‘द काश्मीर फाईल्स’चा वाद आणि वास्तव | पुढारी

‘द काश्मीर फाईल्स’चा वाद आणि वास्तव

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट काश्मिरी पंडितांचे पलायन आणि काश्मीर खोर्‍यातील त्यांचे हत्याकांड यावर आधारित आहे. 14 ऑगस्ट 2019 रोजी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी फर्स्ट लूक पोस्टरसह चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा केली होती. तेव्हा विवेक म्हणाले होते की, हा चित्रपट सर्वांत मोठ्या मानवी शोकांतिकेचा शोध घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यांच्या ‘ताश्कंद फाईल्स’ चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा पायंडा पाडला गेला.

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट पाहिल्यानंतर त्याबाबत सुरू असलेले आणि सुरू केले गेलेले वादविवाद डोळ्यांसमोर नाचू लागले. आपले बांधव – काश्मिरी पंडित किती सहनशील आहेत, याचा विचार करू लागलो. मग मला वाटले, आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकलो नाहीतर आपण त्यांचे भाऊ कसे? रागही आला. वाटले की, ते सहनशील कसे? त्यांनी एके-47 का नाही हातात घेतली? असे वेगवेगळे विचार मनात थैमान घालू लागले. वाटले, पडद्यावर त्यांचा विध्वंस पाहून 32 वर्षांनंतर लोक रडले. परंतु, त्या काळात काश्मीरमध्ये कसे क्रौर्य दिसले असेल?

या चित्रपटाकडे केवळ एक चित्रपट म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. अर्ध्या रात्री बेघर झालेल्या लोकांच्या वेदनांचा हा दस्तऐवज आहे. एका रात्रीत बेघर झालेल्या लोकांची संख्या सुमारे दीड ते दोन लाख असल्याचे सांगितले जाते. 2011 पर्यंत काश्मीर खोर्‍यात केवळ तीन हजार पंडित शिल्लक होते, तर ऐंशीच्या दशकापर्यंत खोर्‍यात पंडितांची संख्या एकूण लोकसंख्येच्या पाच टक्के होती. त्यांच्या कहाण्या अभावानेच समोर आल्या आहेत. आजच्या तरुण पिढीला त्या मानवी शोकांतिकेची जाणीवही नाही. हृदय पिळवटून टाकणार्‍या घटना दडपून टाकण्यात आल्या. त्यांचा लेखाजोखा समोर आणलाच गेला नाही. दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री आणि त्यांच्या पत्नी पल्लवी जोशी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी जवळजवळ 700 काश्मिरी पंडितांशी संवाद साधला. दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी प्रत्येकाची कथा आणि व्यथा ऐकली, ती रेकॉर्डही केली. अग्निहोत्री यांनी हिमालयातील एका अज्ञात स्थळी जाऊन चित्रपटाची पटकथा लिहिली. या चित्रपटाचे कथानक दर्शन कुमार या जेएनयूमधील एका विद्यार्थ्याच्या आवतीभोवती फिरते. त्याला त्याच्या बालपणाबद्दल काहीच आठवत नाही. तो प्रा. राधिका मेनन (पल्लवी जोशी) यांच्या प्रभावाखाली आपल्याच लोकांच्या नरसंहाराबाबत जाणून घेतो.

संबंधित बातम्या

चित्रपटाचा भावनिक केंद्रबिंदू पुष्करनाथ पंडित (अनुपम खेर) हा शिक्षक आहे. त्याला त्याच्या मुलाच्या निर्घृण हत्येनंतर श्रीनगरच्या घरातून हाकलून दिले जाते. तीस वर्षांनंतर त्यांचा नातू कृष्ण (दर्शन कुमार) पुष्करनाथ यांच्या अस्थी घेऊन श्रीनगरला परत येतो. आजोबांच्या जवळच्या मित्रांच्या मदतीने (मिथुन चक्रवर्ती, पुनित इस्सार, अतुल श्रीवास्तव) त्या काळ्या दिवसांबद्दल जाणून घेतो. झी स्टुडिओज निर्मित या चित्रपटाच्या निर्मितीसाठी 14 कोटी रुपये खर्च आला. चित्रपट 2 तास 50 मिनिटांचा आहे. या चित्रपटातील अनुपम खेर यांच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात यापूर्वी अभिनेता योगराज सिंग यांचीही भूमिका होती. परंतु, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या भाषणांमुळे त्याला चित्रपटातून बाहेर काढण्यात आले आणि त्यांचे पात्र पुनित इस्सार यांनी रंगविले.

