हा घटनाक्रम महाभारताचे युद्ध १८व्या दिवशी संपल्यानंतरचा आहे. अश्वत्थामाने द्रौपदीच्या मुलांची हत्या केलेली होती. त्यामुळे द्रौपदीच्या मनातील सुडाच्या भावनेने पुन्हा एकदा पेट घेतला. तिला अश्वत्थाम्याचे शिर हवे होते. पण श्रीकृष्णाने दौपदीला शांत केले.
श्रीकृष्णाच्या आदेशाने पांडवांचे सैनिक अश्वत्थामाला पकडण्यासाठी बाहेर पडले. अश्वत्थामाला हा प्रकार कळताच त्याने पांडवांच्या दिशेने ब्रह्मास्त्र सोडले. अश्वत्थामाचे हे अस्त्र निष्प्रभ करण्यासाठी अर्जुनाने त्यांच्या जवळील ब्रह्मास्त्र अवकाशात सोडले. या दोन्ही ब्रह्मास्त्रांचे ध्येय सर्वनाश हेच होते. त्यामुळे पृथ्वीचा विनाश आता अटळ होता.
या महासंहाराची कल्पना श्रीकृष्णाला होती. त्याने अर्जुन आणि अश्वत्थामा दोघांनी त्यांची त्यांची ब्रह्मास्त्र परत घेण्याची गर्जना केली. या वेळी येथे व्यास आणि इतर ऋषिमुनी उपस्थित होते. त्यांनीही दोघांना ब्रह्मास्त्र मागे घेण्याची विनंती केली. अर्जुनाने ही विनंती मान्य करत, त्याचे ब्रह्मास्त्र परत घेतले. पण अश्वत्थामाला ब्रह्मास्त्र परत कसे घ्यायचे याचे ज्ञानच नव्हते. ते अस्त्र अश्वत्थामाने गरोदर असलेल्या पांडव स्त्रियांच्या गर्भाच्या दिशेने सोडले. अश्वत्थामाला कोणतेही भान राहिले नव्हते. अद्याप पृथ्वी न पाहिलेल्या गर्भाशयातच असलेल्या पांडववंशाचा त्याला सर्वनाश करायचा होता.
अश्वत्थाम्याच्या या कृतीमुळे श्रीकृष्णाच्या रागाला पारावार राहिला नाही. श्रीकृष्णाने अभिमन्यूची गरोदर विधवाला उत्तरेला संरक्षण दिले. तिच्यावर आदळू शकणाऱ्या अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राचा दाह श्रीकृष्णाने स्वतःच्या अंगावर घेतला. उत्तरा या संकटातून बचावली.
अश्वत्थामाचे हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे होते. या कृत्यामुळे श्रीकृष्णाच्या रागाचा भडका उडाला होता. रागाने पेटून उठलेल्या श्रीकृष्णाने अश्वत्थामाला शाप दिला. "तुझे आचरण नीचपणाचे आहे. आजपासून ३ सहस्त्र वर्षे तुला मृत्यू येणार नाही. या काळात तुझ्या शरीरावर होणाऱ्या जखमा कधीही भरून येणार नाहीत. त्या जखमा सदैव भळभळत राहतील. तू किती घृणास्पद अपराध केला आहेस याची कल्पना तुला जे पाहतील त्यांना येईल."
अश्वत्थामाच्या डोक्यावर जन्मतःच एक मणी होता. ते श्रीकृष्णाने काढून घेतला आणि तो द्रौपदीकडे दिला. द्रौपदीने हा मणी युधिष्ठिराकडे दिला. अश्वत्थामाची सुसंस्कृत जगातून हकालपट्टी करण्यात आली.
श्रीकृष्णाने म्हणजे प्रत्येक्ष परमेश्वराने दिलेला हा एकमेव शाप आहे. गर्भातील बालकाला मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अश्वत्थामाला तोंड दाखवायचीही लाज वाटते, असे मानले जाते.
संदर्भ - जय, महाभारत, सचित्र रसास्वाद, लेखक - देवदत्त पट्टनायक, भाषांतर - अभय सदावर्ते, पॉप्युलर प्रकाशन