सिंहायन आत्मचरित्र : शाहू विचारांचा जागर | पुढारी

सिंहायन आत्मचरित्र : शाहू विचारांचा जागर

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव मुख्य संपादक, दैनिक पुढारी

‘झाले बहु, होतील बहु, परि यासम हाच!’
पाच नोव्हेंबर 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी ‘पुढारी’ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमाप्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी 

1974  युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यारोहण सोहळ्याला तीनशे वर्षे पूर्ण होत होती आणि नेमकं याच वर्षात लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांची जन्मशताब्दी आली होती. या दोन्ही महापुरुषांबद्दल माझ्या मनात नितांत श्रद्धा होती. हे दोन्ही महापुरुष म्हणजे माझ्यासाठी आराध्य दैवतच. हे दोन्ही सोहळे ‘न भूतो..’ अशा थाटात साजरे करण्याचा मी कृतनिश्चय केला. मी महापालिकेत बैठक आयोजित केली. एक व्यापक समिती स्थापन व्हावी व तिचे अध्यक्षस्थान मीच स्वीकारावं, असा सर्वांचाच आग्रह होता.

पण तत्कालीन जिल्हाधिकारी शशिकांत दैठणकर हे दलित समाजाचे होते, त्यामुळं समितीचं अध्यक्षस्थान त्यांनाच दिलं, तर ते शाहूविचारांना साजेसं होईल, असं मत मांडून मी ते अध्यक्षस्थान दैठणकर यांच्याकडे सोपवलं. पण लोकाग्रहास्तव मला कार्याध्यक्षपद स्वीकारावं लागलं. त्यानंतर लोकांच्या अमाप उत्साहात हे दोन्ही सोहळे साजरे झाले. शाहू स्मारक भवन उभारण्याचा निर्णयही त्याचवेळी झाला. 30 जूनला मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते शाहू स्मारक भवनाच्या इमारतीचं भूमिपूजन झालं. वर्षभर मी आणि शशिकांत दैठणकर यांनी सर्वत्र फिरून पन्नास लाखांच्या निधीची पूर्तताही केली. 3 फेब्रुवारी 1981 रोजी शाहू स्मारक भवनचं उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या हस्ते करण्यात आलं.

त्यानंतर 1990 मध्ये आणखी एक घटना घडली. एकवेळ मी आर्थिक तोटा सहन करीन, परंतु सामाजिक आणि सांस्कृतिक अधःपतन कदापिही सहन करणार नाही. त्यातून माझ्या आराध्य दैवतांच्या चारित्र्यावर जर कुणी शिंतोडे उडवले, तर मी कधीच गप्प बसणार नाही. अशीच एक अत्यंत दुर्दैवी घटना 1990 साली घडली आणि मला अन्यायाविरुद्ध पेटून उठावं लागलं.

झालं असं की, एके दिवशी ‘पुढारी’च्या लेखा विभागात काम करणारे अनंत बळवंत करवीरकर हे माझ्याकडे आले. ते इतिहासप्रेमी गृहस्थ होते. त्याहीपेक्षा त्यांना इतिहास संशोधक म्हटलं, तरी ते वावगं होणार नाही. त्यांच्या हातात एक जाडजूड ग्रंथ होता. तो ग्रंथ पाहून मला वाटलं की, ते अकौटिंगमधला काहीतरी प्रॉब्लेम घेऊन आले असावेत. पण तसं नव्हतं. त्यांच्या हातात कोल्हापूर गॅझेटियर होतं. 1990 मध्ये ते प्रकाशित झालं होतं.

करवीरकरांनी त्यातील सोळा पानांवर खुणा करून आणल्या होत्या. ती सोळा पानं मी वाचू लागलो. एकेक पानागणिक माझ्या मनात संतापाच्या लाटा उसळू लागल्या. डोकं बधिर होऊन गेलं! तो मजकूर वाचून मला धक्काच बसला! कोणीतरी कि. का. चौधरी त्याचे संपादक होते. हे ‘कि. का.’ कोण? त्यांचा राजर्षींविषयीचा अभ्यास किती? त्यांना हा अधिकार कोणी आणि कोणत्या निकषांवर दिला? हे सारे प्रश्न अनुत्तरितच होते! मात्र, गॅझेटियरमधील मजकूर पाहता त्यांना बहुधा राजर्षी शाहूद्वेषाची कावीळच झाली असावी. या गृहस्थानं शाहू छत्रपती हे ब्रिटिशधार्जिणे असल्याचा जावईशोध लावला होता! आणि त्या अनुषंगानं लिखाण करताना महाराजांच्या व्यक्तिमत्त्वावर चिखलफेक करण्यात आली होती.

