी चेहर्‍याला बट्टा लावणारी होती. अंबाबाईच्या गाभार्‍यात पुजारी आणि त्यांच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त कोणासही प्रवेश दिला जात नव्हता. तसंच सोवळं नेसूनही दलितांना गर्भागारात प्रवेश मिळत नसल्याची माहिती तेव्हा मला मिळाली.
माझं मन सुन्न झालं. काही झालं तरी पुरोगामी कोल्हापूरसाठी ही गोष्ट लांच्छनास्पद होती.

काहीतरी करणं भागच होतं. मी आतून पेटून उठलो होतो. या निमित्तानं माझ्या मनाला प्रश्नांच्या असंख्य इंगळ्या डसत होत्या. फक्त पुजार्‍यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांनाच मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश का? त्यांच्या व्यतिरिक्त श्री अंबाबाईचे दुसरे कुणी भक्त नाहीत का? आणि श्री अंबाबाईच्या श्रीपूजकांनाच गाभार्‍यात प्रवेशाचा हक्क द्यायला त्यांच्याकडे विशेष असं काय आहे? आणि इतरांनी गाभार्‍यात प्रवेश केला म्हणून असा कसला विटाळ होणार होता? तो नेमका कोणाला होणार होता? प्रश्नांच्या या आवर्तनांनी माझी झोपच उडालेली.

‘जन्मता विटाळ मरता विटाळ ।
चोखा म्हणे विटाळ आदि अंती ।
आदि अंती अवघा, विटाळ साचला ।
सोवळा तो झाला कोण न कळे ।’

चोखामेळानं सुमारे सहाशे वर्षांपूर्वी उपस्थित केलेला हा प्रश्न. त्याचं उत्तर आजही समाजाला देता आलेलं नाही, हीच शोकांतिका माझं मन व्यापून राहिलेली.

माणसामाणसांत भेद करणार्‍या या अन्यायाची खदखद माझ्या रोमारोमात भिनलेली. त्यामुळेच मी दलित बांधवांना श्री अंबाबाईच्या गर्भगृहात प्रवेश मिळवून देण्याचा ठाम निर्धार केला व हा कार्यक्रम शाहू सेनेला दिला.

गाभारा प्रवेश तयारी

शाहू सेना हे सामाजिक कार्याच्या पूर्ततेसाठी मीच जन्मास घातलेलं सामाजिक व्यासपीठ. ही संघटना स्थापन करण्याची संकल्पना माझीच. त्यापाठीमागची प्रेरणा व पुढाकारही माझाच. सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी अनेकदा आंदोलनाची कासही पकडावी लागते, हे विचारात घेऊन ‘शाहू सेना’ या संघटनेची स्थापना करण्यात आलेली. प्रा. अशोकराव रावराणे या निर्भीड नेत्याकडे शाहू सेनेच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आलेली.

शाहू सेनेच्या माध्यमातूनच मी अनेक सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवलेला. बघता बघता या संघटनेनं कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनात आपलं स्थान निर्माण केलेलं. साहजिकच सामाजिक प्रश्नांवर एक स्वतंत्र क्रियाशील व्यासपीठ असावं, हा हेतूही साध्य झालेला. मी फक्त आदेश द्यायचा अवकाश, की शाहू सेना आंदोलनात उतरलीच म्हणून समजायचं.

अंबाबाईच्या मंदिरातील घटना निदर्शनास आल्यानंतर मी लगेचच शाहू सेनेचे अध्यक्ष अशोकराव रावराणे, अप्पासाहेब शिंदे, तसेच तटाकडील तालमीचे अध्यक्ष बाळ जाधव यांच्यासह सर्व पदाधिकार्‍यांची ‘पुढारी’ कार्यालयात बैठक बोलावली आणि दलित दाम्पत्यांच्या हस्ते श्री अंबाबाईला गाभार्‍यात जाऊन अभिषेक घालण्याचा मनसुबा मी या बैठकीत मांडला. माझ्या या उपक्रमाला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अंबाबाई मंदिराच्या गर्भागारात दलित बांधवांना प्रवेश मिळवून द्यायचा, याचा मी ध्यासच घेतला होता. अर्थात, अंबाबाई मंदिरातील परंपरावादी श्री पूजक वर्गाची त्यासाठी संमती मिळवणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. शिवधनुष्यच होते ते, पण मी जिद्दीने या कार्याला लागलो.

