सिंहायन आत्मचरित्र : साहित्य संमेलनाची यशोगाथा | पुढारी

सिंहायन आत्मचरित्र : साहित्य संमेलनाची यशोगाथा

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव मुख्य संपादक, दैनिक पुढारी

पाच नोव्हेंबर 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी ‘पुढारी’ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्‍त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमाप्रश्‍नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

वर्ष 1992… ‘The real purpose of books is to trap the mind into doing its own thinking.’

ख्रिस्तोफर मोर्ले या अमेरिकन साहित्यिकानं पुस्तकांच्या प्रभावाबद्दल केलेलं हे विधान त्रिकालाबाधित सत्य आहे, असं म्हटलं तर त्याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. कारण माणसाच्या व्यक्‍तिमत्त्वाला परिपूर्णता येण्यासाठी पुस्तकांची म्हणजेच वाङ्मयाची नितांत गरज असते आणि ते लिहिण्याचं काम साहित्यिक मंडळी करीत असतात. त्यामुळे साहित्य आणि पत्रकारिता यांचाही अन्योन्यसाधारण संबंध आहे. खरं तर रक्‍ताचं नातंच आहे. म्हणूनच दै.‘पुढारी’च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त 1989 साली कोल्हापुरात मोठ्या हर्षोल्हासात दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन संपन्‍न झालं होतं. ते उत्तमरीत्या यशस्वी झाल्याची एकमुखी पावती मान्यवरांनी त्यावेळी दिली होती. यशस्वी साहित्य संमेलनानं ‘पुढारी’च्या शिरपेचात मानाचा तुराच खोवला होता.

साहित्य संमेलन म्हणजे केवळ साहित्यिकांनी आणि साहित्यप्रेमींनी एकत्र येऊन चर्चा आणि वादविवाद करण्याचा समारंभ नव्हे. साहित्य संमेलन म्हणजे जणू वाग्देवीचा यज्ञच! खरं तर महायज्ञ म्हणणं अधिक संयुक्‍तिक होईल किंवा वाग्विलास जयंती म्हटलं तरी चालेल! ती एक पूजा असते. साहित्यिकांनी एकत्र येऊन, साहित्यप्रेमींच्या साक्षीनं साहित्याची केलेली आराधना असते. प्रतिभावंतांनी प्रतिभेची केलेली अर्चना असते, असं म्हटलं तरी ते योग्यच होईल.

तर असं हे साहित्य संमेलन 60 वर्षांपूर्वी कोल्हापुरात संपन्‍न झालं होतं. 1932 साल होतं ते. केवढा काळ लोटला होता! जणू त्याला आता ऐतिहासिक मूल्यच प्राप्‍त झालं होतं. त्या इतिहासाला वर्तमानात पुन्हा जीवित करावं, असं गेल्या साठ वर्षांत कुणालाच वाटलं नव्हतं. त्यानंतर कोल्हापुरात हा ‘वाग्यज्ञ’ प्रज्वलित झालाच नव्हता. दरवर्षी महाराष्ट्रात आणि कधी कधी महाराष्ट्राबाहेरही अ. भा. मराठी साहित्य संमेलन होतच असतं. परंतु, कोल्हापूरचं नाव कधीच पुढं आलं नव्हतं.

खरं तर, कोल्हापूरची खरी ओळख ही ‘कलानगरी’ म्हणूनच आहे. इथं साहित्यिकांची परंपराही तशी फार मोठी आहे. मुक्‍तेश्‍वर, मोरोपंतांपासून वि. स. खांडेकर, रणजित देसाई, शिवाजी सावंत, आनंद यादव अशी किती नावं घ्यावीत! असं असूनही अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा योग काही जुळत नव्हता. 1991 मध्ये मात्र कोल्हापूरच्या कुंडलीमधले ग्रह शुभ आले होते. त्यावर्षी हे संमेलन कोल्हापुरात घ्यावं, असं मला आणि डी. वाय. पाटील यांनाही वाटू लागलं.

वास्तविक पाहता साहित्य संमेलन हे आपल्या पायानं चालतं. आपल्या गावी कधीच येत नसतं. कुणीतरी त्या पालखीला उचलावं लागतं. तिला खांदा द्यावा लागतो. तरच ही सारस्वताची दिंडी आपल्या दारी येते. म्हणूनच ती जबाबदारी मी आणि डी. वाय. पाटील यांनी घेतली. त्याप्रमाणे डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची कोल्हापूर शाखा यांच्या वतीनं कोल्हापुरात संमेलन घ्यावं म्हणून अ. भा. मराठी साहित्य महामंडळाला एक निवेदन दिलं. 22 जुलै 1991 रोजी पुण्यात महामंडळाची बैठक झाली. तेव्हा राजेंद्र बनहट्टी महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोल्हापूरला जानेवारी 1992 मध्ये अ. भा. मराठी साहित्य संमेलन घेण्यास मान्यता देण्यात आली.