हा मजकूर सरकारी गॅझेटियरमध्ये आल्यानं त्याला वेगळंच महत्त्व प्राप्त झालं होतं. किंबहुना त्याला शासनमान्यता मिळाल्यासारखाच प्रकार झाला होता. उद्या एखाद्या शाहूप्रेमी माणसाला किंवा एखाद्या अभ्यासकाला संदर्भ पाहायचा झाला, तर तो गॅझेटियरचा वापर करणार, हे निश्चितच! साहजिकच त्याद्वारे सत्याचा अपलाप करणारा मजकूर त्यांच्या हातात पडणार, हेही सूर्यप्रकाशाइतकेच स्वच्छ होतं! त्यामुळे या प्रकाराकडे गांभीर्याने पाहणं अत्यंत आवश्यक होतं.

राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर आणि चारित्र्यावर अनेक शाहिरांनी आणि साहित्यिकांनी तसेच इतिहासकारांनी या आधीच प्रकाशझोत टाकला असून, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं यथार्थ वर्णन केलेले आहे. राजकवी शं. ब. भोसले यांनी राजर्षींच्यावर; किंबहुना एकूणच त्यांच्या कारकिर्दीवर प्रदीर्घ पोवाडा लिहिलेला आहे.

तसेच अण्णासाहेब लठ्ठेंसारख्या शाहू महाराजांच्या समकालीन लेखकानं दोन खंडात लिहिलेला ‘The Memorise of Rajashri Shahu Maharaja’  हा महाराजांवरचा चरित्रग्रंथ खूपच माहितीपूर्ण आहे. शिवाय धनंजय कीर यांचा ’Rajashri Shahu a Royal Revolutionary’ हा अत्यंत महत्त्वाचा चरित्रग्रंथ. इतकेच नव्हे, तर समकालीन भाई माधवराव बागलांनी लिहिलेल्या ‘शाहू महाराजांच्या आठवणी’ आणि असंख्य विचारवंतांच्या चौकस, चौरस आणि चौफेर द़ृष्टिकोनातून साकारलेला आणि शासनानंच प्रसिद्ध केलेला, ‘राजर्षी शाहू गौरवग्रंथ’ याद्वारे हा रयतेचा राजा जनमानसाच्या मनःपटलावर विराजमान झालेला आहे. अशा थोर राजाबद्दल अपलाप करणारा मजकूर वाचून माझं मन पेटून उठलं होतं.

त्या प्रकरणावर बॉम्ब टाकण्यासाठी मी करवीरकरांनाच या विषयावर सणसणीत लेख लिहायला सांगितलं. करवीरकरांनीही त्यावर ‘गॅझेटियर की भाकडकथांचे चोपडे!’ या मथळ्याखाली या विषयावर एकूण दोन लेख लिहिले. त्यांनी ते मला दाखवले. गॅझेटियरमधील कितीतरी चुकांवर या लेखात प्रकाशझोत टाकण्यात आला होता. या लेखांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करून हे दोन्ही लेख ‘पुढारी’तून प्रसिद्ध करण्यात आले! बॉम्ब फुटला होता! या लेखांनी सार्‍या महाराष्ट्रात खळबळ माजली!

तर ‘पुढारी’ कार्यालयात मी सर्वपक्षीय बैठक बोलावली आणि या चुकीचं लिखाण असलेल्या गॅझेटियरच्या विरुद्ध आंदोलन करण्याचं सर्वांना आवाहन केलं. त्यावेळी सर्वसंमतीनं माझ्याच अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आणि आम्ही गॅझेटियरविरुद्ध दंड थोपटून उभे राहिलो. कोल्हापूरमध्ये फार मोठं आंदोलन उभं राहिलं!

दै. ‘पुढारी’ कार्यालय
दै. ‘पुढारी’च्या कार्यालयात बसप नेते कांशीराम व उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती मायावती यांच्यासमवेत चर्चा करताना मी. शेजारी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील.

सरकारी गॅझेटमध्ये राजर्षी शाहू महाराजांची बदनामी झाल्याचं उघड होताच सर्वत्र संतापाची लाट उसळली. समाजाच्या सर्व थरातून त्याचा निषेध होऊ लागला. ‘पुढारी’तील त्या लेखांमुळे राज्य सरकारच्या हेतूवरच शंका निर्माण झाली आणि त्यामुळे राज्य सरकारविषयी लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. राजर्षींसारख्या असामान्य व्यक्तिमत्त्वाविषयी असं विपर्यास्त लेखन कुणी करूच कसं शकतं? ज्यांच्या आदर्शावर समाजगाडा चालतो, ज्यांच्या मळलेल्या वाटेवरून राज्यशकट हाकला जातो, त्या विशाल व्यक्तिमत्त्वाची बदनामी करण्याची हिंमत होते तरी कशी? आपल्या प्रत्येक भाषणात राजर्षींचं नाव घेतल्याशिवाय ज्यांचं भाषण पूर्णच होऊ शकत नाही, अशा सर्वपक्षीय नेत्यांपैकी एकही नेता या आंदोलनात सक्रिय होण्यासाठी पुढे आला नाही!

