बेलीपॉप ने सौम्याची यशाला गवसणी

बेलीपॉप ने सौम्याची यशाला गवसणी
Published on
Updated on

आपल्या कलागुणांना अर्थ देत यशाला गवसणी घालण्याची ताकद प्रत्येकात असते. काहींना ती वेळीच उमगते अन् काही ती वाट सोडून इतर वाटेकडे वळतात. पण, सौम्या कांबळे हिने स्वप्नं पाहिली, ती स्वप्नं जगली आणि तिने यशाला गवसणी घातली. आपल्या 'बेलीपॉप' या आगळ्यावेगळ्या नृत्यशैलीच्या जोरावर तिने एका रिअ‍ॅलिटी शोची स्पर्धाही जिंकली आणि तिने आपल्या वेगळ्या धाटणीच्या नृत्यातून वेगळी ओळखही निर्माण केली.

बेली डान्सिंगला एका वेगळ्या नजरेने पाहणार्‍या आपल्या भारतीय समाजात याच नृत्यशैलीच्या जोरावर सौम्याने नवी वाट शोधली आहे. तिची हीच वाट प्रत्येक तरुण-तरुणीसाठी प्रेरणादायी आहे. कारण अवघ्या 16 व्या वर्षी तिने नृत्य क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. तिची आतापर्यंतची वाटचाल खूप वेगळी आणि प्रेरक अशीच आहे. सौम्या ही मूळची पुण्याची असून, तिने आपल्या अदाकारीने पुण्याचे नाव मोठे केले आहे.

आजच्या दूरचित्रवाणी वाहिन्यांवर अनेक रिअ‍ॅलिटी शो आयोजित केले जातात. काही गायनाचे तर काही नृत्याचे… या रिअ‍ॅलिटी शोमुळे ग्लॅमर, प्रसिद्धी आणि पैसा मिळतो. पण, या वाटचालीत काहींनाच वेगळी ओळख मिळते किंवा काहीजण आपल्या वेगळ्या कलेने वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरतात. सौम्याने आपल्या वेगळ्या नृत्यशैलीतून प्रत्येकाची दाद मिळवली आहे आणि ओळखही.

16 वं वर्ष म्हणजे शिक्षणात रमण्याचे वय..! पण, या वयात तिने शिक्षणासह आपल्या स्वप्नांनाही मूर्तरूप दिले. बेली डान्सिंग म्हणजे नुसते कंबर हालवून नृत्य करणे किंवा अदा दाखविणे असे आपल्याकडे समजले जाते. परंतु, हा समज खोटा ठरवून या नृत्यशैलीत पॉपिंगसारख्या पाश्चात्त्य नृत्यशैलीचा नवेपणा आणत तिने बेलीपॉप ही स्वतःची स्टाईल तयार केली. तिचे सादरीकरण एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये केले अन् तिने आपल्या नृत्यशैलीने प्रत्येकाचे मन जिंकण्यासह स्पर्धाही जिंकली.

या प्रवासात तिला तिच्या कुटुंबाने पूर्ण साथ दिली. तिची आई शैलजा आणि वडील डॉ. अनिल कांबळे यांनी तिच्या या प्रवासात तिला पाठिंबा दिला. आई व्यावसायिक आणि वडील डॉक्टर. दोघांचेही क्षेत्र वेगळे. मुलीने डॉक्टर बनावे, ही वडिलांची इच्छा होती. पण, मुलीच्या कलेसमोर आणि आवडीसमोर वडील डॉ. अनिल यांनीही हार मानली आणि मुलीला नृत्याच्या क्षेत्रात काम करण्यास प्रोत्साहन दिले. आज या दोघांच्या पाठिंब्यामुळे ती बेली डान्सिंगसारखी नृत्यशैली विविध स्पर्धांमध्ये सादर करू शकत आहे.

अगदी लहानपणी तिने बेली डान्सिंग शिकायला सुरुवात केली. आज ती बेली डान्सिंगही करते अन् पॉपिंगही. या दोन्ही नृत्यशैलींची सांगड घालूनच तिने बेलीपॉप ही स्वतःची डान्स स्टाईल बनवली अन् त्याचे सादरीकरण रिअ‍ॅलिटी शोमध्ये केले. तिच्या या अनोख्या नृत्याला दाद देत परीक्षकांनी तिला 'छोटी हेलन' असे संबोधत तिचे कौतुकही केले. याच स्टाईलच्या सादरीकरणाने तिने तो शोही जिंकला अन् पुण्याचे नाव मोठे केले आहे. तिचे बेली डान्सिंग बघून अनेकजण आश्चर्यचकितही होतात. कारण एक तरुण मुलगी इतक्या उत्तम आणि वेगळ्या पद्धतीने बेली डान्सिंगसारखा अवघड नृत्यप्रकार करते, हे पाहून सर्वजण थक्‍क होतात.

