महिला : महिला मतदारांचा संदेश | पुढारी

महिला : महिला मतदारांचा संदेश

‘आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडतात,’ हे शब्द होते रावत समाजातील एका महिलेचे. मोहनलालगंजमध्ये आपल्या पतीसोबत राहणारी ही महिला आम्हाला सरकारी योजनांचे लाभ सांगत होती. नव्याने तयार केलेल्या ई-श्रमकार्डमधून लवकरच 1000 रुपये मिळतील, या आश्‍वासनाबरोबरच तिला सरकारी अनुदानाच्या स्वरूपात रेशन आणि गॅस मिळत होता. दुसरीकडे तिच्या पतीचे मत मात्र अगदी उलट होते.

बेरोजगारी आणि वाढत्या महागाईमुळे त्याचे मत समाजवादी पक्षाकडे जाणार होते. एक्झिट पोलवर विश्‍वास ठेवायचा झाल्यास पती-पत्नीच्या विचारांमधील हे अंतर अपवादात्मक नव्हते. पूर्व उत्तर प्रदेशातील हिंदू महिला मतदारांशी संवाद साधताना आम्हाला हेच जाणवले. घरातील स्त्री-पुरुष सदस्यांच्या प्राधान्यक्रमात आम्हाला फरक दिसला. एवढेच नव्हे, तर मोदींशी भावनिक संबंधांबरोबरच कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या त्यांच्या आश्‍वासनावर महिलांचा विश्‍वासही दिसला. वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीतून कमावलेला हा विश्‍वास आहे. खरे तर, महिला मतदारांचा विश्‍वास कमावण्याचा आणि त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न 2017 मधील उज्ज्वला योजनेपासून सुरू आहे.

या योजनेअंतर्गत महिलांना मोफत गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले होेते. मोफत रेशन देण्याचे काम 2022 मध्ये केले गेले. अनेक महिला मतदारांनी असे सांगितले की, त्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांचे फोन येतात. रेशन आणण्याची आठवण या फोनवरून करून दिली जाते. परंतु ही सूचना केवळ रेशनसाठी नसायची. मोहनलालगंजमधल्याच एका गृहिणीने सांगितले की, त्यांचे फोटो सर्वत्र दिसत आहेत. म्हणजेच, लोकांच्या लक्षात राहण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यामुळे लाभदायक योजनांच्या बाबतीत वातावरणनिर्मिती झाली आणि त्यात पंतप्रधानांची कल्याणकारी प्रतिमा तसेच भाजपच्या पक्ष कार्यकर्त्यांची ताकद, या दोन्ही गोष्टी सहज एकत्रित आल्या.

संबंधित बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसामान्यांची काळजी घेणारे नेते आहेत, ही प्रतिमा निर्माण झाली. महिलांच्या राजकीय ध्रुवीकरणाचे ते एक प्रभावी साधन ठरले. महिलांमधील असा मतप्रवाह उत्तर प्रदेशात भाजपच्या विजयासाठी कारणीभूत ठरलेले घटक समजून घेण्यासाठी नक्‍कीच मदत करतो. परंतु, पंतप्रधानांबाबत निर्माण झालेले वातावरण आणि अनेक महिला मतदारांनी व्यक्‍त केलेली आत्मीयता भारतीय निवडणुकीतील महत्त्वपूर्ण बदलाचे द्योतक आहे आणि त्यावर गांभीर्याने चर्चा होण्याची गरज आहे.

एक महत्त्वाची व्होट बँक म्हणून महिला मतदारांचे झालेले ध्रुवीकरण जातीय अस्मितेच्या राजकारणाला धक्‍का देणारे ठरते. ही जी ओळख निर्माण झाली आहे, त्याचाच आपल्या राजकारणाच्या आकलनावर विशेषतः उत्तर भारतात प्रभाव पडला आहे. ईशान्येकडील वातावरण मुद्द्यांऐवजी व्यक्‍तिभोवती (मोदी) केंद्रित झालेल्या राजकारणाच्या उदयाकडे निर्देश करते. यामध्ये नेतृत्व वाढविण्यासाठी पक्षाकडून अमर्याद संसाधनांचा वापर केला जातो. राज्यशास्त्रज्ञ नीलांजन सरकार याला विश्‍वासाचे राजकारण म्हणतात. या विश्‍वासाच्या राजकारणाचा पाया म्हणून महिला मतदार उदयास येत आहेत. विशेषतः त्यांच्यासाठी चालविल्या जाणार्‍या योजनांचा त्यांना मिळत असलेला लाभ अधिक उपयुक्‍त ठरत आहे.