श्री पूजकांपैकी जे प्रमख अशा पुजार्‍यांची मी ‘पुढारी’त बैठक बोलावली. ते सारे जुन्या पिढीचे. पारंपरिक विचार त्यांच्या हाडीमासी खिळलेले. पहिल्या बैठकीत मी हा क्रांतिकारक विचार मांडताच ते अवाक्च झाले. असा काही आजवरच्या चाकोरीबाहेरचा विचार मी पुढे आणीन हे काही त्यांच्या स्वप्नात नव्हते. पहिल्या बैठकीत फारसे काही निष्पन्न झाले नाही आणि मलाही त्याची कल्पना होतीच. आणखी काही बैठका झाल्या. सार्वजनिक कार्यातील माझ्या क्रियाशील सहभागामुळे माझा दबदबा वाढला होता.

माझ्या शब्दाला वजन आले होते. साहजिकच चर्चेसाठी माझा निरोप गेला, की श्रीपूजक बैठकीसाठी उपस्थित राहात. पहिल्या तीन-चार बैठकीत त्यांचा सूर विरोधाचाच होता; पण मी हळूहळू युक्तिवाद करीत त्यांचे परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पंढरपूर, जोतिबा मंदिर, काळाराम मंदिर प्रवेशासाठी झालेल्या सत्याग्रहाची उदाहरणे दिली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शेकडो वर्षांपूर्वीच्या प्रथा, परंपरा, रूढी कालबाह्य झाल्याचे समजावून सांगितले.

राजर्षी शाहू महाराज यांचा पुरोगामी वारसा लाभलेल्या कोल्हापुरात आपण नवा आदर्श निर्माण करू, असे आवाहन केले. अशा 7-8 बैठका झाल्या; परंतु श्रीपूजक परंपरावादी विचारांवर चिकटून राहिले.

श्रीपूजकांनी या पुरोगामी उपक्रमाला प्रतिसाद दिला नसला, तरी माझी जिद्द कायमच होती. उलट श्रीपूजकांच्या भूमिकेमुळे माझ्या जिद्दीला धार चढली. या क्रांतिकारक उपक्रमासाठी जोमानं कामाला लागलो. या उपक्रमासाठी पाच दलित दाम्पत्ये आणण्याची जबाबदारी माजी नगरसेवक अशोक भंडारे यांनी स्वीकारली आणि सामाजिक समतेची गुढी उभारण्यासाठी आम्ही सज्ज झालो.

परिवर्तनाच्या चळवळीतील सुवर्ण दिन

16 जुलै 1978 या दिवशी तिथीनुसार शाहू जयंती येत होती. या क्रांतिकारक उपक्रमाला याहून उत्तम दिवस आणखी कुठला असणार होता? उलट खर्‍या अर्थानं त्या दिवशी शाहू जयंती साजरी झाली, असं सार्थ अभिमानानं म्हणता येईल. म्हणून मग याच दिवशी निळकंठ बापू लोंढे आणि पार्वती निळकंठ लोंढे, तुकाराम ज्ञानू चौगुले आणि सौ. वेणू तुकाराम चौगुले, कृष्णात धुळवा वायदंडे आणि सौ. हरणाबाई कृष्णात वायदंडे, बापू भागोजी लोंढे आणि सौ. गौरा बापू लोंढे, भगवान तायाप्पा गोडे आणि सौ. रुक्मिणी भगवान गोडे या पाच दलित दाम्पत्यांच्या हस्ते श्री अंबाबाईला अभिषेक घालण्याची योजना आखण्यात आली.

अर्थातच अंबाबाई मंदिरातील पुजार्‍यांना त्याची कुणकुण लागल्याशिवाय कशी राहील? त्यांनी त्वरेनं माझी भेट घेऊन आपला विरोध दर्शवला. मात्र, मी माझ्या निर्णयावर ठामच होतो. मी त्यांना ठणकावून सांगितलं की, ‘हा उपक्रम तर होणारच! ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे! पण तुम्ही यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करून नाहक बदनाम होऊ नका! त्यापेक्षा या समाज परिवर्तनाच्या महान कार्याचे पाईक होण्याचा मोठेपणा मिळवा!’ त्यावर त्यांनी आम्हाला हे मान्य नाही व आम्ही हे होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली.