सौम्या ही पुण्यातील हडपसर येथील अण्णासाहेब नगर महाविद्यालयात विज्ञान शाखेचे शिक्षण घेत आहे. ती उत्तम नृत्यांगना असून, तिच्या बेली डान्सिंग नृत्याकडे वेगळ्या नजरेने पाहणारेही तिला दाद दिल्याशिवाय राहिले नाहीत. ती बेली डान्सिंग करते म्हणजे ती नुसती कंबर हलवते असं नव्हे. तिने याच नृत्यशैलीत वेगळ्या धाटणीने विचार करून ती सादर करण्यास सुरुवात केली आहे. बेली डान्सिंगला अजूनही न स्वीकारलेल्या आपल्या समाजात तिच्या या प्रयत्नांमुळे तिच्यासारख्या अनेकींना ही नृत्यशैली शिकण्यास नक्‍कीच प्रेरणा मिळणार आहे.
तरुणाई आज वेगवेगळ्या क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करत आहे. काहींकडे पाठिंबा आहे, तर काहींकडे तो नाही.

आजही नृत्याकडे पालक मुलांचे करिअर म्हणून पाहत नाहीत. यात काय ठेवले आहे, असे पालकांना वाटते. म्हणूनच अनेक तरुणांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत. पण, सौम्याला ते स्वप्न जगता आले आणि पूर्ण करण्याची वाटही मिळाली आहे. ती जेव्हा बेली डान्सिंग करते तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे रोखल्या जातात. तिचे नृत्य पाहून टाळ्यांचा कडकडाट केल्याशिवाय आणि तिला दाद दिल्याशिवाय कोणीच राहू शकत नाही.
तिने चार वर्षांची असल्यापासून नृत्य शिकायला सुरुवात केली.

तिची आई शैलजा यांची इच्छा होती की, तिने नृत्य करावे आणि नाव कमवावे. म्हणूनच त्यांनी मुलीच्या नृत्याला पाठिंबा दिला आणि ती नृत्य शिकायला लागली. तिने नृत्यस्पर्धेत सहभागी व्हावे, असे तिच्या आईला वाटत होते. शिवाय तिने भाग घेतलेल्या त्या स्पर्धेची ती विजेता व्हावी, अशीही त्यांची इच्छा होती. मग, सौम्यानेही नृत्याकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली आणि तिने नृत्य शिकण्याला प्राधान्य दिले. 'या प्रवासात माझे वडील डॉ. अनिल कांबळे यांनीही खूप प्रोत्साहित केले.' ती पाच वर्षांची असताना तिने शिराज इराणी यांच्याकडे बेली डान्सिंग शिकायला सुरुवात केली.

त्यांच्याकडे तिने एक वर्ष बेली डान्सिंग शिकले आणि त्यानंतर तिने बेली डान्सिंगचा घरीच सराव करायला सुरुवात केली. यानंतर तिने अनेक रिअ‍ॅलिटी शोसाठी ऑडिशनही दिले. परंतु तिची निवड झाली नाही. तरीही ती डगमगली नाही. नृत्य शिकत राहिली आणि विविध स्पर्धांसाठी ऑडिशन देत राहिली. परंतु एक दिवस असा आला, की तिची एका चॅनेलवरील नृत्यावर आधारित रिअ‍ॅलिटी शोसाठी निवड झाली. तिच्या वेगळ्या नृत्यशैलीमुळे, सादरीकरणामुळे आणि रसिकांच्या पाठिंब्यामुळे तिने ही स्पर्धा जिंकली.

आपल्या नृत्याबद्दल बोलताना सौम्या म्हणते, 'मी बेली डान्सिंग करतच होते. पण, काहीतरी नवीन शिकावे म्हणून मी लॉकडाऊन काळात पॉपिंग हा पाश्चात्त्य नृत्य प्रकारही शिकले. त्यानंतर मी बेली डान्सिंग आणि पॉपिंग याचे मिश्रण करून स्वतःची नृत्याची स्टाईल बनवली आणि त्याला 'बेलीपॉप' असे नाव दिले. ही युनिक स्टाईल मी बनवली आणि त्याचे सादरीकरण मी रिअ‍ॅलिटी शोमध्ये केले. त्याला परीक्षकांसह रसिकांचीही दाद मिळाली. 'बेलीपॉप' स्टाईलच्या सादरीकरणामुळे माझी रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात निवड झाली.

माझ्या वडिलांना मी डॉक्टर व्हावे असे वाटत होते. पण, असे असले तरी त्यांनी मला नेहमी पाठिंबा दिला. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी माझे नृत्य पाहून नटराजची मूर्ती भेट दिली. ही एका डान्सरसाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला 'छोटी हेलन' असे बोलूनही परीक्षकांनी दाद दिली आहे.' आपल्यासारख्याच इतर तरुणांना संदेश देताना सौम्या म्हणते, 'तुम्हाला जे आवडते ते करा. तुम्ही तुमच्या धैर्य आणि पॅशनला फॉलो करा. एक दिवस नक्‍कीच तुम्हाला यश मिळेल. कोणी पाठिंबा देईल याची वाट पाहू नका. तुम्ही जिंकलात तर तुम्हाला सगळेच पाठिंबा देतील.'

सुवर्णा चव्हाण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news