मात्र, मी आंदोलनाचा झेंडा खाली पडू दिला नाही. करवीरकरांच्या लेखांनी रान उठलं असतानाच, गॅझेटियरविरोधात मी 4 ऑक्टोबर 1990 रोजी जळजळीत अग्रलेख लिहून त्यात अशा रोगट प्रवृत्तींवर प्रहार केलाच; परंतु राज्य सरकारच्या कारभाराविषयीही मी शंका व्यक्त केली.

राजर्षींशी कोल्हापूरकरांची भावनिक नाळ जुळलेली. साहजिकच ‘पुढारी’तील लेख, अग्रलेख, बातम्यांतून जनआंदोलन उभं राहणं अपरिहार्यच होतं आणि त्याचं नेतृत्व माझ्याकडेच येणं, हेही अपरिहार्यच होतं! मग, माझ्या नेतृत्वाखाली एक व्यापक शिष्टमंडळ तत्कालीन जिल्हाधिकारी अजितकुमार जैन यांना भेटलं. ती तारीख होती 30 ऑक्टोबर 1990. या निवेदनाद्वारे गॅझेटियरमधील आक्षेपार्ह लिखाण रद्द करण्याची मागणी आम्ही केली.

त्यानंतरही सातत्यानं ‘पुढारी’नं रान उठवलं आणि लढा जिवंत ठेवला. पुढे 1990 च्या डिसेंबरात नागपूर अधिवेशन सुरू झाले. तोपर्यंत हा प्रश्न इतका तापला होता की, तो आपोआपच विधानसभेच्या ऐरणीवर आला. या प्रश्नावर विधानसभेत चांगलाच गोंधळ उडाला. विरोधी पक्षांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. शेवटी राज्यमंत्री अरुण गुजराथी यांना गॅझेटियरचं संपादक मंडळ बरखास्त केल्याची घोषणा करावी लागली!

परंतु, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मात्र अशा निर्णयाची आपल्याला माहिती नाही, असं सांगितलं. आपल्याच मंत्रिमंडळातील एखादा सहकारी मंत्री, एखाद्या सार्वजनिक आणि भावनिक प्रश्नावर निर्णय घेतो, तशी घोषणा सभागृहात करतो, तरीही ते मुख्यमंत्र्यांना माहीत नसणं, हे फारच अजब होतं. त्यावर मी मग 24 डिसेंबर 1990 रोजी ‘वा रे विद्वान! वा रे सरकार!’ हा जळजळीत अग्रलेख लिहिला आणि मग त्यानंतर ‘पुढारी’तून मी या विषयाचा पिच्छाच पुरवला.

अखेर ‘पुढारी’नं सुरू केलेल्या या लोकलढ्याला यश आलं! दरम्यानच्या काळात राज्यात खांदेपालट झाली. शरद पवार केंद्रात गेले आणि त्यांच्या जागी सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. नाईक यांनी 1 डिसेंबर 1991 रोजी, गॅझेटियरमधील वादग्रस्त विधानं रद्द केल्याचं जाहीर केलं आणि मग 16 जानेवारी 1992 रोजी वादग्रस्त सोळा पानं रद्द करण्यात आली.

त्याचवेळी कोल्हापुरात झालेल्या 65 व्या मराठी साहित्य संमेलनातही या प्रकरणाचे पडसाद उमटले. या संमेलनाचा कार्याध्यक्ष मीच होतो. संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात, राजर्षींच्या बदनामीचा मजकूर छापणार्‍या ‘किका’ आणि त्यांच्या संपादक मंडळाचा निषेध करण्यात आला आणि सुधारित गॅझेटियर प्रसिद्ध करावं, असा ठरावही करण्यात आला. सर्वात वाईट बाब म्हणजे फुले, शाहू आणि आंबेडकरांचा उदोउदो करणार्‍या महाराष्ट्र सरकारकडून गॅझेटमध्ये सुधारणा करण्याचा निणय घेण्यास कमालीची दिरंगाई झाली.

