‘आरआरआर’ यशाचा ‘राजामौली’ फॅक्टर | पुढारी

‘आरआरआर’ यशाचा ‘राजामौली’ फॅक्टर

‘बाहुबली’नंतर दिग्दर्शक एस. एस. राजामौली पुन्हा एकदा ‘आरआरआर’ च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आले आहेत. राजामौलींच्या सिनेमाची सूत्रं प्रत्येक सिनेमात इतकी फिट बसवली जातात की, सिनेमा हमखास यशस्वी ठरतो. या सूत्रांनाच एकत्रितपणे ‘राजामौली फॅक्टर’ असं म्हणता येईल.

2015 मध्ये ‘बाहुबली : द बिगिनिंग’ नावाचं वादळ देशभरातल्या थिएटरमध्ये घोंघावत होतं. त्यानंतर पुढचे काही महिने प्रभास, रम्या कृष्णन, राणा दगुबाती, सत्यराज, तमन्ना ही त्यातल्या कलाकारांची नावं तर याच्या-त्याच्या तोंडी होतीच! त्याचबरोबर या सगळ्यांना एकत्र आणणारं नाव मात्र आदराने घेतलं जात होतं. ते नाव म्हणजे कोदुरी श्रीशैल श्री राजामौली म्हणजेच दिग्दर्शक एस. एस. राजामौली!

राजामौलींनी त्यांच्या दोन दशकांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीत एकूण बारा सिनेमे बनवले. या बाराही सिनेमांनी छप्परतोड कमाई करत राजामौलींना भारतीय बॉक्स ऑफिसच्या सिंहासनावर नेऊन बसवलं. जागतिक स्तरावर भारतीय सिनेसृष्टीची मान उंचावणार्‍या ‘बाहुबली’नंतर राजामौली ‘आरआरआर’ घेऊन आलेत.

पहिल्या आठवड्यातच या सिनेमाने ग्लोबल बॉक्स ऑफिसवर 710 कोटींचा गल्ला जमा केला. यात भारताचा वाटा 560 कोटींचा असून, त्यातली 280 कोटींची कमाई तर निव्वळ आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्येच झाली आहे. ज्युनिअर नंदामुरी तारका रामाराव म्हणजेच ज्यु. एनटीआर, रामचरण तेजा आणि राजामौली या त्रिकुटाचा हा करिश्मा बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम बनवत आहे.

राजामौलींचे सिनेमे ‘बाहुबली’ येण्याआधीपासूनच प्रसिद्ध होते, पण ते त्यातल्या कलाकारांमुळे. प्रभासचा ‘छत्रपती – हुकुमत की जंग’, रामचरण तेजाचा ‘मगधीरा’, ज्यु. एनटीआरचा ‘सिम्हाद्री – यमराज एक फौलाद’, रवी तेजाचा ‘विक्रमार्कुडू – आयपीएस विक्रम राठोड’ ही त्यातली काही खास नावं. तसं म्हणायला 2012 ला आलेल्या नानीच्या ‘इगा – मख्खी’ने त्यांचं नाव चर्चेत आलं होतं खरं, पण ते फार काळ चर्चेत टिकलं नाही. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ने त्यांना खरी ब्रँड व व्हॅल्यू मिळवून दिली.

2017 च्या ‘बाहुबली 2’नंतर राजामौलींचा पुढचा सिनेमा कुठला असणार, याचा अंदाज लावत असतानाच राजामौलींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ‘मेगा पॉवर स्टार’ रामचरण तेजा आणि ‘यंग टायगर’ ज्यु. एनटीआरसोबत एक फोटो टाकला आणि चर्चांना उधाण आलं. मार्च 2018 मध्ये हे दोघेही कलाकार राजामौलींच्या नव्या सिनेमात एकत्र काम करणार असल्याचं अधिकृतरीत्या जाहीर झालं.

स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या काल्पनिक कथेवर बेतलेल्या या सिनेमाचं नाव काय असणार? हा एक मोठा प्रश्न होता. चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी तात्पुरतं नाव ‘आरआरआर’ असं ठेवलं गेलं. ज्यु. एनटीआर, रामचरण तेजा आणि राजामौलींच्या आद्याक्षरांपासून हे नाव घेतलं गेलं होतं. पण ‘आरआरआर’चा हॅशटॅग इंटरनेटवर अनपेक्षितपणे व्हायरल झाल्यानंतर याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. सिनेमाच्या प्रमोशनध्ये दोन मोठ्या स्टारच्या स्टारडमसोबतच या नावानेही मोठा वाटा उचलला.

