संयुक्त प्रवेश परीक्षा : आव्हाने आणि संधी! | पुढारी

संयुक्त प्रवेश परीक्षा : आव्हाने आणि संधी!

भारत स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आल्यानंतर ‘शिक्षणाचा सर्वदूर प्रसार’ हे धोरण निश्चित करण्यात आले. त्यासाठी शिक्षणाचे विकेंद्रीकरण करून दहावी आणि बारावीसाठी प्रत्येक राज्याचे स्वतंत्र मंडळ आणि मोठ्या राज्यांसाठी अनेक मंडळे असणारी पद्धती स्वीकारली गेली. या मंडळांना त्यांचा अभ्यासक्रम ठरवण्याचे आणि त्यावर आधारित परीक्षा घेण्याचे अधिकार देण्यात आले. त्यानुसार या मंडळांचे कार्य व्यवस्थित सुरू होते. मात्र काही नवे प्रयोग करत असताना परिणामांचा विचार न करता त्या पद्धतीमध्ये अनेक बदल करण्यात आले. मंडळांनी आपले अभ्यासक्रम बनवताना एकसूत्रीपणा ठेवला नाही. तसेच परीक्षा पद्धती आणि परीक्षेतील प्रश्नांची काठिण्यपातळी समान नसे. आपल्या मंडळाचा निकाल चांगला लागावा, अशीच जणू शर्यत असे.

त्यातच मंडळांच्या परीक्षांचे तंत्र निर्माण करण्यात खासगी शिकवणी घेणारी मंडळी यशस्वी झाली. त्यांच्या शिकवणी वर्गांना प्रचंड मागणी असे. त्यातून त्यांनी अनेक शहरात आपल्या शाखाही काढल्या. पुढे काही महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांनी ते आत्मसात केले. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांना बारावीच्या परीक्षेतील गुणांवर प्रवेश देण्यात येत असे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावेसे वाटत असल्याने अशा महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे. यातून मंडळाच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवणारे अनेक विद्यार्थी निर्माण होऊ लागले. या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत मतमतांतरे असू शकतात. मात्र, विद्यार्थ्यांनी परीक्षा तंत्र चांगले आत्मसात करून गुणवत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, हे नाकारता येणार नाही.

पुढील शिक्षणासाठी प्रवेश देताना याचा मोठा परिणाम दिसू लागला. एकाच गुणाचे अनेक विद्यार्थी असल्यामुळे अनेकदा अशैक्षणिक मुद्द्यांचा विचार करून गुणवत्ता ठरू लागली. जसे की, विद्यार्थ्याची जन्मतारीख. त्यामुळे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश देताना निव्वळ मंडळाच्या परीक्षांचे गुण विचारत घेणे अडचणीचे ठरू लागले. पर्यायाने शेवटी अशा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यास सुरुवात झाली. मात्र इतर अव्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश मंडळाच्या परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांवर देण्यात येत होते. त्यामध्येही काही वर्षांतच अडचणी येऊ लागल्या. उदाहरणार्थ, दिल्ली विद्यापीठामध्ये विज्ञान विद्याशाखेत मंडळाच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवणारे विद्यार्थीही प्रवेश घेऊ शकत नव्हते. त्यासाठी अशा विद्यापीठांनी स्वत:ची प्रवेश परीक्षा घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर परीक्षेचा खर्च कमी करण्याच्या हेतूने काही विद्यापीठे एकत्र येऊन अशा परीक्षा घेऊ लागली. 21 मार्च 2022 रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीशकुमार यांनी देशातील 54 विद्यापीठांमध्ये बारावीनंतर सर्व वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम वगळता इतर सर्व अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी एकच सामाईक परीक्षा होणार असल्याचे सांगितले.

देशभरातील 54 केंद्रीय विद्यापीठांपैकी केवळ एक महाराष्ट्रात आहे, ते म्हणजे वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्याला केंद्रीय विद्यापीठात शिक्षण घ्यावयाचे असेल तर परराज्यांत जावे लागते. महाराष्ट्राप्रमाणेच अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, केरळ, कर्नाटक, मिझोराम, मेघालय, नागालँड, ओडिशा, पाँडेचरी, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांत एकेक विद्यापीठ आहे. आसाम, जम्मू आणि काश्मीर, मध्यप्रदेश, तामिळनाडू या राज्यांत प्रत्येकी दोन विद्यापीठे आहेत. आंध्रप्रदेश, मणिपूर आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी तीन विद्यापीठे आहेत. याखेरीज बिहारमध्ये चार, उत्तर प्रदेशमध्ये सहा आणि दिल्लीमध्ये सात विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांद्वारे संचलित महाविद्यालये विविध विद्याशाखांचे पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण देतात.

केंद्रीय विद्यापीठांना निधी मोठ्या प्रमाणात मिळतो, त्यामुळे चांगल्या भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत. शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन ती भरण्यात आली. त्यामुळे बहुतांश केंद्रीय विद्यापीठातील शैक्षणिक वातावरण देशभरातील विद्यार्थ्यांना आवडणारे आहे. दिल्लीमध्ये राहून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणे सोपे जाते, म्हणूनही अनेक विद्यार्थी या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र, मंडळांच्या गुणभिन्नतेमुळे असे प्रवेश देणे जिकिरीचे बनले होते.