..आणि मग या वाग्यज्ञासाठी तयारी सुरू झाली. डॉ. डी. वाय. पाटील यांची स्वागताध्यक्ष तर माझी कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली. आम्ही दोघे त्या पालखीचे भोई झालो! आणि साहजिकच तयारीनं लगेच वेग पकडला. 14 ऑगस्टला ‘पुढारी’ भवनात पहिली बैठक झाली. साहित्य संमेलन वैभवशाली थाटात व्हावं, या द‍ृष्टीनं सर्वतोपरी तयारी करण्याच्या भावना मी व्यक्‍त केल्या आणि तशा जिद्दीनंच सर्वजण कामाला लागले.

संमेलनाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला. विविध समित्या आणि त्यांची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली. 22 ऑगस्टला ‘मसाप’च्या कोल्हापूर शाखेतर्फे बैठक झाली. त्यामध्ये सर्व साहित्यिकांना आवर्जून निमंत्रण देण्यात यावं, यासह विविध मुद्दे चर्चेला आले. संमेलनाची पूर्वतयारी पाहण्यासाठी 26 सप्टेंबरला प्रा. राजेंद्र बनहट्टी यांनी कोल्हापूरला भेट दिली.

संमेलन सर्वसमावेशक व्हावे, मंडप, निवास-भोजन यांची व्यवस्था करतानाच भोजनामध्ये तांबडा-पांढरा रस्सा असावा, असं त्यांनी आवर्जून सांगितलं. वाहतूक आणि निवासी व्यवस्था चांगली असावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. संमेलनस्थळाचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी मी त्यांना ‘आपण निश्‍चिंत असावं. संमेलन आदर्श आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होईल,’ अशी ग्वाही दिली.

अ. भा. साहित्य संमेलन कोल्हापुरात घ्यायचं हे निश्‍चित झालं; पण अध्यक्ष कोण हा प्रश्‍न होताच. अर्थात, अध्यक्षांची निवड ही लोकशाही मार्गानं म्हणजेच मतपेटीतूनच होत असते. यावेळी कोल्हापूरचे सुपुत्र आणि ‘पुढारी’चे पत्रकार रमेश मंत्री निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांच्याविरुद्ध बेळगावच्या ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत उभ्या राहिल्या. एक शारदापुत्र तर दुसर्‍या सरस्वती कन्यका. पुन्हा दोघेही आपलीच. तरीही निवडणुकीतील ईर्ष्या कुणाला चुकलीय का?

दोन्ही बाजूंनी प्रचाराचा धुमधडाका सुरू झाला. प्रचार म्हटलं, की आरोप-प्रत्यारोप ठरलेलेच. कालपर्यंतचे मित्र क्षणभरासाठी का असेना शत्रू होतातच. परंतु, तरीही साहित्यिकांची निवडणूक असल्यामुळे कोणतीही कटुता न बाळगता खुल्या वातावरणात निवडणूक पार पडली आणि निकालही लागला. रमेश मंत्रींना 126, तर इंदिरा संतांना 111 मतं पडली. 15 मतांनी मंत्री विजयी झाले. अध्यक्षपदाचा मानही कोल्हापूरनंच पटकावला. यक्षाला शाप असतात, तसा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीलाही वादाचा शाप असतोच. हे संमेलन तरी त्याला अपवाद कसं ठरेल? वाद झाले खरे; पण अध्यक्ष निवडीनंतर वातावरण निवळत गेलं.

1992 हे विनोदी लेखक चिं. वि. जोशी यांचं जन्मशताब्दी वर्ष. 1932 साली कोल्हापुरात जे साहित्य संमेलन झालं, त्याचे अध्यक्ष होते बडोद्याचे सयाजीराव महाराज; पण काही अपरिहार्य कारणामुळे ते आलेच नाहीत. त्यावेळी त्यांचे भाषण चिं. वि. जोशी यांनी वाचून दाखवलं होतं. आता या संमेलनाचे अध्यक्ष रमेश मंत्री हेही विनोदी लेखकच. एका विनोदी लेखकाच्या जन्मशताब्दीवर्षी, दुसरा एक विनोदी लेखकच संमेलनाचा अध्यक्ष व्हावा, हा अनोखा योगायोगच म्हटला पाहिजे. काही गोष्टी या नियतीकडून पूर्वनियोजित असतात, हेच खरं!

रमेश मंत्री यांनी पन्‍नासच्या दशकात ‘पुढारी’त उपसंपादक म्हणून काम केलं होतं. त्यांनी अनेक देशांचा प्रवास केलेला होता. शिवाय शंभराहून अधिक पुस्तकं त्यांच्या नावावर होती. रमेश मंत्रींच्या निवडीत करवीरवासीयांना आपला माणूस अध्यक्ष झाल्याचा आनंद झाला.