सिनेमाची गाणीही तितकीच महत्त्वाची आहेत. तेलुगू स्टार त्यांच्या नृत्यकौशल्यासाठी बरेच प्रसिद्ध आहेत. कुणाचा डान्स जास्त चांगला, हा इथल्या फॅनवॉरचा कळीचा मुद्दा आहे. या सिनेमातल्या ‘नाटू नाटू’ या अवघड डान्स स्टेप्स असलेल्या गाण्यात तर चक्क ज्यु. एनटीआर आणि रामचरण तेजा एकत्र थिरकताना दिसलेत. आलिया भटच्या वाढदिवसाला रीलिज झालेल्या ‘शोले’ गाण्यातूनही स्वातंत्र्ययोद्ध्यांना मानवंदना देताना प्रादेशिक अस्मितेला हात घालणारं मार्केटिंग बघायला मिळालं.

सध्याची तेलुगूभाषिक तरुणाई अशाच एका कॉम्बोच्या प्रतीक्षेत होती. तेलुगू सिनेसृष्टीत ढीगभर सुपरस्टार आहेत, पण त्यांचं एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करण्याचं प्रमाण फारच कमी आहे. या स्टारडमच्या गर्दीचं पिढीनुसार वर्गीकरण करायचं झालं, तर पहिल्या पिढीत ज्यु. एनटीआरचे आजोबा ‘नटरत्न’ एनटीआर आणि नागार्जुनचे वडील ‘नटसम्राट’ एएनआर म्हणजेच अक्विनेनी नागेश्वर राव ही जोडी बरीच लोकप्रिय होती.

पुढच्या पिढीने मात्र अशा कॉम्बोमध्ये फारसा रस दाखवला नाही. सगळेच स्टार सोलो हिट देत चालले होते. त्यानंतर बर्‍याच उशिराने म्हणजे 2013 मध्ये आलेल्या ‘सितम्मा वाकित्लो सिरीमल्ले चेट्टू – सबसे बढकर हम 2’मध्ये ‘व्हिक्टरी’ व्यंकटेश आणि ‘प्रिन्स’ महेशबाबू एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसले. तेलुगू स्टारडमच्या दुसर्‍या पिढीचा हा पहिला मल्टिस्टार सिनेमा ठरला. आता चाहत्यांची तिसर्‍या पिढीतल्या कलाकारांनीही एकत्र यावं अशी इच्छा आणखीनच प्रबळ झाली.

त्यानंतर 2014 मध्ये ‘स्टायलिश स्टार’ अल्लू अर्जुन आणि रामचरण तेजा यांचा ‘येवाडू’ आला. पण दोघेही आमनेसामने आले नव्हते. त्यानंतर 2015 मध्ये ‘नॅचरल स्टार’ नानी आणि ‘राऊडी स्टार’ विजय देवरकोंडा यांचा ‘येव्वडे सुब्रमण्यम – ये है जिंदगी’ आला. पण तेव्हा विजय स्टारडमपासून बराच लांब होता. 2022 मध्ये आलेल्या ‘बंगारराजू’मध्ये ‘युवासम्राट’ नागार्जुन आणि ‘ज्यु. युवासम्राट’ नागा चैतन्य ही अक्विनेनी घराण्याची दुसरी आणि तिसरी पिढी झळकली.

‘नटरत्न’ एनटीआर यांच्या शेवटच्या ‘मनम-दयाळू’ या 2014 ला आलेल्या सिनेमात तर अक्विनेनी घराण्याच्या तिन्ही पिढ्या दिसल्या होत्या. पहिल्या पिढीतले एनटीआर, दुसर्‍या पिढीतला नागार्जुन आणि नागा चैतन्य-‘मिसाईल स्टार’ अखिल ही तिसरी पिढी या सिनेमात दिसली होती. पण आता रामचरण तेजा आणि ज्यु. एनटीआरच्या अभिनयाने नटलेला ‘आरआरआर’ हा खर्‍या अर्थाने तिसर्‍या पिढीचा पहिला मल्टिस्टार सिनेमा ठरला आहे.

‘आरआरआर’च्या यशात जितका वाटा ज्यु. एनटीआर आणि रामचरण तेजाच्या स्टारडमचा आहे, चलाख मार्केटिंग आणि प्रमोशनचा आहे, त्याहून कितीतरी पटीने मोठा वाटा एकट्या राजामौलींचा आहे. राजामौलींच्या सिनेमाची सूत्रं आधीपासूनच ठरली आहेत आणि प्रत्येक सिनेमात ती इतकी फिट बसवली जातात की, सिनेमा हमखास यशस्वी ठरतो. या सूत्रांनाच एकत्रितपणे ‘राजामौली फॅक्टर’ असं म्हणता येईल.

