पाकिस्तान पुन्हा अराजकाच्या दिशेने | पुढारी

पाकिस्तान पुन्हा अराजकाच्या दिशेने

आपने घबराना नही है, मै आपको नया पाकिस्तान दूँगा, अशी लोकप्रिय घोषणा करून 2018 साली सत्तेवर आलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी दयनीय बनली आहे. सर्वशक्तिमान लष्कराचा पाठिंबा त्यांनी केव्हाच गमावला आहे आणि विरोधकांनी त्यांना ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले आहे. गगनाला भिडलेली महागाई, त्या आधी कोव्हिड महामारीचा फटका आणि देशाची रसातळाला पोहोचलेली अर्थव्यवस्था; यामुळे पाकिस्तानची जनता इम्रान खान सरकारवर संतापली आहे. ज्या आशा आणि अपेक्षा जनतेने त्यांच्याकडून ठेवल्या होत्या, त्यापैकी एकही काम इम्रान खान यांना धड करता आलेले नाही. शिवाय ‘हलक्या कानाचा गृहस्थ’ अशी त्यांची प्रतिमा पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात बनली आहे.

एकेकाळी पाकिस्तानचे सर्वात यशस्वी क्रिकेट कर्णधार ठरलेल्या इम्रान खान यांना राजकीय पातळीवर मात्र सातत्याने क्लीन बोल्ड व्हावे लागले आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ ’ पार्टीला कशाबशा 117 जागा मिळाल्या होत्या. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या ‘पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ शरीफ’ गटाला 63 आणि बिलावल भुत्तो यांच्या ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ला 43 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे सर्वांत मोठा पक्ष या नात्याने अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांची मोट बांधून इम्रान खान यांनी गेली सुमारे साडेतीन वर्षे सरकार चालवण्याची कसरत केली. वास्तवात, आता पाणी गळ्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. पाकिस्तानातील संसद म्हणजे नॅशनल असेंब्लीची एकूण सदस्यसंख्या आहे 342. त्यातील सत्तर सदस्य प्रांतांच्या आकारमानानुसार नियुक्त केले जातात. यात प्रामुख्याने महिला आणि अन्य धार्मिक अल्पसंख्याकांचा समावेश असतो.

प्रत्यक्ष निवडणूक 272 जागांसाठी घेतली जाते. बहुमतासाठी 172 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. असे असले तरी, इम्रान खान यांनी लष्कराचा पाठिंबा मिळवून सत्ता संपादन केली खरी. पण त्यांनी सत्तेवर येताना जी गुलाबी स्वप्ने जनतेला दाखवली होती, त्यानुसार नया पाकिस्तान घडवण्यात त्यांना सपशेल अपयश आले आहे. एरवीदेखील पाकिस्तानात लोकशाही केवळ नावालाच असल्याचे लपून राहिलेले नाही. सगळी सत्ता लष्कराच्या ताब्यात असते. जोपर्यंत लष्कराच्या आदेशाचे तंतोतंत पालन केले जाते, तोपर्यंतच तिथल्या पंतप्रधानाची खुर्ची शाबूत असते. एकदा का लष्कराची खप्पामर्जी झाली की, बुजगावण्या लोकशाहीचा खेळ खल्लास होतो. पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हापासून तिथे हाच खेळ सुरू आहे. दीर्घकाळ लष्करानेच सत्तेवर राहण्याचा विक्रम नोंदवल्यामुळे आम जनतेलाही कधी कथित लोकशाही, तर कधी लष्करशाही या गोष्टी आता अंगवळणी पडल्या आहेत.