मी मुद्दाम ‘पुढारी’मध्ये ‘दलित दाम्पत्ये श्री महालक्ष्मीच्या गाभार्‍यात जाऊन पूजा करणार,’ हे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परिवर्तनाचा हा उपक्रम पाहण्यासाठी मंदिर आणि मंदिर परिसरात त्या दिवशी प्रचंड गर्दी झाली होती. उपस्थितांमध्ये कमालीची उत्सुकता होती. वातावरण अतिशय उत्तेजित झालेले असतानाच, मी आणि अशोकराव रावराणे आमच्या असंख्य कार्यकर्त्यांसह ज्यांच्या हस्ते अभिषेक करायचा होता, त्या दलित दाम्पत्यांना घेऊन मंदिरात आलो. आमच्यासोबत प्रचंड संख्येनं शाहू सैनिक, कार्यकर्ते आणि दलित महिला-पुरुष त्या ठिकाणी आले होते.

श्रीपूजकांची नरमाई

मंदिरात झालेली प्रचंड गर्दी आणि आमची आक्रमकता पाहून तेथील श्रीपूजकांना नरमाईची भूमिका घेणंच भाग पडलं. इतिहास साक्षीला आहे की, जेव्हा जेव्हा समाजपुरुष अन्यायाविरुद्ध पेटून उठतो, क्रांतीचा एल्गार पुकारतो, तेव्हा तेव्हा परंपरेच्या मक्तेदारांना आपला पराभव मान्य करावाच लागतो. साहजिकच श्रीपूजकांनीही माघार घेतल्यानं संघर्ष टळला. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव वसंतराव पंदारे होते. ते आमचे मित्र. त्यांनीही या क्रांतिकारी उपक्रमाबद्दल पूर्णपणे सकारात्मक भूमिका घेतली होती.

परिणामी, पाच दलित दाम्पत्यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात अंबाबाईच्या गर्भगृहात जाऊन देवीला अभिषेक करण्यात आला. प्रसंग इतका अनमोल आणि अविस्मरणीय होता, की मंदिरात उपस्थित असलेल्यांनीही आमच्यावर फुलांचा वर्षाव केला. शिवाय मंदिरही घोषणांनी दुमदुमले होते. तो जल्लोष आजही माझ्या मन:पटलावर ताजा आहे.

मी कृतार्थ झालो

गर्भगृहात जाऊन अभिषेक करायला मिळाल्याने त्या दाम्पत्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. ते पाहून मला समाधान वाटलं, मी कृतार्थ झालो. देवीला अभिषेक घालण्याची वेळ दुपारी 12 च्या आत असते. म्हणून ज्यांना अभिषेक घालायचा आहे, त्यांनी देवस्थान कमिटीत पैसे भरावेत आणि कमिटीच्या शिपायाबरोबर गाभार्‍यात जाऊन स्वहस्ते अभिषेक घालावा, असं आम्ही जाहीरच करून टाकलं. त्याचवेळी यापुढे दर्शनासाठी कोणाचीही अडवणूक केली जाणार नाही, असं पुजार्‍यांनी जाहीर करून टाकल्यामुळे सर्वत्रच आनंदाचे कारंजे फुलले.

भाविकांचे लोंढे

गाभार्‍यात जाऊन श्री अंबाबाईच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेता येतं, ही बातमी वार्‍यासारखी शहरात पसरली आणि बघता बघता भाविकांचा लोंढा अंबाबाईच्या मंदिराकडे येऊ लागला. आयुष्यात प्रथमच अंबाबाईच्या चरणावर डोकं ठेवून दर्शन घेता येतं, हे समजल्यावर सर्व भक्त गहिवरले. त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद आणि डोळ्यांतील आनंदाश्रू पाहण्यासारखं दुसरं कसलं सुख नव्हतं! अंबाबाई मंदिरात गर्भागृहात अभिषेक करता आल्याने त्या पाच दलित दाम्पत्यांना झालेला आनंद काय वर्णावा? ते अक्षरशः भारावून गेले. ते सद्गदित मनानं माझ्याकडे आले आणि त्यांनी माझे पायच धरले! त्यांच्या भावनांना जणू महापूरच आला होता. मी पटकन वाकून त्यांना उठवीत म्हणालो,