अध्यक्षपदी निवड झाल्यावर कोल्हापूर महापालिकेतर्फे रमेश मंत्री यांचा राजर्षी शाहू स्मारकभवनात सत्कार करण्यात आला. त्यावेळी आपल्या भावना कृतज्ञतेनं व्यक्‍त करताना मंत्री म्हणाले, “पुढारी’चे आणि ‘पुढारी’कारांचे उपकार मला कधीच विसरता येणार नाहीत. तसेच ‘पुढारी’ची थोरवी शब्दांत पकडता येणार नाही. उद्या ‘लंडन टाईम्स’जरी कोल्हापुरात आला, तरी ‘पुढारी’ला जराही धक्‍का लागणार नाही.”
टाळ्यांच्या कडकडाटात मंत्रींच्या या विधानाला सभागृहानं दाद दिली.
यावेळी मीही आपल्या भावना व्यक्‍त केल्या, “एक पत्रकार- साहित्यिक संमेलनाचा अध्यक्ष झाल्यानं वृत्तपत्रसृष्टीचा गौरव झाला आहे.”
त्यावेळी मी मंत्री यांच्या कारकिर्दीबरोबरच एकूण साहित्य-पंढरीचाच धावता, पण मर्मभेदी आढावा घेतला. उपस्थितांना माझे बोल भावले. टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्‍लोषात त्यांनी माझ्या वक्‍तृत्वाला दाद दिली.

‘नादब्रह्म खुजें। कैवल्यही तैसे न सजे।
ऐसा बोलु देखिजे। जेणे दैवें॥’

‘कधी कधी दैवयोगानं व्याख्यान असं बहरतं, की त्यापुढे नादब्रह्मही ठेंगणे पडते,’ हे ज्ञानेश्‍वरांचे बोल त्या दिवशी बोलके होऊन श्रोत्यांना सुखावून गेले, यात शंकाच नाही.

संमेलनाच्या तयारीसाठी बैठकांचं सत्र सुरूच होतं. कसबा बावड्यातील शासकीय मैदान संमेलन स्थळ म्हणून निश्‍चित झालं. मंडप उभारणीचं कामही युद्धपातळीवर सुरू झालं. प्रतिनिधींची निवास व्यवस्था, परिसंवादाची तयारी, भोजन व्यवस्था, करमणुकीचे कार्यक्रम, ग्रंथदिंडी अशा विविध मुद्द्यांवर टिपरघाई सुरू झाली. याचवेळी प्रतिनिधी शुल्क माफ करण्याचाही निर्णय घेण्यात आला. कोल्हापुरात संमेलन होत आहे. नागरिकांमध्ये उत्साह दांडगा, विविध संस्थांनी, संघटनांनी ठिकठिकाणी कमानी उभारल्या. पोस्टर्स-बॅनर्सनी कोल्हापूर सजून गेलं.

पूर्वी ऋषीमुनींचे यज्ञ चालले की त्यामध्ये राक्षस विघ्न आणीत असत. तसेच कुठल्याही शुभकार्यात विघ्न न येईल तरच नवल! किंबहुना ती एक कसोटीच असते, शुभकार्याची! तर झालं असं, की संमेलनाचे उद्घाटक म्हणून प्राचार्य व्ही. के. गोकाक यांचं नाव निश्‍चित झालं होतं. तथापि, नेमका त्याचवेळी गोकाक यांनी सीमाभागात कन्‍नडची सक्‍ती करावी, असं अहवाल कर्नाटक सरकारला दिला होता. त्याचे पडसाद सीमाभागात तीव्रपणे उमटले होते.

मुळात सीमाभाग आणि कोल्हापूर याचं नातं अतूट. एकाला टोचलं तर दुसर्‍याला कळ यावी असं आणि माझ्या तर हा जिव्हाळ्याचा विषय. आमच्यापुढे मोठाच प्रश्‍न उभा राहिला. गोकाक जर संमेलनाला आले, तर त्याची उलट प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता होती. संमेलनाला फार मोठं गालबोट लागलं असतं. बरं, एक ठराव करून त्याचं उद्घाटक पद रद्द करावं, तर एका विद्वानाचा फार मोठा अपमान झाला असता.

पण, या समस्येतून मार्ग खुद्द गोकाक यांनीच काढला. एकूण रागरंग ओळखून गोकाक यांनी प्रकृतीचं कारण पुढे करीत संमेलनाला यायला नकार दिला. सुंठीवाचून खोकला गेला खरा; पण आता उद्घाटकाचं काय? मला संकटं ही नेहमीच आव्हान देत आलेली आहेत आणि मी प्रत्येकवेळी ते आव्हान स्वीकारून त्यांच्यावर यशस्वीपणे मात केलेली आहे. थोडक्यात मला संकटांशी लढायला आवडतं. मी लगेचच सूत्रं हलवली आणि प्रसिद्ध नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांची उद्घाटक म्हणून संमती मिळवली. प्रश्‍न संपुष्टात आला. संभ्रम दूर झाला आणि कार्यकर्ते दुप्पट उत्साहानं तयारीला लागले.

संमेलनाच्या उद्घाटनाचा दिवस उद्यावर येऊन ठेपला आणि त्याच दिवशी घोषणा करण्यात आली, की उद्या 31 जानेवारी रोजी म्हणजे संमेलनाच्या पहिल्या दिवशीच कोल्हापूर बंद ठेवण्यात येईल! आता हे आणखी एक विघ्न ब्रह्मराक्षसासारखं समोर उभं राहिलं.