संबंधित बातम्या

हडेलहप्पी हेच धोरण

इम्रान खान हे उच्चविद्याविभूषित असल्यामुळे आणि त्यांच्यावर कसलाही आरोप नसल्यामुळे पाकिस्तानी जनतेला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्या पूर्ण करण्यात इम्रान खान यांना दारुण अपयश आले आहे. याला ते स्वतःच जबाबदार आहेत. आपला मित्र कोण आणि शत्रू कोण, हेच त्यांना ठरवता आलेले नाही. सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना जहांगीर तरीन नामक एका अपक्ष खासदाराने मोठी मदत केली होती. छोटे पक्ष आणि बाकीचे अपक्ष यांना गळाला लावण्याकामी या तरीन यांनी जिवाचे रान केले होते. मात्र, आसपासच्या खुशमस्कर्‍यांनी तरीन यांच्याविरोधात इम्रान खान यांचे कान भरले. तरीन हे लवकरच उपपंतप्रधान होऊ शकतात, असा इम्रान यांचा समज करून देण्यात आला. तेवढेच निमित्त पुरेसे ठरले आणि इम्रान यांनी तरीन यांना खड्यासारखे दूर लोटले. त्यामुळे तरीन दुखावले गेले. त्यांनी विरोधी पक्षांची मोट बांधायला सुरुवात केली.

आता तर ते इम्रान खान यांना धडा शिकवण्याच्या इराद्याने पेटून उठले आहेत. नंतर आपली चूक लक्षात आल्यानंतर इम्रान खान यांनी तरीन यांच्या मनधरणीचे सर्वतोपरी प्रयत्न चालवले आहेत. मात्र, तरीन हे इम्रान यांचा फोन कॉलही घ्यायला तयार नाहीत. पंतप्रधान झाल्यापासून इम्रान खान यांनी भ्रष्टाचाराचे निर्दालन करण्याच्या हेतूने कारवाई करताना कसलाही मुलाहिजा बाळगला नाही. विरोधकांची संभावना त्यांनी चोर, डाकू, लुटेरे अशा शेलक्या शब्दांत केली. संसदेतही ते मोजून दहा ते बारा वेळाच हजर राहिले आहेत. कराची येथील ज्येष्ठ पत्रकार वसाहतुल्ला खान यांनी काही दिवसांपूर्वी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांच्या धरसोड वृत्तीचा पंचनामा केला आहे. इम्रान खान यांनी भ्रष्टाचाराच्या संशयावरून ज्यांना ज्यांना तुरुंगात टाकले, त्यापैकी कोणावर आतापर्यंत एकही आरोप सिद्ध झालेला नाही. या लोकांविरुद्ध सरकारकडे कोणताही ठोस पुरावा नाही. त्यामुळे त्यांच्यावरील आरोप सिद्ध होण्याची शक्यता जवळपास नाहीच, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण पत्रकार वसाहतुल्ला खान यांनी नोंदवले आहे. ‘मी म्हणेन ती पूर्व’ हा खाक्याच इम्रान खान यांना र्‍हासपर्वाकडे घेऊन निघाला आहे. ‘सुंभ जळाला तरी पीळ सुटत नाही’ असे म्हणतात. स्वतःवर संकटांची मालिका येऊन कोसळली आणि खुर्ची धोक्यात असल्याचे समोर दिसत असले तरी इम्रान खान यांची मग्रुरी किंचितही कमी झालेली नाही.

तथापि, ते उसने अवसान आणत असले तरी आपली सद्दी संपल्याची जाणीव त्यांना प्रकर्षाने झाली आहे. म्हणूनच जेव्हा सगळी आयुधे संपतात तेव्हा कोणताही मुरलेला राजकारणी राष्ट्रवाद आणि धर्माचे हत्यार परजायला सुरुवात करतो. तोच मार्ग इम्रान खान यांनी अनुसरला आहे. इस्लामच्या प्रचाराला उग्र राष्ट्रवादाची फोडणी देऊन जनतेचे मन जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. पण, जनतेच्या मनातून ते कधीच साफ उतरले आहेत. माझ्या सरकारविरोधात मांडण्यात आलेला अविश्वास ठराव हे परकीय शक्तींचे कारस्थान असल्याची थाप ठोकायचेही त्यांनी बाकी ठेवलेले नाही.