आम्ही महिलांशी संवाद साधला तेव्हा, जन-धन खाती उघडणार्‍या बहुतेक महिला मतदारांनी कोव्हिड-19 च्या संकटकाळात, पहिल्या लॉकडाऊनमध्ये त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले त्याची आठवण सांगितली. त्याचप्रमाणे उज्ज्वला योजनादेखील लोकप्रिय ठरल्याचे आणि महिला मतदारांना मोदींकडे आणि भाजपकडे आकर्षित करणारे साधन ठरल्याचे जाणवले. अनेक लाभार्थ्यांकडे सिलिंडर पुन्हा भरून घेण्यास पैसे नसले तरीही! ही एक प्रारंभिक रणनीती आहे, ज्यामुळे वरवर पाहता महिला मतदारांचे भाजपच्या बाजूने ध्रुवीकरण झाले.

बेरोजगारी आणि महागाईने केलेले नुकसान रेशनिंगच्या लाभाने भरून काढता येत नाही, हे महिलांनी वारंवार निदर्शनास आणून दिले असले, तरी भाजपला मतदान करण्याचे रेशनिंग हे एक प्रमुख कारण ठरल्याचे दिसते. मात्र, व्यक्‍तिगत राजकारण आणि कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिला मतदारांना आकर्षित करण्याची ही रणनीती केवळ भाजपची नाही. लोकनीती संस्थेच्या मते, तृणमूल काँग्रेसने गेल्या वर्षी पश्‍चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपवर मिळविलेल्या विजयात ममता बॅनर्जींना पसंती देणार्‍या पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक होती. बिहारमध्येही नितीशकुमार अशाच रणनीतीमुळे यशस्वी ठरले. महिला आणि पुरुष यांच्या राजकीय पसंतीतील हा स्पष्ट फरक आपल्याकडील निवडणुकीच्या वातावरणात एक नवीन घटक म्हणून उदयास येत आहे. भाजपने महिलांचे प्रभावीपणे ध्रुवीकरण केले आहे. जातीच्या राजकारणापेक्षा ही रणनीती पूर्णपणे वेगळी आहे. स्पष्ट सांगायचे झाल्यास, सध्याच्या रचनेत महिला व्यक्‍तिगतरीत्या राजकारणात सहभागी होत आहेत आणि लाभार्थी म्हणून मतदान करीत आहेत. लोकशाहीवर त्याचा दीर्घकालीन सखोल परिणाम काय होईल, याचे विश्‍लेषण आवश्यक आहे.

महिला मतदारांना भाजपशी आणि विशेषतः नरेंद्र मोदी यांच्याशी जोडणारा घटक समजून घेण्यात आणि ओळखण्यात काँग्रेस अपयशी ठरली. एक महत्त्वाची व्होट बँक म्हणून महिला मतदारांच्या उपस्थितीने भारताच्या निवडणूक राजकारणाचा मार्ग बदललेला आहे. भारतीय राजकारणाचे विश्‍लेषण करण्यासाठी मंडल-कमंडल विश्‍लेषण विचारात घेतले जात असले, तरी आता हे मुद्दे महिला मतदारांसाठी फारसे महत्त्वाचे राहिलेले नाहीत. नेत्यांचे भावनिक आवाहन त्यांना एखाद्या पक्षाशी द‍ृढतेने जोडणारे ठरते. त्यामुळे त्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आता आली आहे.

व्होट बँक म्हणून महिला मतदारांचे झालेले ध्रुवीकरण जातीय अस्मितेच्या राजकारणाला धक्‍का देणारे ठरते. विश्‍वासाच्या राजकारणाचा पाया म्हणून महिला मतदार उदयास येत आहेत. व्यक्‍तिगत राजकारण आणि कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिला मतदारांना आकर्षित करण्याची रणनीती सर्वच पक्षांची दिसून येते.

यामिनी अय्यर

Back to top button