26 जुलै 1997 हा दिवस उत्तर प्रदेशासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. तसाच तो महाराष्ट्रासाठीही ऐतिहासिक स्वरूपाचा होता. याच दिवशी कानपूरमध्ये अतिभव्य असा ‘शाहू महोत्सव’ साजरा करण्यात आला, तोही मायावती या एका दलित नेतृत्वाच्या पुढाकारानं! महाराष्ट्रात खुद्द राजर्षींचे वंशजच ‘थंड’ असताना उत्तर प्रदेशातील काँग्रेस, समाजवादी आदी सर्वच विरोधी पक्षांचा प्रचंड विरोध धाब्यावर बसवून मायावतींनी हा गौरवास्पद निर्णय घेतला होता. एरवी पुरोगामित्वाचा डांगोरा पिटणार्‍या काँग्रेस आणि समाजवादी पक्षांना राजर्षी शाहूंच्या नावाची ‘अ‍ॅलर्जी’ असावी, याचं मोठं आश्चर्य वाटलं!

या महोत्सवाची प्रेरणा मात्र ‘पुढारी’चीच होती, हे मुद्दाम नमूद करावंसं वाटतं. ही गोष्ट प्रत्यक्ष बहुजन समाज पार्टीचे सर्वेसर्वा कांशीरामजी यांनी वेळोवेळी अगदी दिलखुलासपणे मान्य केली होती. कांशीराम यांची ‘पुढारी’शी जवळीक फार पूर्वीपासूनची! ते पुण्यात शिक्षणासाठी असल्यापासूनच त्यांची माझी ओळख. पुण्यातील वास्तव्यात त्यांचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्याशी मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते आणि कोळसे-पाटील यांचे नि माझेही मैत्रीचे संबंध. त्यामुळे मित्राचा मित्र तो आपलाही मित्र, या काव्यगत न्यायानं माझी नि कांशीराम यांचीही जवळीक वाढली होती.

एकदा बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम आणि मायावती मला भेटण्यासाठी कोल्हापूरला आले होते. त्यावेळी ‘पुढारी’च्या कार्यालयामध्ये त्यांनी माझ्याशी दोन तास सविस्तर चर्चा केली. त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो, “उत्तर प्रदेशात तुम्ही सत्तेवर आलात, तर शाहूंच्या नावे जिल्हा करावा आणि एखादी स्मारकाची वास्तू उभारून तिथं राजर्षींचा पुतळा उभा करावा!”क्षणाचाही विलंब न करता मायावतींनी मला तसं आश्वासनच देऊन टाकलं. खरं तर राजकीय नेत्यांनी दिलेली आश्वासनं कधी कधी तिथल्या तिथेच हवेत विरून जात असतात, असा आपला अनुभव असतो. पण मायावतींनी दिलेला शब्द शब्दशः पाळला. सत्तेवर येताच त्यांनी आश्वासनाची पूर्तता केली.

त्या भेटीत मी कांशीराम आणि मायावतींना राजर्षी शाहू महाराजांवरील काही चरित्रग्रंथ मुद्दाम वाचायला दिले होते. शिवाय वेळोवेळी झालेल्या दूरध्वनी संभाषणांमध्ये शाहूरायांच्या कार्याची माहिती विशद केली होती. पुढे सत्तेवर आल्यानंतर मायावतींनी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याला अनुलक्षून कानपूर जिल्ह्याचं नामकरण ‘शाहूजीनगर’ असं केलं. राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कार्यकाळात कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय समाजाची परिषद घेऊन तीत मार्गदर्शनही केलं होतं. त्या ऐतिहासिक क्षणाची स्मृती आणि त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून हे नामकरण करण्यात आलं. इतकंच करून मायावती थांबल्या नव्हत्या, तर त्यांनी तिथल्या विद्यापीठाला आणि रुग्णालयालाही शाहूरायांचं नाव दिलं होतं! तसेच दलित-पददलित समाजातील मुलांसाठी स्पर्धा परीक्षेच्या तयारीचं केंद्रही तिथं स्थापन करण्यात आलं होतं.

1997 मध्ये उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाचं सरकार आल्यावर मुख्यमंत्री मायावती यांनी कानपूर येथे शाहू जयंती महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.
1 जून 1997 च्या शेवटच्या आठवड्यात कांशीराम यांनी फोन करून, कानपूर येथे साजरा करण्यात येणार्‍या शाहू महोत्सवाची कल्पना दिली. शिवाय या महोत्सवात माझ्यासह समस्त कोल्हापूरकरांनी सहभागी व्हावं, अशी गळही घातली. कोल्हापूर ही राजर्षींची जन्मभूमी आणि कर्मभूमी. त्यामुळे या सोहळ्यात कोल्हापूरकरांचा सहभाग असावा, अशी कांशीराम आणि मायावतींची इच्छा होती. इतकंच नव्हे, तर या सोहळ्याला कोल्हापूरकरांना उपस्थित राहता यावं म्हणून मायावतींनी खास रेल्वेची सोय केली होती. महोत्सवासाठी कोल्हापुरातून पाठवण्यात येणार्‍या लोकांची जबाबदारी मी घेतली. दूरध्वनीवरून माझी त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा झाली. या चर्चेत मी त्यांना अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याची त्यांनी हमीही दिली.