विषय असा होता, की आर.टी.ओ. कार्यालयासमोर फेरीवाल्यांच्या हातगाड्या होत्या. त्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं हलवल्या. त्या जागी केबिन्स उभारून त्या इतरांना देण्यात आल्या. या अन्यायाविरुद्धच फेरीवाले कृती समितीनं अचानक बंद पुकारला होता. प्रश्‍न अत्यंत संवेदनशील होता. त्यातून मार्ग काढणं आवश्यक होतं.

या प्रश्‍नावर मग त्वरेनं महापौरांच्या दालनातच मिटिंग बोलावण्यात आली. माझ्यासह महापौर शामराव शिंदे, आयुक्‍त भोसले, कॉ. गोविंदराव पानसरे तसेच के. आर. अकोळकर बैठकीला उपस्थित होते. बर्‍याचशा वादविवादानंतर समन्वय होऊन अखेर बंद मागे घेण्यात आला. नंतर लगेचच पत्रकार परिषद घेऊन मी आणि पानसरेंनी हा निर्णय जाहीर केला. हे मोठंच विघ्न दूर झाल्यावर सर्वांनीच सुटकेचा नि:श्‍वास टाकला.

कसबा बावड्यातील मैदानावर ‘राजर्षी शाहू साहित्यनगरी’ उभी राहिली. आता जर साहित्यनगरीला राजर्षींचं नाव असेल, तर त्या नगरीचं प्रवेशद्वारही तसंच तोलामोलाचं असायला नको का? म्हणून मग, भवानी मंडपातील नगारखान्याची भव्य प्रतिकृती प्रवेशद्वारासाठी उभारण्यात आली. आत प्रवेश करताच, युगपुरुष छ. शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा तसेच राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महामानवांचे पुतळे इतिहासाची आणि सामाजिक चळवळीची साक्ष देत उभे होते.

..आणि आद्य सारस्वत ज्ञानियांचा राजा संत ज्ञानेश्‍वरांची मांगल्यदायी मूर्ती वातावरणात मांगल्याचा सौरभ दरवळत ठेवत होती. धबधबा, रंगीत कारंजे संमेलनस्थळाची शोभा वाढवीत होते.

प्रवेशद्वाराला महान ऋषितुल्य साहित्यिक वि. स. खांडेकर यांचं दिलेलं नाव साहित्यनगरीच्या वैभवात भर घालत होतं. एरव्ही संमेलनात पन्‍नास एक पुस्तकांचे स्टॉल्स असतात, असा अनुभव आहे. परंतु, या संमेलनात मात्र 85 हून अधिक स्टॉल्स उभे राहिले होते. जणू पुस्तकांचे गावच वसले होते. इतकेच काय तर कोल्हापुरी गूळ, कोल्हापुरी चप्पल्स, हुपरीचे चांदीचे दागिने यांसारखे कोल्हापूरचं वैभव प्रदर्शित करणारे 25 ते 30 स्टॉल मांडले गेले होते. त्यामुळे साहित्यनगरी बहुआयामी झाली होती आणि आदल्या दिवसापासूनच संमेलनाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

संमेलनाची सगळीकडे चर्चा चालू होती. जणू सारं कोल्हापूर हेच एक भव्यदिव्य साहित्यनगरी होऊन गेले होते. साहित्याच्या या वाग्यज्ञासाठी सारी करवीरनगरी सज्ज झाली होती. जणू दिवाळी सणच कोल्हापूर साजरा करीत होतं. संमेलनस्थळ तर रोषणाईनं उजळूनच निघालं होतं. या महान साहित्यनगरीत 5000 प्रतिनिधी आणि 10,000 रसिकप्रेक्षक बसतील एवढी आसनव्यवस्था करण्यात आली होती. ही सर्व माहिती मी स्वतः पत्रकार परिषदेत दिली. आजवर झालेल्या संमेलनापेक्षा दुपटीनं प्रतिनिधींची नोंदणी झाल्याचं सांगून मी पत्रकारांनाही आश्‍चर्याचा धक्‍का दिला.

एक मेडिकल कॉलेज, एक इंजिनिअरिंग कॉलेज आणि 19 हॉटेल्स एवढ्या ठिकाणी बाहेरून येणार्‍या पाहुण्यांची, त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांहून साहित्यनगरीकडे जाण्यासाठी मोफत बससेवा ठेवण्यात आली होती. त्यासाठी 12 बसेसचा ताफा तैनात करण्यात आला होता. चार वेगवेगळ्या ठिकाणांहून निघणार्‍या ग्रंथदिंड्यांचं नियोजनही चोख करण्यात आलेलं होतं. एन.सी.सी. आणि एन.एस.एस.चे हजारावर छात्रस्वयंसेवक म्हणून नियुक्‍त करण्यात आले होते. तसेच एक फेब्रुवारीच्या रात्री सादर करण्यात येणार्‍या ‘कोल्हापुरी साज’ या कार्यक्रमाचीही जय्यत तयारी झाली होती.