एकाच वेळी अनेकांशी शत्रुत्व

सत्तेवर आल्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तानची मरणासन्न झालेली अर्थव्यवस्था मार्गी लावण्यासाठी कठोर पावले उचलणे अपेक्षित होते. तसे न करता त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात तथाकथित लढाई उघडली. मूळ प्रश्नांकडे या नादात त्यांचे साफ दुर्लक्ष होत गेले. हे कमी म्हणून की काय, लष्कराशीही त्यांनी नंतरच्या काळात पंगा घेतला. त्यामुळेच लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी इम्रान खान यांना सत्तेवरून दूर होण्याचा सूचनावजा इशारा नुकताच दिला आहे. याचे कारण इम्रान खान यांनी आपली खुर्ची वाचवण्यासाठी नव्या लष्कर प्रमुखपदावरून बाजवा यांना डच्चू देण्याची तयारी चालवल्याची चर्चा हेच आहे. इम्रान सरकारचे कडक टीकाकार डॉ. आमीर लियाकत यांनी तर इम्रान खान यांना, असे आततायी पाऊल उचलून तुम्ही महाविस्फोटाला आमंत्रण देत आहात, असा जळजळीत इशारा दिला आहे. पाकिस्तानात लष्कर आणि लोकनियुक्त सरकार यांच्यातील संघर्ष नेहमीचाच आहे. दोघेही परस्परांवर कुरघोडी करण्यात मग्न असतात. देशात एकीकडे महागाईने जनता हैराण झालेली असताना इम्रान खान जवळपास दररोज रशिया-युक्रेन युद्धावर बोधामृत पाजत आहेत. अमेरिका आणि युरोपीय देशांवरही त्यांची टीकाटिप्पणी सुरूच आहे. त्यामुळे लष्करही इम्रान खान यांच्या या धेडगुजर्‍या कारभाराला कंटाळले आहे. 1972 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांनी तेव्हाचे लष्करप्रमुख आणि हवाई दलप्रमुख यांना तडकाफडकी बरखास्त केले होते. इम्रान खान हेही तसेच आततायी पाऊल उचलण्याची शक्यता असल्याची चर्चा पाकिस्तानी माध्यमांत आहे. तथापि, असे करणे वाटते तेवढे सोपे नाही. कारण बाजवा यांना लष्कराच्या सगळ्या रेजिमेंटस्चा भक्कम पाठिंबा आहे. त्यामुळे इम्रान खान यांनी जर असे वेडे धाडस केले, तर त्याच क्षणी त्यांना सत्ता सोडावी लागेल आणि लष्कर सत्तेची सूत्रे स्वतःच्या हाती घेऊ शकेल.

असाच आततायीपणा नवाझ शरीफ यांच्या अंगलट आला होता. शरीफ यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात एका छोट्या चुकीसाठी तेव्हाचे लष्करप्रमुख जहांगीर करामात यांना पदावरून काढून टाकले होते. तथापि, नंतर लष्करप्रमुख बनलेल्या परवेझ मुशर्रफ यांनी सुमारे दहा वर्षे याच नवाझ शरीफ यांना अतोनात त्रास दिला होता. इम्रान यांच्यासाठी हा इतिहास फार जुना झालेला नाही. ‘फ्रायडे टाइम्स’ने या संदर्भात अंतर्गत सूत्रांचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार इम्रान खान यांच्या प्रधान सचिवांनी जर एखादा बाका प्रसंग ओढवलाच, तर सरकारमधील मंत्री आणि बडे अधिकारी यांना सुरक्षितस्थळी आश्रय घेता येईल, अशी योजनादेखील तयार ठेवली आहे. यात कितपत तथ्य आहे हे आताच सांगता येणार नाही. तथापि, पाकिस्तानातील राजकीय परिस्थिती एवढी निसरडी आहे की, केव्हा काय होईल याबद्दल अंदाज बांधणे महाकठीण.

शाहबाज शरीफ तयारीत

इम्रान खान यांच्याविरोधात जनमत एवढे उफाळले आहे की, त्यांची गच्छंती ही आता फक्त औपचारिकता उरली असल्यासारखे वातावरण सध्या दिसून येत आहे. आगामी राजकीय वार्‍याचा अंदाज घेऊन विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान पदासाठी आपण उत्सुक असल्याची घोषणाही करून टाकली आहे. शाहबाज हे नवाझ शरीफ यांचे बंधू आहेत. जरी त्यांनी आपल्या नावाची घोषणा भावी पंतप्रधान म्हणून केली असली, तरी यासंदर्भातील अंतिम निर्णय नवाझ शरीफ हेच घेतील, असे सांगायला ते विसरलेले नाहीत. पाकिस्तानचे पंतप्रधानपद सुमारे नऊ वर्षे भूषवलेले नवाझ शरीफ हे सध्या लंडनमध्ये वैद्यकीय उपचार घेत आहेत. 2018 मध्ये ‘पनामा पेपर्स’चे प्रकरण उजेडात आल्यानंतर शरीफ यांना दोषी ठरवून पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. शिवाय त्यांना कोणतेही सार्वजनिक पद भूषवण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यांची एकूण संपत्ती 1.6 अब्ज डॉलर्स एवढी अवाढव्य आहे. त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप सातत्याने झाले आहेत. पाकिस्तानातील बहुतांश राजकीय नेते भ्रष्टाचाराच्या दलदलीत कसे आकंठ बुडाले आहेत, त्याची ही छोटीशी झलक. दुसरीकडे, ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’नेही इम्रान खान यांच्याविरोधात शड्डू ठोकले आहेत.