‘द काश्मीर फाईल्स’च्या निर्मितीशी अनेक दुःखद घटनाही जोडल्या गेल्या आहेत. या चित्रपटाच्या लाईन प्रोड्यूसर सराहना यांनी 30 जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सराहना ही अलिगढची रहिवासी होती. याखेरीज मसूरी आणि डेहराडूनमध्ये चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री हेही सेटवर जखमी झाले. त्यांच्या उजव्या पायाला हेअरलाईन फ्रॅक्चर झाले होते. चित्रपटगृहांत येण्यापूर्वी या चित्रपटाला अनेक कायदेशीर चढउतार पार करावे लागले आहेत. उत्तर प्रदेशातील एका रहिवाशाने जनहित याचिका दाखल केली होती. त्यात असे म्हटले होते की, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असे दाखविण्यात आले आहे की, हा चित्रपट मुस्लिमांकडून काश्मिरी पंडितांच्या झालेल्या हत्येवर आधारित आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

त्यानंतर काश्मीरमध्ये शहीद झालेले स्क्वाड्रन लीडर रवि खन्‍ना यांच्या पत्नी निर्मल खन्‍ना यांनी आणखी एक याचिका दाखल केली होती. त्यांनी आपल्या पतीचे चित्रण असलेले द‍ृश्य चित्रपटातून काढून टाकावे किंवा त्यात बदल करावेत, अशी मागणी न्यायालयात केली होती. हे चित्रण वस्तुस्थितीला धरून नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. रवि खन्‍ना हे 25 जानेवारी 1990 रोजी श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (जेकेएलएफ) प्रमुख यासिन मलिक याच्या नेतृत्वाखालील गटाने हत्या केलेल्या भारतीय वायुदलाच्या चार जवानांपैकी एक होत.
मात्र, या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक यांचेही कौतुक करायला हवे. कारण, त्यांनी सर्व आव्हाने पेलून हा चित्रपट पूर्ण केला. चित्रपटाच्या केंद्रस्थानी चार मुद्दे आहेत.

पहिला म्हणजे – 1989-90 मध्ये काश्मीरमध्ये जेव्हा दहशतवादाने थैमान घातले तेव्हा परिस्थिती हाताळण्यात सरकार आणि प्रशासनाला आलेले अपयश. दुसरा, दहशतवादी संघटनांना राजकीय नेतृत्वाचे मूक सहकार्य. तिसरा मुद्दा, काश्मिरी पंडित समाजाचे विस्थापन आणि चौथा मुद्दा, उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष माध्यमे आणि बुद्धिजीवी वर्ग यांचे घनिष्ट संबंध आणि त्यातून काश्मीरबाबतचे सत्य लपविण्यासाठी त्यांनी संगनमताने तयार केलेले खोटे राजकीय कथन हा आहे. भोपाळ वायू दुर्घटना, आसाममधील नरसंहार, आर्मेनियन नरसंहार, रवांडाचा नरसंहार याबाबत जी प्रतिमा आपल्याकडे तयार आहे, तशी प्रतिमाच तयार नसलेल्या विषयावरील हा चित्रपट आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ ही काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचा आक्रोश घेऊन येणारी, अंगावर काटा आणणारी कहाणी आहे. काश्मीर फाईल्समध्ये बरेच फ्लॅश बॅक आहेत. हा चित्रपट म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीमधील एक महत्त्वाचे वळण आहे. हा चित्रपट म्हणजे विवेक आहे, (मनो) रंजन नव्हे. एक प्रकारचे अग्निहोत्रही आहे. चित्रपटाचे कथानक घट्ट बांधलेले आहे. कश्यप ऋषी, भरतमुनी, विष्णू शर्मा, अभिनव गुप्‍ता आदींचे संदर्भ चित्रपटात आहेत. आपल्याकडील चित्रपट ना वांशिक कत्तलींबद्दल बोलतात, ना विस्थापनाबद्दल. ब्रेन वॉशिंगचे तंत्र चपखलपणे प्रथमच वापरले गेले आहे. विवेक यांनी विषयाला अशी ट्रीटमेंट दिली आहे की, त्या घटनेतील दहशत नव्हे, तर शोक व्यक्‍त व्हावा. ‘सारांश’पासून आपली कारकिर्द सुरू करणारे अनुपम खेर यांनी पुन्हा एकदा अभिनयाची तीच उंची गाठली आहे. श्‍वास रोखून, सुन्‍न होऊन चित्रपट पाहावा लागतो. हा चित्रपट म्हणजे एक भावनिक आणि यशस्वी आख्यान बनले आहे. चित्रपटात काश्मिरी भाषेतील काही गाणी इंग्रजी सबटायटल्ससह वापरण्यात आली आहेत. ही गाणी वेदना द्विगुणित करणारी आहेत. यातना आणि आपल्या मातीपासून तुटण्याच्या दु:खाची भीषणता जिवंतपणे समोर येते.