“अरेरे! हे काय करता? देवाच्या पाया पडायचं असतं!”
“सायेब! तुमीबी आमच्यासाठी देवापरास कमी न्हाईसा!” ते दाठल्या कंठानं उद्गारले.
“नाही-नाही!” मी सद्गदित होऊन म्हणालो, “देव गाभार्‍यात असतो. त्याच्या पायावर डोकं ठेवण्याचा अधिकार तर तुम्हाला आता मिळालेलाच आहे!”
“पण सायेब, हे फकस्त तुमच्यामुळंच शक्य झालं! न्हाईतर -”

त्यांना पुढे बोलवेना. त्यांच्या डोळ्यांतून वाहणार्‍या अश्रूधारा पाहून, पुन्हा एकदा 1960 सालातला तो पाणवठ्यावरचा प्रसंग माझ्या नजरेसमोरून तरळून गेला. आबांनी त्या दलितांना आडावर पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि आज या दलित दाम्पत्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू, यांची जातकुळी एकच होती! या निमित्तानं मी ‘तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही!’ या डॉ. बाबासाहेबांच्या उद्गारांचा तंतोतंत प्रत्यय घेत होतो.

समाज परिवर्तनाचं हे आंदोलन यशस्वी करण्यामध्ये माझ्यासोबत प्रा. अशोकराव रावराणे, अप्पासाहेब शिंदे, सदाशिवराव जरग, बाळ जाधव, जयसिंगराव कुसाळे, नारायण पठाडे, विलासराव पाटील, भैयासाहेब परदेशी, जयसिंगराव पाटील आदी मंडळी सुरुवातीपासूनच क्रियाशील होती. या आंदोलनामुळे परिवर्तनाच्या चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा यशस्वी झाला, याचा मला अभिमान वाटतो.

त्यामुळे समतेच्या दिंडीचं एक पाऊल आणखी पुढे पडलं. परिवर्तनाचा मार्ग जणू राजमार्गच बनला. विशेष म्हणजे शाहू जयंती दिवशीच महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात नोंद घ्यावी, अशी घटना आपल्या हातून घडल्याचा सार्थ अभिमान मला आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात,

‘उभा ऐल थडी। तेणें घालूं नये उडी।’ (अलीकडच्या काठावर उभा राहून गंमत पाहणार्‍याने पाण्यात उडी टाकू नये). सामाजिक कार्याचंही असंच आहे. इथं स्वतःला झोकून द्यावं लागतं, येणार्‍या प्रसंगांना समर्थपणे सामोरं जावं लागतं. ते मी करीत आल्यानेच हे सत्कार्य मी करू शकलो.

भूदान, श्रेष्ठदान

‘जगामध्ये स्वाभिमानानं जगायला शिका. या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे, अशी महत्त्वाकांक्षा तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात, तेच यशस्वी होतात,’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नेहमीच माझ्या मनी रुंजी घालायचे. पुण्यात कायद्याचा अभ्यास करीत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अनेक पुस्तकं माझ्या वाचनात आलेली. त्यांनी लिहिलेली राज्यघटना समजून घेताना त्या वाचनाचा मला खूपच उपयोग झालेला. पुढे समाजातील एका मोठ्या, वंचित घटकाचा लेखणीद्वारे तसेच सामाजिक कार्याद्वारे स्वाभिमान जागवताना मला त्याचा खूपच उपयोग झाला.

समाजसेवेचं बाळकडू मला आबांकडूनच मिळालं. समाजसेवा हा शब्द उच्चारायला सोपा; मात्र त्याचा मथितार्थ समजून घेणं तितकं सोपं नसतं. आपला समाज अनेक जाती-पाती, पोटजातीत विभागलेला. प्रत्येक माणसाचे पर्यायानं प्रत्येक जातीचे प्रश्नही वेगळे. ते समजून घेतानाच, या घटकांना न्याय देताना इतर दुखावले जाऊ नयेत, याचीही काळजी घेतली तरच समाजसौहार्द टिकतं, हे मी अनुभवानं सांगू शकतो. मी जरी हाडाचा पत्रकार असलो, तरी माझ्या अंगी मुरलेली समाजसेवा मला कधीही स्वस्थ बसू देत नाही. दुसर्‍यांच्या डोळ्यांतला आनंद पाहण्यात मला नेहमीच आनंद वाटत आलेला आहे. संत तुकारामांच्या भाषेत सांगायचं झालं तर…,

‘आलें आवडीशीं फळ। जालें कारण सकळ।’(माझ्या आवडीला फळ येऊन सर्व काही कार्य झाले आहे.) असंच घडत गेलं. हे घडणंही माझ्या कारकीर्दीत नेहमीच माझ्या शिरपेचातील तुरा ठरलं.