राजर्षी शाहू जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी बसपा सरकारनं 26 जुलै 1997 ही तारीख निश्चित केली होती. हा महोत्सव ‘न भूतो न भविष्यती’ असा धुमधडाक्यात साजरा करण्याचा निश्चय मायावतींनी केला होता. माझं कांशीराम यांच्याशी जूनमध्ये दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणानुसार, मायावती आणि कांशीराम यांच्या सूचनेवरून माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील हे कोल्हापूरला आले.
आम्हाला भेटण्याअगोदर त्यांना बाबुराव धारवाडे भेटले होते. धारवाडे यांनी ‘कानपूरला लोक पाठवायचे म्हणजे खूप खर्च येईल’, असं सांगून कानपूरला जाण्याच्या खर्चापोटी कोळसे-पाटलांकडून दोन लाख रुपये घेतले!

नंतर कोळसे-पाटील जेव्हा मला भेटायला आले, तेव्हा त्यांनी महोत्सवाच्या तयारीविषयी बोलण्याच्या ओघात ही बाब मला सांगितली. ते ऐकून मला धक्काच बसला! कानपूरला जाण्याचा खर्चही कोल्हापूरकर स्वतःच्या खिशातून करू शकत नाहीत, त्यासाठी एखाद्या निवृत्त न्यायाधीशांकडून रक्कम स्वीकारण्याची वेळ येते, हे कोल्हापूरच्या प्रतिष्ठेला मुळीच शोभणारं नव्हतं!
मी बाबुराव धारवाडे यांना तत्काळ बी. जी. कोळसे-पाटील यांच्याकडून स्वीकारलेली रक्कम परत करण्यास भाग पाडलं. तिकडं जाण्यासाठी जो काही खर्च येणार होता, त्याचा भार मी स्वतः उचलला. या महोत्सवासाठी कोल्हापुरातून खास रेल्वेनं बाराशेहून अधिक प्रतिनिधी पाठवण्यात आले आणि मी अभिमानानं सांगतो, त्याचा सर्व खर्च ‘पुढारी’नं उचलला!

कोल्हापूरकरांना या सोहळ्याचे वेध लागले. ‘पुढारी’भवनात याबाबत जवळजवळ रोजच बैठका होत. त्यामध्ये तयारीचा आढावा घेतला जाई. 23 जुलैला खास रेल्वेमधून कोल्हापूरकर लखनौला रवाना होणार होते. त्यामध्ये शाहिरी पथके, सामूहिक गीतगायकांचे ताफे, सुमारे शंभरावर पैलवान, पन्नासवर क्रीडापटू, शिवाय धनगरी ढोलकरी, झांजपथकं, हलगी पथकं, लेझीम पथकं तसेच मल्लखांब करणारे कसरतपटूंचे चमू आणि लाठी-बोथाटी, फरीगदगा, विटा, दांडपट्टा अशा हत्यारांत प्रवीण असलेल्या मर्दानी खेळांचे ताफे अशी सुमारे 1200 जणांची विविध पथकं लखनौला जाण्यासाठी सिद्ध झाली. त्यांच्यासोबत शहरातील प्रमुख कार्यकर्तेही लखनौला जाणार होते.
23 जुलै रोजी ठीक सायंकाळी मी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर खास रेल्वेनं लखनौकडे प्रस्थान ठेवलं.

कोल्हापूरच्या पथकांना त्यांच्या कलाविष्कारासाठी दोन दिवस देण्यात आले होते. त्याचा पुरेपूर फायदा उठवीत कोल्हापूरकरांनी 25 आणि 26 हे दोन्ही दिवस अक्षरशः गाजवले. प्रामुख्यानं मर्दानी खेळ, शाहिरी पोवाडे, कलापथकांची गाणी, धनगरी ढोल आणि धनगरी गजा अशा विविध कलाप्रकारांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. उत्तर प्रदेशच्या कानाकोपर्‍यातून तसेच बिहार आणि पश्चिम बंगालमधूनही लोक या सोहळ्याला आले होते.

मल्लखांबावरील कसरती पाहून तर प्रेक्षक थक्कच झाले. तसेच धिप्पाड भीमकाय मल्ल पाहूनही लोक अचंबित झाले. एकूणच कोल्हापूरकरांनी सार्‍यांची मनं जिंकली, यात संशयच नाही. खरं तर एवढ्या लांबवर 1200 लोक पाठवणे आणि त्यांची जाण्या-येण्याची तसेच तिथं राहण्याचीही चोख व्यवस्था करणे, ही एक कसोटीच होती. परंतु, नियोजनपद्धतीनं ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यात आली.