मी आणि डी. वाय. पाटील, आम्ही तर या साहित्याच्या पालखीचे प्रमुख भोई! संमेलनाच्या पूर्वसंध्येला मी स्वतः आणि डी. वाय. यांनी सार्‍या तयारीचा जातीनं आढावा घेतला. 31 जानेवारीला संमेलनाचं उद्घाटन होतं. त्याच्या आदल्याच दिवशी प्रा. वसंत कानेटकर यांच्यासह अनेक साहित्य, शारदेच्या सुपुत्रांनी कोल्हापुरात उपस्थिती लावली होती. आदल्या रात्रीपासूनच कोल्हापूरला संमेलनाचा रंग चढला होता!

31 जानेवारी, 1992 हा उद्घाटनाचा दिवस. सकाळी बरोबर सव्वासात वाजताच वेगवेगळ्या चार ठिकाणांहून चारीही ग्रंथदिंड्यांना प्रारंभ झाला. राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळापासून समता ज्योत आणि एक ग्रंथदिंडी निघाली, तर राजारामपुरीतील वि. स. खांडेकर यांच्या ‘नंदादीप’ या निवासस्थानापासून ज्ञानज्योत निघाली. समता ज्योत आणि ग्रंथदिंडीचं पूजन प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी केलं, तर ज्ञानज्योत आणि ग्रंथदिंडीचं पूजन महापौर शामराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं.

महाराष्ट्र साहित्य परिषदेची ही दिंडी. पालखीत खांडेकरांची ग्रंथसंपदा ठेवलेली. ही पालखी अध्यक्ष रमेश मंत्री, डी. वाय. पाटील आणि मी वाहिली. लेझीम आणि बँडपथकाच्या सुरावटीवर दिंडी मार्गस्थ झाली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्ररथ आणि महाराणी ताराराणींच्या वेशातील अश्‍वारूढ नव्या युगाची रणरागिणी महिला, या लवाजम्यानं कोल्हापूरकरांचं लक्ष वेधून घेतलं.

त्याचवेळी इकडे प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावरून महापालिकेच्या वतीनं छ. राजाराम महाराजांच्या नावे एक ग्रंथदिंडी निघाली, तर वरुणतीर्थ वेस येथील गांधी मैदानावरून मुख्य दिंडीला प्रारंभ झाला. सार्‍या दिंड्या पूर्वनियोजित पद्धतीनुसार दसरा चौकात एकत्र आल्या. त्या ठिकाणी रमेश मंत्री, डी. वाय. पाटील आणि मी अशा तिघांनी या अतिभव्य दिंड्याचं स्वागत केलं. सजवलेला गजराज, घोडे आणि उंट असा लवाजमा, तसेच आकर्षक चित्ररथ, लेझीम पथकं, शिवाय धनगरी ढोल यांच्या दर्शनानं आणि निनादानं सारं शहर न्हाऊन निघालं होतं.

25 हजारांहून जास्त विद्यार्थी, नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मातब्बर आणि मान्यवर ग्रंथदिंडीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते, तर सुमारे साडेतीनशे वारकरी टाळ-मृदंगाच्या तालावर ‘ग्यानबा तुकाराम’चा गजर करीत ब्रह्मानंदी एकरूप झाले होते. ‘ग्यानबा तुकाराम काय, सोपान-मुक्‍ताबाई काय, नि एकनाथ-नामदेव काय’; सगळे साहित्य पंढरीचे वारकरीच! त्यांचे अभिजात अभंग आजही मराठी माणसांच्या ओठी-ओठी घोळत असतात. ते तर खरे आद्य सारस्वत! मग त्यांच्या नावाचा जयजयकार झाल्याशिवाय साहित्याची दिंडी पुढे कशी बरं जाईल?

या दिंडीत 65 बैलगाड्याही सामील झालेल्या होत्या. त्या जणू अण्णा भाऊ साठेंपासून शंकर पाटलांपर्यंतच्या ग्रामीण साहित्यिकांच्या गावरान साहित्याचं प्रतिनिधित्वच करीत होत्या, असं म्हटलं तर वावगं ठरणार नव्हतं. ही चार दिंड्यांची मिळून एक झालेली अतिभव्य ग्रंथदिंडी राजर्षी शाहू साहित्यनगरीजवळ आली, तेव्हा सव्वाअकरा वाजले होते. संमेलनासाठी आलेले रसिकमनाचे नगरविकासमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह हजारो उपस्थितांचे ग्रंथदिंडी पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. उद्घाटक प्रा. वसंत कानेटकर यांनी पालखीतील ग्रंथांना पुष्पांजली अर्पण केली. दिंडीचं स्वागत केलं.

सखारामबापू खराडे, डी. बी. पाटील, जी. बी. आष्टेकर तसेच विविध शिक्षण संस्थांचे संचालक, मुख्याध्यापक आणि अनेक शिक्षक यांनी या ग्रंथदिंडीसाठी परिश्रम घेतले.

