Russia-Ukraine War : युद्धमग्न देशांचे प्रपोगंडावर्तन | पुढारी

Russia-Ukraine War : युद्धमग्न देशांचे प्रपोगंडावर्तन

लोकांची मते, विचार, आवडीनिवडी, वर्तन हे सगळे नीट नियंत्रित करणे आणि त्यातून त्यांना अपेक्षित असा सामाजिक-राजकीय प्राणी बनविणे यासाठी केला जाणारा प्रचार म्हणजे प्रपोगंडा. युद्धप्रसंगी हा प्रपोगंडा कसा केला जातो, त्यात कोणती तंत्रे वापरली जातात, प्रपोगंडा निष्प्रभ करण्यासाठी काय केले जाते, हे पाहण्याची एक संधी रशिया-युक्रेन युद्धाने (Russia-Ukraine War) आपल्यासमोर ठेवली आहे.

‘युद्धकाळात सत्य हे एवढे मौल्यवान असते की, त्याला सतत असत्याच्या अंगरक्षकांसोबतच ठेवावे लागते.’
– सर विन्स्टन चर्चिल.

युक्रेनमधील खार्कोव्ह शहर. रशियन फौजांकडून बॉम्बवर्षाव सुरू आहे. ओलेक्सँड्रा ही 25 वर्षीय तरुणी याच शहरात राहते. तिचे आई-वडील मात्र रशियात असतात. युक्रेन-रशियात अनेक कुटुंबांत हे असे असते. आई चिंतेत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचे फोनवर बोलणे झाले. ओलेक्सँड्राने सगळी परिस्थिती सांगितली. त्यांची चिंता वाढली. पण त्यानंतर ते जे म्हणाले, ते ऐकून ओलेक्सँड्राला धक्काच बसला. ते म्हणाले, ‘अपघाताने पडले असतील ते बॉम्ब. एरवी रशियन सैनिक नागरिकांना नाही लक्ष्य करणार. ते युक्रेनीच त्यांच्या स्वतःच्या लोकांना मारत आहेत.’ ओलेक्सँड्राच्या आई-वडिलांचे म्हणणे होते की, रशियन फौजा या युक्रेनला स्वतंत्र करण्यासाठी गेल्या आहेत. ते कशाचाही विध्वंस करणार नाहीत. ते फक्त लष्करी तळांवर हल्ले करीत आहेत.

युद्धाच्या छायेत जगत असलेल्या आपल्याच मुलीला तिचे माता-पिता सांगत होते की, युद्ध होतच नाहीये. वस्तुस्थितीचा इतका विपर्यास होतो कुठून? पण असे करणारे केवळ तेच नव्हते. अनेक रशियन नागरिकांनाही तसेच वाटत होते. याचे कारण – प्रपोगंडा.

लोकांची मते, विचार, आवडीनिवडी, वर्तन हे सगळे नीट नियंत्रित करणे आणि त्यातून त्यांना अपेक्षित असा सामाजिक-राजकीय प्राणी बनविणे यासाठी केला जाणारा प्रचार म्हणजे प्रपोगंडा. अर्धसत्य, असत्य, अपमाहिती, लोकभावनांशी, त्यांच्या प्रेरणांशी केलेला खेळ, भ्रमांची आणि भीतीची, निराशा आणि संतापाची निर्मिती हा सगळा प्रपोगंडाचाच भाग. युद्धप्रसंगी हा प्रपोगंडा कसा केला जातो, त्यात कोणती तंत्रे वापरली जातात, प्रपोगंडा निष्प्रभ करण्यासाठी काय केले जाते हे पाहण्याची एक संधी रशिया-युक्रेन युद्धाने आपल्यासमोर ठेवली आहे. तशी वेळ येऊ नये, पण आलीच तर आपल्या समोर काय मांडलेले असेल हे यातून जाणून घेता येईल. आणि म्हणूनच रशिया, युक्रेन आदी देशांचे सध्याचे ‘प्रपोगंडावर्तन’ समजून घेतले पाहिजे. (Russia-Ukraine War)

यात रशिया हा आक्रमक देश. व्लादिमीर पुतीन हे रशियाचे हुकूमशहा. ते युक्रेनवर मनात येईल तेव्हा आक्रमण करू शकले असते. पण तसे करण्यात आलेले नाही. अनेकांना वाटते की, हुकूमशहावर कोणतीच बंधने नसतात. तो भ्रम आहे. हुकूमशहा असला तरी त्याला लोकभावनेची भीती असते. ज्या क्षणी लोकांचे सँक्शन – मान्यता – संपेल, त्या क्षणी आपली सत्ता संपेल हे त्याला माहीत असते. पुतीन यांनी युक्रेन युद्धास लोकांची मान्यता मिळविण्याचे पुरेपूर प्रयत्न केलेले दिसतात.