प्रामुख्याने सिंध प्रांतात जोर असलेल्या या पक्षाने इम्रान खान यांच्याविरुद्ध सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ चालवली आहे. एक खरे की, इम्रान खान यांच्या पायाखालची वाळू झपाट्याने घसरत चालली आहे. मात्र मी शेवटच्या चेंडूपर्यंत लढेन, हार मानणे माझ्या रक्तातच नाही, अशी दर्पोक्ती इम्रान यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले होते, तर इस्लामिक देशांच्या संघटनेच्या बैठकीत हे गृहस्थ पुन्हा मूळ पदावर आले आणि त्यांनी काश्मीरचे तुणतुणे नेहमीप्रमाणे वाजवले. त्याला अन्य देशांकडून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही, हा भाग वेगळा. हे कमी म्हणून की काय, आता असे वृत्त येऊन थडकले आहे की, इम्रान खान यांचे माजी सल्लागार शहजाद अकबर, मुख्य सचिव आझम खान आणि माजी न्यायमूर्ती गुलझार अहमद यांनी आगामी वादळाची चाहूल लागताच पाकिस्तानातून पलायन केले आहे.

अकबर हे देशांतर्गत प्रश्नांविषयी इम्रान खान यांना सल्ला देत होते आणि त्यांना इम्रान यांनी ब्रिटनहून खास बोलावून घेतले होते. नवाझ शरीफ यांना शह देण्याच्या कामी इम्रान यांनी त्यांना कामाला लावले होते. न्यायमूर्ती अहमद यांनी दिलेले काही निवाडे वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. त्यांच्या कुटुंबाने आधीच देश सोडला असून आता तेसुद्धा अमेरिकेला रवाना झाल्याचे वृत्त आहे. मुख्य सचिव आझम खान हेही गेल्या शुक्रवारी दुबईला गेले व तेथून एका खासगी विमानाने अमेरिकेला निघून गेले. कारण तेसुद्धा सातत्याने वादाच्या भोवर्‍यात सापडले होते. थोडक्यात सांगायचे तर, इम्रान खान हे क्लीन बोल्ड झाले किंवा नाही, तरी मूळ परिस्थितीत कसलाही फरक पडणार नाही. सत्तेभोवती लष्कराने घातलेला घट्ट विळखा, कुडमुडी लोकशाही, भ्रष्टाचाराच्या दलदलीत लडबडलेले नेते, महागाईचा विस्फोट आणि याकडे असाहाय्यपणे पाहणारी जनता असे हे सगळे दुर्दैवी चित्र पाकिस्तानात दिसून येते. पाकिस्तानचा प्रवास अराजकाकडून अराजकाच्या दिशेने सुरूच आहे. तो संपण्याची कोणतीही चिन्हे द़ृष्टिपथात नाहीत.

सगळी आयुधे संपतात तेव्हा कोणताही मुरलेला राजकारणी राष्ट्रवाद आणि धर्माचे हत्यार परजायला सुरुवात करतो. तोच मार्ग पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अनुसरला आहे. इस्लामच्या प्रचाराला उग्र राष्ट्रवादाची फोडणी देऊन जनतेचे मन जिंकण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. पाकिस्तानचा प्रवास अराजकाकडून अराजकाच्या दिशेने सुरूच आहे. तो संपण्याची कोणतीही चिन्हे द़ृष्टिपथात नाहीत.

डॉ. योगेश प्र. जाधव

Back to top button