31 जानेवारी! करवीरनिवासिनी अंबाबाईच्या साक्षीनं ‘राजर्षी शाहू साहित्यनगरीत’ साहित्य शारदेचा दरबार सुरू झाला. सनई-चौघड्याचे मंगलस्वर दरबाराचे अल्काब पुकारत होते. प्रवेशद्वारावर तुतारीच्या निनादात पाहुण्यांचं आगमन झालं. टी. ए. बटालियनच्या वाद्यवृंदांनी आणि गुलाबपुष्पांच्या वर्षावानं पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं. पाहुणे व्यासपीठावर विराजमान झाले. प्रथम स्वागतगीताचे मंजूळ स्वर साहित्याच्या दरबारात घुमले आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्र गीत झंकारलं. आता दिग्गज ज्ञानवंतांचे विचार मनोमनी साठवण्यासाठी श्रोत्यांनी पंचप्राण कानांत आणून ठेवले. जणू –

जणू ‘आमोद सुनासी आले’! नाक हेच सुगंध झाले, तर श्रवण आणि कान हे एकच झाले! डोळ्यांनी स्वर देखिले, तर ओठांनी आनंद प्राशन केला! जिव्हेनं तर आनंदाची चवही चाखली! अशाप्रकारे श्रोते तल्लीन झाले. जेव्हा जेव्हा काहीतरी अतिसुंदर, मनोहर, अद्वितीय आणि विलक्षण असं जन्माला येतं, तेव्हा तेव्हा त्याला कवेत घेण्यासाठी इंद्रियांचा असाच गोंधळ उडतो. ते आपली भूमिका विसरून दुसर्‍याच्या भूमिकेत जातात! आज, आता, या क्षणीही असंच काहीतरी जन्माला येऊ पहात होतं.

प्रा. वसंत कानेटकर म्हणजे साक्षात भाषाप्रभू! उद्घाटनाचं त्यांचं भाषण म्हणजे रसिक श्रोत्यांसाठी मोठी मेजवानीच! त्यांनी आपल्या भाषणात शब्दांचे चौकार-षटकार मारीत असतानाच, साहित्य संमेलनावरचे सारे आक्षेप खोडून काढले.

कार्याध्यक्ष म्हणून माझे विचार व्यक्‍त करताना मी कोल्हापूरविषयी भरभरून बोललो. प्राचीन काळापासून कोल्हापूरचा चहूमुलुखी डंका वाजत असल्याचं मी सोदाहरण पटवून दिलं. विद्या, कला, उद्योग, व्यापार, समाजकारण आणि राजकारण या सर्व क्षेत्रांत कोल्हापूर पूर्वापार अग्रणी आहे, हे मी संदर्भांसहीत विशद केलं. मुक्‍तेश्‍वर, मोरोपंतांपासून अगदी खांडेकरांपर्यंत करवीरनगरीला समृद्ध परंपरा असल्याचंही मी विदित केलं आणि याच पार्श्‍वभूमीवर कोल्हापूरला होत असलेलं, हे साहित्य संमेलन निश्‍चितपणे वैभवशाली आणि संस्मरणीय ठरेल, असा विश्‍वास मी व्यक्‍त केला.

स्वागताध्यक्ष म्हणून डी. वाय. पाटील यांचं भाषणही अत्यंत उत्तम प्रकारे झालं. डी. वाय. पाटलांची विषयाचं निरुपण करण्याची एक वेगळीच हातोटी आहे. ते आवेशपूर्ण भाषण कधीच करीत नाहीत, तर ते श्रोत्यांशी संवाद साधतात. त्यांची ती शैली श्रोत्यांची मनं जिंकून गेली. काही झालं तरी आम्ही दोघे या पालखीचे भोई होतो. ही पालखी खर्‍या अर्थानं इथंपर्यंत आम्हीच आमच्या खांद्यावरून वाहवून आणली होती. सिद्धीचे भागीदार सर्वच असले, तरी संकल्पना आणि नियोजन आमचंच होतं. त्याहून त्यामागची तळमळ महत्त्वाची होती. त्यामुळे आमची भाषणंही हृदयापासून, तळमळीनंच झाली आणि त्यांना श्रोत्यांची दादही मिळाली.

अध्यक्षीय भाषणात रमेश मंत्री यांनी मराठी आणि अन्य भाषांतील साहित्याचा लेखाजोखा परखडपणे मांडला. खुसखुशीत विनोदानं भरलेलं त्यांचं भाषण रसिक श्रोत्यांना आणि साहित्यिकांनाही अंतर्मुख करून गेलं.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, नारायण सुर्वे, सुरेश भट, रवींद्र भट, के. ज. पुरोहित तथा शांताराम, माधव गडकरी, वसंत काणे, राजाराम शिंदे, शंकर पाटील, उत्तम बंडू तुपे, चिंतामणी लागू यांच्यासह असंख्य साहित्यिकांमुळे संमेलनाची शोभा द्विगुणीत झाली, यात शंकाच नव्हती.