त्यासाठीचा प्रपोगंडा पाहण्यासारखा आहे. त्यांनी एक नॅरेटिव्ह – कथानक तयार केले. युक्रेनमधील राज्यकर्ते हे नाझी आहेत. नशेखोर आहेत. त्यांना रशियास अस्थिर करायचे आहे. ते युक्रेनमधील रशियन भाषिकांचे हत्याकांड करीत आहेत. या नाझींच्या तावडीतून युक्रेनी लोकांना स्वतंत्र करणे गरजेचे आहे, असे सतत लोकांच्या मनावर बिंबविण्यात आले. हे प्रपोगंडातील राक्षसीकरण आणि बदनामकरणाचे तंत्र. शिवाय यातून युक्रेनवर हल्ला केलाच तर तो न्याय्य ठरेल अशी तजवीजही करून ठेवण्यात आली होती.

कोणत्याही देशाला, मग तो आक्रमक का असेना, आपण आक्रमक आहोत असे म्हणून घ्यायला आवडत नाही. प्रत्यक्ष युद्धाच्या आधी प्रत्येक देश सतत कांगावा करीत असतो की, शत्रूराष्ट्र आक्रमक आहे. आमचे एवढे सैनिक त्यांनी मारले, त्यांनी घुसखोरी केली. हे ‘व्हिक्टिम कार्ड’ आंतरराष्ट्रीय सहानुभूती मिळवून देण्यास उपयुक्त ठरते. देशाचे नैतिक नाकही ते उंच ठेवते. रशियाचा तो प्रयत्न होताच. आपले लोक ते मारताहेत, युक्रेनी फॅसिस्ट, अतिउजवे रशियात घुसखोरी करताहेत असा त्यांचा प्रचार सुरूच होता. याचबरोबर रशियन प्रपोगंडाकारांनी लोकांच्या मनातील राष्ट्रप्रेमाला हात घातला. जुना इतिहास, पूर्ववैभव, अखंड रशिया अशी स्वप्ने समोर मांडली. युक्रेनचा क्रिमिया प्रांत रशियाला जोडून घेतानाही हेच करण्यात आले होते. आताही तेच सुरू आहे.

रशियन प्रपोगंडाचा दुसरा भाग होता – सत्याच्या अपलापाचा, अर्धसत्याचा, अपमाहितीचा, मंगलध्वनी शब्दांच्या वापराचा. युक्रेनवर रशिया आक्रमण करीत आहे, हेच अखेरपर्यंत लोकांपासून लपवून ठेवण्यात आले होते. एवढा मोठा हल्ला झाला, पण त्या दिवशी ‘रशिया टीव्ही’ या सरकारी टीव्ही आणि अन्य सरकारधार्जिण्या वाहिन्यांवर काय चालले होते? तर नेहमीचे कार्यक्रम आणि मालिका.

आपल्याकडील टीव्ही स्टुडिओ अँकरांच्या तोंडतोफांनी हादरून गेले असते. तेथे सांगण्यात येत होते की, रशियाने युक्रेनवर ‘खास लष्करी कारवाई’ केली आहे. हा वस्तुस्थितीची टोके बोथट करणारा मंगलध्वनी शब्द. हल्ला, आक्रमण, युद्ध या शब्दांवर तेथे बंदीच घालण्यात आली आहे. ज्यांनी ती मानली नाही, त्या माध्यमांनाच टाळे ठोकण्यात आले. आणि आता तर रशियाने फेक न्यूजबाबत कायदाच केला आहे. (Russia-Ukraine War)

फेक न्यूज पसरविणार्‍यांना 15 वर्षे कारावास. पण फेक न्यूज काय हे कोण ठरविणार? तर सरकार. माहितीला पाटबंधारे लावणे हा प्रपोगंडाचाच प्रकार. यामुळे नागरिकांसमोर येत गेले ते सरकारी साच्यातील चित्र. ते पुतीन ब्रँडच्या चष्म्यातूनच युक्रेनकडे पाहत बसले. काहींनी असे पाहणे नाकारले, युद्धविरोध केला, पण ती संख्या फारच कमी. त्यातील काहींना तर कारावासात डांबण्यात आले. हीसुद्धा पुन्हा सेन्सॉरशिपच. हे झाले आक्रमकांचे प्रपोगंडावर्तन. ज्या राष्ट्रावर आक्रमण होते, त्यांचा ‘प्रपोगंडा’ कसा असतो?