त्यावर उपाय म्हणून बी.ए., बी.कॉम., बी.एससी. अशा सर्व अभ्यासक्रमांना बारावीनंतर केंद्रीय विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असेल, तर ही ‘कॉमन युनिव्हर्सिटी एट्रान्स टेस्ट’ (उेाोप णपर्ळींशीीळीूं एपीींरपलश ढशीीं – उणएढ) देणे 2022 पासून बंधनकारक असणार आहे.
‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ अर्थात एनटीएमार्फत प्रवेश परीक्षा घेतली जाईल. प्रवेशासाठी बारावीच्या मंडळाच्या परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांचा विचार करण्यात येणार नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात 2022-23 साठीची प्रवेश परीक्षा प्रस्तावित आहे. बारावीसाठी नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल ट्रेनिंग अँड रिसर्च यांनी निर्धारित केलेला अभ्यासक्रम या प्रवेश परीक्षेसाठी असणार आहे. परीक्षा पूर्णत: ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. परीक्षेसाठी एकच प्रश्नपत्रिका असेल. प्रत्येक एका गुणाचे शंभर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विद्यार्थ्यांसमोर येतील. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दोन तासांचा वेळ मिळणार आहे.

प्रवेश परीक्षेच्या प्रश्नांची रचना दोन भागात असेल. पहिला भाग पंचवीस प्रश्नांचा असेल. यामध्ये विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, विश्लेषण क्षमतांच्या पडताळणीच्या अनुषंगाने प्रश्न असतील. हा सर्वांना समान असेल. तर दुसर्‍या भागामध्ये विद्यार्थ्यांचे विषयाचे आकलन आणि ज्ञान यावर आधारित 75 प्रश्न असतील. यासाठी विद्यार्थ्याने चार विषयांची निवड करावयाची आहे. बारावी परीक्षेसाठी उपलब्ध असणारे विषय येथे उपलब्ध असतील. बी.ए. अभ्यासक्रमास प्रवेश घेणारे विद्यार्थी येथे भारतीय भाषांबरोबर केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिक्षण सुविधा असणार्‍या फ्रेंच, अरेबिक, जर्मन इत्यादी भाषा दुसर्‍या भागामध्ये निवडू शकतात. प्रश्नांच्या प्रत्येक बरोबर उत्तरास एक गुण मिळणार आहे, तर चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा होतील. विद्यार्थ्यांना ही परीक्षा इंग्रजीसह हिंदी, मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, उर्दू, आसामी, बंगाली, पंजाबी या भाषांमधून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या लागू असलेल्या आरक्षणाच्या नियमानुसार विद्यार्थी प्रवेशित होतील. या सामाईक परीक्षेमुळे विविध विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा देण्यापासून विद्यार्थ्यांची सुटका होणार आहे. त्यासाठी लागणारा वेळ, पैसा आणि धावपळ कमी होणार आहे.

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून पदवी अभ्यासक्रमांप्रमाणेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठीही प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा व्यापक आणि दोन सत्रांत घेतली जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्याला पहिल्या सत्रासाठी एक भाषा, सामान्य ज्ञान आणि दोन त्याच्या अभ्यासाचे विषय घ्यावे लागतील. दुसर्‍या सत्रातील प्रश्न त्याच्या उर्वरित चार विषयांवर आधारित असतील. देश-विदेशांतील मुलांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येत असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केले आहे. तसेच राज्य विद्यापीठे, स्वायत्त विद्यापीठे आणि खासगी विद्यापीठेही या प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकणार आहेत. अर्थात, हे ऐच्छिक आहे. मात्र कालौघात हे सक्तीचे होणार असल्याचे ओळखून विद्यार्थ्यांनी तयारीला लागणे सुज्ञपणाचे ठरेल.

या प्रवेश परीक्षांची माहिती एनटीएच्या संकेतस्थळावर (हीींिीं://पींर.रल.ळप/) उपलब्ध करून दिली जाणार आहे. मार्चच्या तिसर्‍या आठवड्यात माहिती उपलब्ध होईल. तसेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अर्ज भरण्यासाठी लिंक उपलब्ध होईल. सर्व केंद्रीय विद्यापीठांची यादी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संकेतस्थळावर हीींिीं://ुुुर्.ीसल.रल.ळप/लशपीींरर्श्रीपर्ळींशीीळीूं.रीिु उपलब्ध आहे. या विद्यापीठांच्या वैयक्तिक संकेतस्थळास भेट दिल्यानंतर तेथे सुरू असणारे अभ्यासक्रम पाहता येतील आणि त्यानुसार आपला पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा पसंतीक्रम निश्चित करणे सोयीचे होते. या प्रवेश परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना एकत्रित स्वरूपात सर्व माहिती उपलब्ध होणे, एकाच परीक्षेत अनेक विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर बारावीच्या अभ्यासक्रमातील बदलांमुळे आव्हानही असणार आहे. या आव्हानाला संधी मानून विद्यार्थ्यांनी तयारी करावी आणि देशातील आपल्या आवडीच्या विद्यापीठाचा पदवीधर व्हावे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यापीठे, त्यातील अभ्यासक्रम आणि त्यांच्या प्रवेशाचे द्वार खर्‍या अर्थाने उघडले आहे!

सर्व केंद्रीय विद्यापीठांसाठी ‘संयुक्त प्रवेश परीक्षा’ होणार असल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी आव्हानाबरोबरच महत्त्वाची संधीही असणार आहे. परीक्षेत यशस्वी झाल्यास केंद्रीय विद्यापीठाचे प्रवेशद्वार खुले होणार आहे.

डॉ. व्ही. एन. शिंदे

Back to top button