हे संमेलन म्हणजे प्रकाशकांसाठी मोठी पर्वणीच ठरली. या साहित्यनगरीतील स्टॉल्सवर लाखो रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली. तसेच गूळ आणि कोल्हापुरी चप्पल खरेदीसाठीही लोकांची झुंबड उडाली, तर संमेलनाला आलेला महिला वर्ग हुपरीतील खास कलाकुसर केलेल्या दागिन्यांच्या खरेदीत मग्‍न झाल्याचं चित्र दिसत होतं. अशा या ‘नव नवल नयनोत्सवा’ची रसिकांनी अनुभूती घेतली.

संमेलनाचा दुसरा दिवस कविवर्यांसाठी आणि काव्यप्रेमींसाठी मेजवानीचाच ठरला. कवी कृ. ब. निकुंब यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन संपन्‍न झालं. सुरेश भट, सुधांशू, नारायण सुर्वे, रामदास फुटाणे यांसारख्या बिनीच्या कविवर्यांनी आपल्या कविता सादर करून रसिक श्रोत्यांची मनापासून दाद मिळवली. तसेच फ. मु. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नवोदितांचं कवी संमेलन झालं. त्यालाही श्रोत्यांनी तेवढीच दाद दिली. कवींची एक नवी पिढी जोमानं पुढं येऊ पाहतेय, हे या नवोदित कवी संमेलनातून दिसून आलं. जणू ही सागराला भरती येण्यापूर्वीची गाज होती.

‘राजर्षी शाहू महाराज, सामाजिक चळवळी आणि मराठी साहित्य’ या तर्कतीर्थांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात शाहूरायांच्या नव्या पैलूंचं दर्शन दिसून आलं. नेहमी साहित्य संमेलन म्हटलं, की परिसंवादामध्ये तेच तेच वक्‍ते असतात. त्यांचे तेच तेच विचार पुन्हा पुन्हा ऐकावे लागतात. कोल्हापूरचं साहित्य संमेलन सर्वार्थानं त्याला अपवाद ठरलं.

ढोलकीचा कडकडाट, पैजंणांचा झणत्कार, शाहिरांची डफावरची थाप, लोकगीतांची धम्माल, गझल आणि शास्त्रीय संगीत तसेच नकला आणि नाट्यप्रवेश अशा विविध गुणदर्शनांनी शनिवारी, 1 फेब्रुवारीच्या रात्री रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली! ‘कोल्हापुरी साज’ या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक अनंत माने यांनी गण सादर करून कार्यक्रमाचा शुभारंभच केला. तसेच ज्येष्ठ शाहीर पिराजीराव सरनाईक यांच्या तडफदार पोवाड्यानं कार्यक्रमात चांगलाच रंग भरला. शिवाय शाहीर कुंतिनाथ करके यांच्या ‘चल जाऊ कोल्हापुरी’ या लावणीनं चांगल्याच टाळ्या घेतल्या, तर यासिन म्हाब्री यांच्या ढोलकी, हालगी, तबला वादनानं प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन गेले. गणपत पाटील यांच्या अनुभव कथनानं हास्याची कारंजी उडाली. गुलाबबाई कागलकर यांची गझल, आप्पासाहेब देशपांडे तथा नूतन गंधर्व यांचं नाट्यसंगीत यांनी कार्यक्रमाची उंची वाढवली. अभिनेते चंद्रकांत आणि सूर्यकांत यांच्या नाट्यप्रवेशांनी कार्यक्रमाला अस्सल कोल्हापुरी तांबडा-पांढर्‍याचीच चव आली!

बघता बघता संमेलनाच्या समारोपाचा दिवस उजाडला. रविवार, 3 फेब्रुवारी 1992! डॉ. वसंतराव गोवारीकर हे मूळचे कोल्हापूरचेच. ख्यातनाम शास्त्रज्ञ. पंतप्रधानांचे तंत्रज्ञान सल्‍लागार. समारोपाच्या भाषणात ते साहित्याविषयी काय बोलणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. परंतु, त्यांच्या अभिजात विचारानं श्रोते मंत्रमुग्ध झाले. आपले मूलभूत विचार मांडताना ते म्हणाले, ‘साहित्य आणि विज्ञानाचा समाजाशी अतूट संबंध असल्यानं साहित्यिकांनी मनात आणलं, तर देशातील दुफळीचे प्रयत्न फोल ठरतील.’

कार्याध्यक्ष या नात्यानं बोलताना मी माझ्या मनीचं गुज प्रकट केलं, “या संमेलनाविषयी काही लोकांनी संभ्रम निर्माण केला होता; पण संमेलनाला ‘न भूतो, न भविष्यती’ असं प्रचंड यश लाभलं, हे आपण प्रत्यक्ष पाहतोच आहोत. साहित्य संमेलनाच्या इतिहासात, या संमेलनाचा वृत्तांत सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, यात शंका नाही. साहित्य संमेलने ठराविक वर्गापुरतीच असतात, पण हे संमेलन मात्र तळागाळापर्यंत पोहोचलं.”