शिंगणापुरात पिकलं सोनं

एकदा अशीच एक घटना घडली. मी माझ्या कार्यालयीन कामात व्यस्त होतो. तेवढ्यात करवीर तालुक्यातील शिंगणापूर गावची काही दलित मंडळी मला भेटायला आली. राम कांबळे आणि वसंत कांबळे अशी त्यांच्या म्होरक्यांची नावं होती.
‘सायेब, आमच्या शिंगणापुरात सव्वाशे एकर पडीक जमीन आहे. ती जर आम्हा दलित बांधवांना कसायला मिळाली, तर आम्ही त्यात सोनं पिकवू आन आमच्या हालअपेष्टाबी संपतील.’ त्यांच्यापैकी राम कांबळे सांगत होता.
‘मग, तुम्ही तसा प्रयत्न का केला नाहीत?’ मी विचारलं.

‘लई खटपट केली सायेब! पर आम्हाला कोण दादच देत नाही. आता आपणच मनावर घेतलसा तर…’ वसंत कांबळे बोलता झाला.
‘ठीक आहे! मी बघतो काय करता येईल ते!’ मी त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं आणि लगेचच कामाला लागलो.

त्यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी शशिकांत दैठणकर होते. त्या काळात गावोगावी अनेक संस्थांकडे जमिनी पडून होत्या. मोठ्या प्रमाणात गायरानंही होती. या जमिनी वापरात असायच्याच असं नाही. अशा जमिनी ताब्यात घेऊन जे भूमिहीन आहेत आणि ज्यांना जमिनीत कष्ट करण्याची इच्छा आहे, अशांना त्या द्याव्यात, असा प्रस्ताव मी जिल्हाधिकार्‍यांकडे मांडला. त्यांनाही तो पसंत पडला.

योगायोगानं त्यावेळी राज्य सरकारनंही अशा प्रकारचं धोरण राबवायचं ठरवलं होतं. त्यामुळे हा उपक्रम राबवताना फारशा अडचणी किंवा विरोध होण्याची शक्यता नव्हती. तसा विरोध झालाच तर तो शासकीय उपक्रम असल्यामुळे टिकणार नव्हता.

मी वसंत कांबळे आणि राम कांबळे यांना बोलावून, त्यांच्याकडून पडीक जमिनी कुठे कुठे आहेत याची माहिती घेतली. त्यामध्ये शिंगणापूर सोसायटीकडे मोठी जमीन पडून असल्याचं माझ्या निदर्शनास आलं. मी या सर्व बाबी लगेचच जिल्हाधिकारी दैठणकर यांच्यासमोर मांडल्या आणि याबाबत तत्काळ कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर दैठणकरांनीही या जमिनीचा प्रस्ताव ताबडतोब मंत्रालयाकडे पाठवला आणि आम्ही सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यामुळे तो मंजूरही झाला.

तेथील सुमारे 125 एकर जमीन वंचित मागासवर्गीय समाजाच्या मालकीची झाली. माझ्या धडपडीला यश आलं! घोटभर पाण्यासाठी आडाकडे पाहत उन्हा-तान्हात धुळीत बसलेले दलित बांधव ते जमीन कसायला मिळालेले दलित बांधव हा माझ्या आयुष्यातील टप्पा माझ्यासाठी आभूषणासारखाच होता.

भूमिहीन झाले भूमिपुत्र

23 जुलै, 1975 रोजी माझ्याच अध्यक्षतेखाली शिंगणापूरमध्ये जमीन वाटपाचा ऐतिहासिक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आलं होतं. समारंभस्थळी आम्हाला वाजत-गाजत नेण्यात आलं होतं. त्यापूर्वी माझ्या हस्ते शिंगणापूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी हौसिंग सोसायटीचं उद्घाटनही करण्यात आलं. तसेच तेथील समाजमंदिरात दैठणकरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारच्या वतीनं कायम हक्कानं देण्यात येणार्‍या सुमारे सव्वाशे एकर जमिनीच्या सनदा शशिकांत दैठणकर यांनी दलित बांधवांकडे सुपूर्द केल्या आणि भूमिहीन दलित बांधव भूमिपुत्र झाले.