या सोहळ्यासाठी सुमारे पन्नास हजार लोक बसतील, असा भव्य मंडप उभारण्यात आला होता. या जयंती सोहळ्यात महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जयजयकार करण्यात आला. या प्रसंगाचं स्मरण म्हणून ‘पुढारी’च्या वतीनं मुख्यमंत्री मायावती यांना तीन फुटी ब्राँझमधला शाहू महाराजांचा पुतळा भेट म्हणून देण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या दालनातच त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

कोल्हापूरचे माजी महापौर बंडा नायकवडी हे प्रकृतीनं धिप्पाड. रंगभूषा आणि वेशभूषा केली की, ते हुबेहूब शाहू महाराज दिसायचे. त्यामुळे त्यांना शाहू महाराजांची भूमिका देऊन शाहूरायांनी अस्वलाशी केलेल्या कुस्तीचा जिवंत प्रसंग कार्यक्रमात सादर करण्याचं ठरलं होते. त्याप्रमाणे त्यांनी शाहू महाराजांची रंगभूषा आणि वेशभूषा केली. या नाट्यप्रसंगासाठी अर्थातच एका जिवंत अस्वलाची आवश्यकता होती. त्यासाठी अस्वल मिळवणं ही महाकठीण गोष्ट होती. महत्प्रयासानं एका दरवेशाला गाठून त्याला भाड्यानं अस्वल देण्यासाठी राजी केलं.

मग बंडांबरोबर चार दिवस कोल्हापुरात अस्वलाची तालीमही केली. दरवेशी सोबत असल्यामुळे अस्वल दरवेशाचे हुकूम ऐकत असे. त्यामुळे त्यानं बंडांना काही इजा केली नाही. कुस्तीचा प्रसंग छान वठत होता. मी स्वतः जाऊन तो तालमीमध्ये पाहिला आणि बंडांना शाबासकी दिली. कानपूर महोत्सवात हा नाट्यप्रसंग गाजणार, याबद्दल माझी खात्रीच झाली. आता प्रश्न होता, तो हे अस्वल कानपूरला कसं न्यायचं याचा. रेल्वेतून प्राणी न्यायला परवानगी नसल्यामुळे चार दिवस आधीच एका टेम्पोमधून ते अस्वल आणि त्याच्या दरवेशाला कानपूरला पाठवून देण्यात आलं.

तयारी जय्यत झाली. तो नाट्यप्रसंग सादर करण्याची वेळ झाली. प्रेक्षकांसह सर्व कलावंतांची उत्सुकता शिगेला पोहोचली. बंडा नायकवडींनी शाहू महाराजांच्या वेशात प्रवेश केला. मात्र, एकाचवेळी लाखो टाळ्यांच्या कडकडाट झाला. लोकांनी उत्स्फूर्तपणे शाहूरायांच्या नावाचा जयजयकार केला. तेवढ्यात विंगेतून स्टेजवर अस्वल सोडण्यात आलं. जिवंत अस्वल पाहून लोकांनी पुन्हा एकदा टाळ्यांचा पाऊस पाडला.

प्रसंग रंगात आला. अस्वलानं बंडांवर झेप घेतली. बंडांनी त्याचे दोन्ही पुढचे पाय घट्ट पकडून ठेवले. परंतु, अस्वल एकाएकी बिथरलं. ते बंडांना सहकार्य करेना. त्याची दोन कारणं होती. एकतर तालमीत दरवेशी त्याच्याजवळ असायचा आणि तो त्याला आवाज मारून कंट्रोल करायचा. दुसरं कारण तालमीत प्रॅक्टिस करताना बंडा साधा पोशाख घालीत असत. त्यांना शाहू महाराजांच्या पोशाखात अस्वल प्रथमच बघत होतं. त्यामुळे त्याची बंडांशी जी थोडीफार ओळख झाली होती, ती इथं पुसली गेली. त्या अस्वलाला वाटलं की, हा कुणीतरी दुसराच माणूस आहे आणि स्वसंरक्षणार्थ ते बंडांवर हल्ला करू लागलं! त्यांना नखांनी ओरबाडू लागलं. बंडा मुळातच पैलवान असल्यामुळे त्याचा प्रतिकार नेटानं करीत होते आणि ते पाहून प्रेक्षकांतून टाळ्यांचे धबधबे कोसळत होते.