इथं मात्र मी साहित्य क्षेत्रातील अनेक प्रवाहांचा थोडक्यात आढावा घेतानाच, त्यातील कंगोरेही उलगडून दाखवले. तसेच मी माझ्या भाषणाला साहित्य क्षेत्रातील अनेक गमती आणि किस्स्यांची समर्पक जोड दिली. त्यामुळे माझं भाषण मर्मग्राही झालं. श्रोत्यांनीही त्याला उत्स्फूर्तपणे प्रचंड दाद दिली.

‘श्रवणसुखाचां मांडवीं । विश्‍व भोगी माधवी ।
तैसी सासिने बरवी । वाचावल्‍ली ॥’

‘श्रवणसुखाच्या मांडवामध्ये सर्व जगाला वसंत ऋतूचाच उपभोग घेता यावा, अशाप्रकारे व्याख्यानरूपी वेल भरास येते,’ ही ज्ञानेश्‍वरांची उक्‍ती त्या दिवशी मूर्त होऊन अवतरली, असं म्हटलं तरी ती अतिशयोक्‍ती होणार नाही.
माझ्या भाषणानंतर रमेश मंत्री यांनी अध्यक्षीय समारोप केला. आपल्या भावना व्यक्‍त करताना ते म्हणाले, “संमेलनावर काही हितसंबंधी मंडळींनी टीका केली होती; पण संमेलन यशस्वी झाले.”

या संमेलनासाठी हजारो हात राबले. प्रा. चंद्रकुमार नलगे, प्रा. भैरव कुंभार यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेकांनी संमेलनाच्या तयारीमध्ये आपलं योगदान दिलं. तसेच डी. वाय. पाटील आणि त्यांची शिक्षण संस्था यांचा सहभाग मोलाचा ठरला. माझं नियोजन कौशल्य, व्यवस्थापन आणि संयोजन यातून संमेलनाच्या यशस्वीतेवर कळस चढला, असं म्हटलं तर ते मुळीच आत्मप्रोढीचं होणार नाही. कारण “Who has confidence in himself will gain the confidence of others”, यात मला तिळमात्र शंका वाटत नाही.

65व्या मराठी साहित्य संमेलनाची सांगता झाली. तीन दिवस चाललेल्या या शारदोत्सवाला लोकोत्सवाचंच स्वरूप आलं होतं. अस्सल कोल्हापुरी भोजन, उत्तम निवास व्यवस्था यासह कोणतीही उणीव न जाणवणारं संयोजन हा सर्वांसाठीच एक सुखद अनुभव होता. कोल्हापुरी खास तांबड्या, पांढर्‍या रश्श्यासह चमचमीत मटणाच्या जेवणावर खवय्यांनी चांगलाच ताव मारला! या अविस्मरणीय क्षणांच्या स्मृती जागवीत श्रोते आणि साहित्यिक मंडळी माघारी परतले. कोल्हापूरच्या लौकिकात भर पाडणारं असं हे संमेलन झालं. माझ्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.

कोणत्याही कार्याची एक फलश्रुती असतेच. संमेलनाच्या उत्सवात रममाण असतानाच माझ्या मनात एका कल्पनेनं जन्म घेतला. 1994 साली राजर्षी शाहू महाराजांच्या राज्यारोहणाची शताब्दी येत होती. त्या निमित्तानं शाहूरायांवर संशोधनात्मक अभ्यासपूर्ण लिखाण व्हावे, असा विचार माझ्या मनात ठाण मांडून बसला.

ही कल्पना मी डॉ. रमेश जाधव यांना बोलून दाखवली. त्यावेळी डॉ. जाधव या विषयावर संशोधन करीतच होते. माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी ‘राजर्षी शाहू : व्यक्‍ती आणि विचार’ ही लेखमाला अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं लिहिली. 1993 च्या जानेवारीपासून ते 1994 च्या एप्रिल महिन्याअखेर एकूण 64 भागांची लेखमाला मी ‘पुढारी’तून प्रसिद्ध केली. दर रविवारच्या ‘बहार’मधून या लेखमालेनं बहार उडवून दिली. शाहूप्रेमी रसिकवाचकांनी या मालिकेचे उत्स्फूर्त स्वागत केलं. आता या लेखमालेचं ग्रंथरूपानंही प्रकाशन करण्यात आलं असून, या रूपानं राजर्षींच्या जीवनावर एक अभ्यासपूर्ण दस्तऐवज निर्माण झाला आहे.

मी या ग्रंथाला कोल्हापुरात संपन्‍न झालेल्या साहित्य संमेलनाची फलश्रुतीच मानतो. शेवटी साहित्य संमेलनं तरी का भरवायची? उत्साह आणि प्रेरणा घेऊन नवीन साहित्य प्रसवावं म्हणूनच ना? म्हणून तरी ज्ञानेश्‍वरीचं लिखाण हातावेगळं होत असताना, ज्ञानेश्‍वरांनीसुद्धा विश्‍वाच्या देवाला या ‘वाग्यज्ञानं’ संतुष्ट होण्याची प्रार्थना केलीय ना?

आता विश्‍वात्मके देवे ।
येणे वाग्यज्ञे तोषावे ।
तोषोनी मज द्यावे ।
पसायदान हे ॥

Back to top button