गाण्यांमधील वेग, आवेग आणि हळुवार सुरावटी मंदिराच्या घंटानादाप्रमाणे कामात घुमत राहतात. काश्मिरी पंडितांना उद्देशून जिहादींनी एक नारा दिला होता, ‘रालीव गालीव चलीव…’ म्हणजे ‘धर्मांतर करा, मरा किंवा पळून जा!’ दुसरी घोषणा होती, ‘असि गच्छी पाकिस्तान, बटव रोअस त बटनेव सान…’ म्हणजे ‘आम्हाला पाकिस्तान हवा आहे आणि हिंदू महिलाही हव्या आहेत. परंतु त्यांच्या पुरुषांशिवाय!’ जिहादींची ही धमकी आपल्याला वास्तवाच्या उंबरठ्याशी घेऊन जाते. या चित्रपटाविरुद्ध स्वर आणि आवाज उठतात तेव्हा वाटते की, आपण काय करतो आहोत? काय झालो आहोत? दर्शन कुमारच्या भाषणाने चित्रपट संपायला हवा होता आणि त्यानंतरची द‍ृश्ये कथनकात कुठेतरी जोडली असती तर बरे झाले असते, असे व्यक्‍तिगत माझे मत आहे. तसे झाले असते तर दर्शन कुमारच्या शेवटच्या ओळी सर्वांना कायम टोचत राहिल्या असत्या.

‘द काश्मीर फाईल्स’ हा एक अस्वस्थ करणारा चित्रपट आहे.काश्मिरी पंडितांचे पलायन आणि काश्मीर खोर्‍यातील त्यांचे हत्याकांड या विषयावरील हा चित्रपट आहे. काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचा आक्रोश घेऊन येणारी, अंगावर काटा आणणारी कहाणी आहे. मातीपासून तुटण्याच्या दुःखाची भीषणता चित्रपटातून जिवंतपणे समोर येते. चित्रपट आणि त्यानिमित्ताने निर्माण झालेल्या वादांचा परामर्श घेणारा लेख.

कला आणि राजकारण

‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या चर्चेला अधिक जोर धरला तो, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर भाष्य केल्यामुळे! गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला, ते समोर आणले जात असल्याचे सांगतानाच त्यांनी जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करताहेत तेच विरोध करत असल्याचे म्हणत, या चित्रपटाला विरोध करणार्‍यांना खडे बोल सुनावले. हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, त्रिपुरा, गोवा या राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे.

कर्नाटक सरकारने तर विधानसभा सदस्यांसाठी या चित्रपटाचा खास शो बुक करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटावरून भाजपविरोधी गटातील अनेकांनी टीकात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. फारूक अब्दुल्ला यांनी तर; हा चित्रपट म्हणजे सत्य नव्हे, असे सांगत काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाबाबतच प्रश्‍नचिन्ह उपस्थित करून वादाला तोंड फोडले आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपमध्येही यावरून जुंपल्याचे दिसत आहे. येत्या काळात राजकीय शेरेबाजी होत राहील; पण प्रत्यक्षात तिकीट खिडकीवर हा चित्रपट यशस्वी ठरताना दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपट कला आणि वास्तव, कलेचा राजकारणासाठी केला जाणारा वापर योग्य की अयोग्य, असे अनेक मुद्दे चर्चेचे आहेत.

योगेश मिश्र

Back to top button