पौराणिक कथांचे संदर्भ, नायकाची ओळख करून देणारे प्रसंग, नायक आणि सहनायकातले अंतर्गत वाद, उत्कंठेच्या शिखरावर नेऊन ठेवणारे मध्यंतर, नायक-खलनायकाच्या बलस्थानांची ओळख, कथेच्या शेवटपर्यंत वचनांमध्ये बांधले जाणारे नायक, नायक वापरत असलेलं वैशिष्ट्यपूर्ण हत्यार, भव्यदिव्यतेची जाणीव करून देणारे कॅमेरा अँगल्स, कथेला कलाटणी मिळवून देणारे भावनिक फ्लॅशबॅक अशी अनेक सूत्रं राजामौलींच्या सिनेमामध्ये चपखलपणे बसवलेली दिसतात.

‘आरआरआर’ मध्येही रामायण-महाभारताचा संदर्भ वापरला गेला आहे. रामचरण तेजाचं शेवटी स्वातंत्र्ययोद्धे अल्लुरी सीताराम राजू यांच्या रूपात दिसणं प्रभू श्रीरामांची आठवण करून देतं. स्वातंत्र्ययोद्धे कुमारम भीम यांची भूमिका साकारणारा ज्यु. एनटीआर बुलेट उचलून फिरवताना महाभारतातला गदाधारी भीम वाटतो. रामचरण तेजा आणि सीतेच्या भूमिकेतल्या आलियाची भेट घालून देताना ज्यु. एनटीआर हनुमानाचं प्रतीकात्मक रूप दर्शवतो. या सिनेमात रामचरण तेजा अग्नितत्त्वाचं, तर ज्यु. एनटीआर जलतत्त्वाचं प्रतिनिधित्व करताना दिसतो. या दोन्ही भिन्न व्यक्तिमत्त्वांना एकत्र आणण्याचं अशक्यप्राय काम ‘आरआरआर’ने केलंय.

दोघेही वेगवेगळ्या वचनांनी बांधले गेले असले, तरी त्यांचा हेतू शेवटी एकच असल्याचा दिसून येतो. रामचरण तेजाचं एकट्याने गर्दीला सामोरं जाणं असो किंवा यंग टायगरची खर्‍याखुर्‍या टायगरसोबत होणारी चकमक, दोघा हिरोंच्या एंट्रीचे हे प्रसंग पुरेपूर टाळ्या आणि शिट्ट्या वसूल करतात. आपल्या प्रत्येक सिनेमाच्या मदतीने बॉक्स ऑफिसच्या यादीतले वेगवेगळे रेकॉर्डस् मोडण्याचा ध्यासच राजामौलींनी घेतला असावा. 25 मार्च 2022 ला प्रदर्शित झालेला ‘आरआरआर’ही त्यांच्या याच ध्यासपूर्तीचा एक भाग आहे, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. पहिल्या दिवसापासूनच ‘आरआरआर’ने बॉक्स ऑफिसवर पक्की बैठक जमवली आहे.

पहिल्याच दिवशी ग्लोबल बॉक्स ऑफिसवर तब्बल 223 कोटींचा गल्ला जमवून ‘आरआरआर’ने ओपनिंगला सर्वाधिक कमाई करणार्‍या भारतीय सिनेमांच्या यादीत पहिला क्रमांक मिळवला आहे. याआधी हे स्थान राजामौलींच्याच ‘बाहुबली 2’कडे होतं. ओपनिंग विकेंडला तर ‘आरआरआर’ने ‘द बॅटमॅन’ आणि ‘द लॉस्ट सिटी’सारख्या बिग बजेट सिनेमांना मागे टाकत आंतरराष्ट्रीय थिएटरमध्येही आपलंच वर्चस्व निर्माण केलं. ‘आरआरआर’च्या हिंदी व्हर्जननेही चांगली कमाई केली आहे.

लॉकडाऊननंतर यशस्वी ठरलेल्या हिंदी सिनेमांच्या यादीत तो आता दुसर्‍या क्रमांकावर आहे. आता हा सिनेमा दमदार पावलं टाकत 1000 कोटींकडे वाटचाल करतो आहे. भारतात हा आकडा फक्त ‘दंगल’ आणि ‘बाहुबली 2’लाच गाठता आला आहे. जर ‘आरआरआर’ने हा आकडा गाठला, तर चीनमध्ये प्रदर्शित न होऊनही 1000 कोटींचा व्यवसाय करणारा हा पहिला सिनेमा ठरू शकतो.

प्रथमेश हळंदे

Back to top button