पण जमिनीला पाणी हवे

“मालकी हक्कानं जमिनीचं वाटप तर झालं. मात्र, आता त्यात सोनं पिकवणं हे आपल्या हातात आहे. सध्या तिथं पाण्याची व्यवस्था दिसत नाही. तेव्हा गावकर्‍यांनी या जमिनीला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी एकदिलानं झटावं. त्यामुळे या जमिनीत बारमाही पिकं घेता येतील अणि अन्नधान्याचं उत्पादनही वाढेल,” असं आवाहन मी केलं. त्याला भरघोस टाळ्यांचा प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाला भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गोविंदराव कलिकते, व्हाईस चेअरमन गणपतराव मेडसिंगे, करवीर तालुक्यातील कार्यकर्ते शंकरराव पाटील आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

हे सामाजिक कार्य करताना आबांच्या कार्याची पालखी पुढे वाहून नेल्याचं समाधान मला लाभलं. ज्याप्रमाणे आबांनी काळाराम मंदिर किंवा चवदार तळ्याच्या सत्याग्रहात भाग घेतला होता, त्याचप्रमाणे 1949 मध्ये कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जिवंतपणी पुतळा उभारण्याच्या कामामध्येही ते अग्रेसर होते. माझ्या प्रयत्नानं शिंगणापुरातल्या मागासवर्गीयांना मिळालेली मालकी हक्काची जमीन हे आबांच्या जनसेवेच्या व्रताचं पुढचं पाऊल अशीच माझी भावना आहे.

‘पुढारी’ एक खुला दरबार

‘पुढारी’ हा एक खुला दरबारच होऊन राहिला आहे. त्यावेळीही आणि आजही. हा जनता दरबार असाच अखंड चालू आहे. त्याला वेळ-काळाचं बंधन नाही. केवळ राजकीय लोक किंवा सामाजिक संघटनाच नाहीत, तर कोणीही व्यक्ती अथवा समाज केव्हाही येऊन आपलं गार्‍हाणं इथं मांडत असतो आणि माझ्या परीनं मी त्यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करीत असतो.

आमशी संघर्षात माझी निर्णायक भूमिका

शिंगणापूरच्या घटनेप्रमाणेच अशीच एक घटना आमशी नावाच्या गावात घडली होती आणि तिला हिंसक वळण लागलं होतं. आमशी हे गाव करवीर तालुक्यात येतं. तिथं दलित आणि सवर्ण यांच्यामध्ये संघर्ष उफाळून आला होता. जमिनीच्या वादातून सवर्णांवर सामुदायिक हल्ला होऊन चार खून पडले होते! तर मोठ्या प्रमाणावर दलितांची घरं जाळण्यात आली होती.

तेथील काही दलित बांधवांना घेऊन दलितमित्र बापूसाहेब पाटील यांनी माझी भेट घेतली आणि माझ्यापुढे हा प्रश्न मांडला. मी लगेचच तत्कालीन जिल्हाधिकारी प्रेमकुमार यांच्याशी संपर्क साधला. हरिजन पुनर्वसन निधीसाठी खटपट केली. निधी त्वरेनं मंजूरही करून घेतला आणि 2 एप्रिल 1980 रोजी आमशीच्या दलित बांधवांना हा निधी देण्यातही आला. त्याचबरोबर गावात सामाजिक सलोख्याचं वातावरणही निर्माण केलं.

‘मोठ्या गोष्टीचे बेत आखत वेळ दवडण्यापेक्षा छोट्या गोष्टीनं आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरतं,’ याचा मला पुनर्प्रत्यय आला. मुळातच मी राजर्षी शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांचा पाईक, राजर्षींच्या समतेच्या कार्यात मला खारीचा वाटा उचलता आला. याचं अपूर्व समाधान आहे.

राजर्षी नेहमी म्हणायचे, ‘अरे महार काय नि मांग काय, मराठा काय नि ब्राह्मण काय, गोरा काय आणि काळा काय, रक्त तर लालच असतं की!’
हाच मानवतावादी विचार सुमारे सातशे वर्षांपूर्वी संत चोखामेळा यांनी त्यांच्या शब्दांत मांडला होता.

‘ऊस डोंगा परि । रस नोहे डोंगा ।
चोखा डोंगा परि । भाव नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलीया रंगा?’

समाजपरिवर्तनाच्या या महाप्रचंड कार्यात सहभागी होऊन चोखोबांच्या पायरीचा पाईक होण्याची संधीही मला मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो.

Back to top button