बरं, काही झालं तरी तू स्टेजवर जायचं नाही, अशी दरवेशाला आधीच ताकीद दिलेली असल्यामुळे दरवेशी विंगेतच हात चोळीतच बसला. अस्वल चांगलंच बिथरलं होतं. ते बंडांच्या पकडीतून सुटण्यासाठी त्यांना ओरबाडून रक्तबंबाळ करू लागलं. आता मात्र बंडांचा ताबा सुटला आणि राग अनावर होऊन बंडांनी त्या अस्वलाचा गळाच घोटला! अस्वल गतप्राण होऊन रंगमंचावर कोसळलं! प्रेक्षकांनी अक्षरशः उठून टाळ्या वाजवल्या. तो प्रसंग जिवंत झाला खरा; पण बिचारं अस्वल मात्र जीवाला मुकलं!
त्या प्रसंगानं कानपुरात असेपर्यंत तिथले लोक बंडा नायकवडींनाच शाहू महाराज समजून, त्यांच्या पाया पडू लागले.
कांशीराम यांनी या सोहळ्यामध्ये भाषण करताना महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांचे कान चांगलेच उपटले. पुणे विद्यापीठास राजर्षी शाहूंचं नाव देण्यात यावं, या मागणीसाठी सुमारे 15 लाख लोकांच्या सह्यांचं निवेदन कांशीराम यांनी राज्यातील तत्कालीन काँग्रेस सरकारकडे दिलं होतं. कांशीराम यांची एकदा मुर्शिदाबाद येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी भेट झाली होती. त्यावेळी पवारांनी त्यांना आश्चर्यानं विचारलं,

“कानपूर विद्यापीठाला तुम्ही शाहू महाराजांचं नाव देणार आहात असं ऐकतो. ही गोष्ट खरी आहे का?”
“शंभर टक्के खरी आहे!” कांशीराम ठणकावून म्हणाले, “जे तुम्ही महाराष्ट्रात नाही केलं, ते आम्ही उत्तर प्रदेशात करून दाखवलं!”
त्यावर शरद पवार निरुत्तर झाले. कारण कांशीराम यांच्या बोलण्याला एक ज्वलंत पार्श्वभूमी होती. शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाच, कांशीराम यांनी पुणे विद्यापीठास राजर्षी शाहू महाराजांचं नाव द्यावं म्हणून एक-दोन नव्हे, तर 15 लाख लोकांच्या सह्यांचं निवेदन महाराष्ट्र सरकारला म्हणजेच पर्यायानं शरद पवार यांना दिलं होतं. परंतु, त्या निवेदनाचं पुढे काय झालं हे समजत नाही.
25 जुलै 2002 हा दिवस ‘पुढारी’च्या द़ृष्टीनं महत्त्वाचा ठरला. त्या दिवशी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती आणि कांशीराम यांनी ‘पुढारी’ला सदिच्छा भेट दिली. त्यांनी उत्तर प्रदेशात ‘छत्रपती शाहूजी महाराज इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ नावाची वैद्यकीय संस्था स्थापन करीत असल्याची माहिती दिली. त्यासाठी 80 एकर जमीन आणि कोट्यवधींचा निधीही मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी मला सांगितलं. त्याशिवाय 25 एकर जागेत 50 कोटी रुपये खर्चून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे उभारण्यात येत असलेल्या म्युझियमचं काम अंतिम टप्प्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

वस्तुतः संपादक या नात्यानं मी नेहमीच दिल्लीला जात असतो. संसद परिसरात गेल्यानंतर मला नेहमी जाणवायचं की, संसदेच्या प्रांगणात विविध नेत्यांचे आणि महापुरुषांचे पुतळे उभे केलेले आहेत; परंतु सामाजिक समतेचे कृतिशील प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा मात्र तिथं नाही. ही खंत मला सातत्यानं लागून राहिली होती. संसद भवनाच्या प्रांगणात राजर्षींचा पुतळा उभा व्हावा, यासाठी मी संकल्पच सोडला आणि संकल्पाला सिद्धीमध्ये परिवर्तीत करण्यासाठी जिद्दीनं कामाला लागलो. ठोठावल्याशिवाय उघडायचं नाही, ही दिल्ली दरवाजाची रीत इतिहासकाळापासूनच आहे, हे मला चांगलं ठाऊक असल्यामुळे राजर्षींचा पुतळा संसद भवनात उभारला जावा, यासाठी मलाच दिल्ली दरवाजा ठोठवावा लागला.