युक्रेनचा प्रपोगंडा तीन स्तरांवर चाललेला दिसतो. पहिला स्तर – जनतेचे मनोधैर्य कायम ठेवण्याचा. दुसरा – रशियाचे मनोधैर्य नष्ट करण्याचा आणि तिसरा – रशिया या ‘माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू’ हे जगास सांगण्याचा. लोकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी ऐतिहासिक मिथकांचा नेहमीच वापर केला जातो. शूरवीरांच्या कथा समोर आणल्या जातात. युक्रेनने ते केलेच, पण नव्या मिथकांची निर्मितीही केली. त्यातील एक – ‘घोस्ट ऑफ किव्ह’. वायुसेनेतील एका वैमानिकाला हे नाव देण्यात आले. त्याने 24 फेब्रुवारीला सहा रशियन विमाने पाडली, असे सांगण्यात येते.

असाच एक आहे – युक्रेनियन रिपर. त्याने एकट्याने 20 रशियन सैनिकांना मारले. आणखी एक कथा सांगितली जाते, एका मांजरीची. तिला नाव देण्यात आले आहे – ‘पँथर ऑफ खार्कोव्ह.’ त्या मांजरीने चार रशियन स्नायपर शोधून काढले, असे सांगण्यात येते. समाजमाध्यमांतून पसरलेल्या या कथा. त्यात सत्यांश अभावानेच! पण अशा कथा युद्धकाळात ऊर्जादायी ठरतात. याच काळात युक्रेनकडून आणि अर्थातच ‘नाटो’ देशांकडून सातत्याने रशियन हानीच्या, अपयशाच्या बातम्या पसरविण्यात येत आहेत. त्याचवेळी रशियन सैनिकांच्या आई-वडिलांना भावनिक आवाहने करण्यात येत आहेत.

पकडलेल्या रशियन सैनिकांना युक्रेन कशी माणुसकीची वागणूक देत आहे, याच्या ध्वनिफिती जगभर पसरविण्यात येत आहेत. आणि त्याच वेळी रशियन फौजांकडून कशा प्रकारे बालवाड्यांवर, इस्पितळांवर, नागरी वस्त्यांवर हल्ले करण्यात येत आहेत हे उच्चरवाने सांगण्यात येत आहे. आपण अन्यायग्रस्त, तरीही हिमतीने लढत आहोत. शत्रू मात्र भेकड आणि हिंस्र. अशा प्रकारच्या भावना निर्माण करणारा प्रपोगंडा युक्रेनकडून प्रसारित करण्यात येत आहे. (Russia-Ukraine War)

आक्रमक आणि आक्रमित देशांचे हे प्रपोगंडावर्तन. यातून आपण काय धडा घ्यायचा? एकंदरच रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने आपल्यालाही मोठा सावधगिरीचा इशारा दिलेला आहे. या युद्धाने हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे की, युद्धपद्धतीची पाचवी पिढी आता अवतरलेली आहे. त्यात बंदुका, रणगाडे, विमाने आणि क्षेपणास्त्रे हे सारे सारे वापरले जाते. त्या अर्थी ते नेहमीचेच युद्ध. पण त्याचबरोबर ते असते संगणकाच्या आभासी अवकाशातील सायबरवॉर आणि मनाच्या मैदानावर लढले जाणारे सायवॉर. सायबरवॉरमध्ये संगणकीय आयुधे वापरून शत्रूराष्ट्रातील वीज-पाणी-वाहतूक आणि संदेशवहन यांसारख्या मूलभूत सेवा, कारखाने, आर्थिक संस्था यांच्यावर हल्ले करून ते उद्ध्वस्त केले जातात.

सायवॉर हे असते माहितीचे, लोकानुबोध म्हणजेच पर्सेप्शनचे. नॅरेटिव्ह म्हणजे आपणास हवे ते कथानक लोकमानसात द़ृढ करण्याचे आणि प्रपोगंडाचे युद्ध. अपमाहिती, अर्धसत्ये, असत्ये, फेक न्यूज ही त्याची शस्त्रे असतात. दूरचित्रवाणी, नभोवाणी, वृत्तपत्रे, चित्रपट यांसारखी जनमाध्यमे आणि फेसबुक, व्हाट्स अ‍ॅप, टिकटॉक, ट्विटरादी समाजमाध्यमे यांद्वारे ते थेट आपल्याला, सामान्य नागरिकांना भिडत असते. ते अविरत सुरू असते. आणि म्हणूनच ते अधिक चिंताजनक असते.

या प्रपोगंडाचा सामना करण्याचा एकच मार्ग असतो – प्रश्न विचारणे, संशयात्मा बनणे. आपल्यासमोर मांडलेली गोष्ट, मग ती कोणतीही असो – ती तपासून घेणे. कोणत्याही गोष्टीचे सर्वसामान्यीकरण टाळणे. देशाच्या सेवेचा तोही एक मार्ग आहे.

रवि आमले

Back to top button