मग माझ्या जोडीला बाबुराव धारवाडेही आले आणि आम्ही जोरदार प्रयत्न चालू केले. पुतळा उभारणीसाठी विविध मार्गांनी पाठपुरावा करण्यात आला. अर्थात, त्यामध्ये ‘पुढारी’चा सहभाग मोलाचा होता, यात कसलाच संशय नाही.
अखेर सर्वांच्या प्रयत्नांना यश आलं आणि संसद प्रांगणात शाहू महाराजांचा पुतळा बसवण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला. 17 फेब्रुवारी 2009 रोजी पुतळा उभारण्याचं ठरलं आणि कोल्हापुरात उत्साहाची लाटच पसरली. कानपुरातील 1997 च्या शाहू महोत्सवाला कोल्हापुरातून एक रेल्वे भरून शाहूप्रेमी गेले होते. त्याचप्रमाणे दिल्लीलाही रेल्वेनं मोठ्या प्रमाणात कोल्हापूरकर प्रतिनिधी घेऊन जावेत, असा विचार माझ्या मनात आला.

तथापि, संसद भवनाची सुरक्षा लक्षात घेऊन माझ्यासह निवडक लोकांनाच कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु, मी एकट्यानंच दिल्लीला न जाता, त्याच दिवशी कोल्हापुरात ‘शाहू महोत्सव’ भव्य प्रमाणात करण्याचा निर्णय मी घेतला. त्यासाठी मी लगेचच कामाला लागलो आणि तत्कालीन महापौर उदय साळोखे आणि प्रमुख कार्यकर्त्यांची तसेच विशेष प्रतिनिधींची एक बैठक घेतली. त्या बैठकीतच माझी निमंत्रक म्हणून एकमतानं निवड झाली.

या लोकोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबवण्याचा आणि विराट मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सारे जण झपाटल्यासारखे कामाला लागले. इकडे लोकोत्सवाची जय्यत तयारी होत असतानाच तिकडे दिल्लीमध्ये संसद भवनात शाहूरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाची तयारी सुरू होती.

17 फेब्रुवारी 2009 चा दिवस उजाडला आणि संसद भवनाचं प्रांगण धन्य धन्य झालं. महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी कळफलकावरील बटण दाबलं! आणि संसद भवनातील गेट क्रमांक सहाच्या हिरवळीवर अस्सल मर्‍हाटमोळ्या थाटात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. मर्‍हाटमोळ्या तुतारीची ललकारी आसमंतात निनादली आणि संसद भवनाची वास्तू धन्य झाली. सार्‍या देशानं जणू छत्रपतींना मानाचा मुजराच केला! या उद्घाटन सोहळ्यासाठी कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज आणि त्यांच्याबरोबर काही निवडक लोक गेले होते.

राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळयाचे अनावरण
संसद प्रांगणात राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळा अनावरणप्रसंगी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवर. डावीकडून शिवाजीराव देशमुख, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, सुशीलकुमार शिंदे, लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी, निवेदिता माने, बाबासाहेब कुपेकर, प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, लालकृष्ण अडवाणी, श्रीमती सोनिया गांधी.

लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं संसदेच्या प्रांगणात अनावरण झालं. त्याचवेळी इकडे करवीरनगरीत विराट जनसागराच्या साक्षीने ‘शाहू लोकोत्सव’ सोहळा शाही थाटात पार पडला. शाहूरायांचा गगनभेदी गजर, पोलिस बँडची मानवंदना, 21 तोफांची सलामी, धनगरी ढोलांचा दणदणाट, तसेच झांजपथक, लेझीम आणि पोवाडा या सर्व लोककलांच्या प्रदर्शनानं झपाटलेलं वातावरण, टाळ-मृदुंगाच्या साथीनं निघालेली शाहू प्रतिमेची मिरवणूक आणि हो, ग्रंथाची पालखीसुद्धा! आणि या सर्व द़ृष्ट लागण्याजोग्या सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून झालेली पुष्पवृष्टी!

माझ्या पुढाकारानं आणि महापालिका, जिल्हा परिषद, शैक्षणिक संस्था, शाळा आणि लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते या सर्वांच्या सहभागानं पार पडलेल्या शाहू लोकोत्सवानं कोल्हापूरकरांच्या मनात कायमचं घर केलं. हा लोकोत्सव अविस्मरणीय झाला आणि लाखोंच्या अंतःकरणात कोरला गेला. संसदेच्या प्रांगणातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणानिमित्त कोल्हापुरात झालेल्या लोकोत्सवाचं ‘स्टार माझा’ या वाहिनीवरून थेट प्रक्षेपण करण्यात आलं. त्यावेळी माझी विशेष मुलाखत घेऊन ती (ङर्ळींश) थेट प्रक्षेपित करण्यात आली. संकल्प सिद्धीला गेल्यामुळे मला एक वेगळंच आत्मसमाधान वाटत होतं. शाहूरायांचं ऋणही फिटण्यासारखं नाही, परंतु त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आपल्या हातात आहेच आणि कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजेच कृतघ्न न होणं!

Back to top button