Tukaram Beej 2026 | संकटात डगमगू नका! तुकाराम महाराजांचे ‘हे’ ५ अभंग मनाला देतील धैर्य, स्थैर्य आणि नवी उभारी

तुकोबांच्‍या अभंगवाणीत मनाला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्‍याचे सामर्थ्य
Tukaram Beej 2026 | संकटात डगमगू नका! तुकाराम महाराजांचे ‘हे’ ५ अभंग मनाला देतील  धैर्य, स्थैर्य आणि नवी उभारी
Published on
Updated on
Summary

फाल्गुन वद्य द्वितीया या तिथीला 'तुकाराम बीज' साजरा केला जातो. तुकाराम महाराजांनी सोप्या मराठी भाषेत 'गाथा' रचून सामान्य माणसाला भक्तीचा आणि नीतिमत्तेने जीवन कसे जगावे, याचा मार्ग दाखवला. त्‍यांचे अभंग स्वाभिमानाने जगण्याबरोबर कठीण प्रसंगातही मनाचे संतुलन कायम कसे राखावे, याची शिकवण देतात.

Tukaram Beej 2026 | Sant Tukaram Maharaj Abhang for Overcoming Fear & Depression

जगद्गुरू तुकाराम महाराज यांची गाथा ही केवळ भक्तीचा मार्ग नाही तर व्यावहारिक जीवन कसे जगावे सांगणारे साहित्‍य आहे. त्यांच्या अभंगांमधील सहजता आणि स्पष्टवक्तेपणा सर्वसामान्यांना कठीण प्रसंगात धीर देतो. म्‍हणूनच तुकोबांची अभंगवाणी केवळ अध्यात्म नाही, तर जगण्याला मिळालेली एक नवी दिशा आहे. संकटात डगमगणाऱ्या मनाला स्थिर करण्याचे आणि निराशेच्या गर्तेतून बाहेर काढून आत्मबळ जागवण्याचे सामर्थ्य या शब्दांत आहे. शतकानुशतके उलटली तरी, मनातील भीती आणि नैराश्यावर मात करण्यासाठी तुकोबांचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरतात.

तुकोबा शिकवतात प्रत्‍येक आव्‍हानला निर्भयणे सामोरे जाण्‍याची कला

आज (दि. ५ मार्च ) 'तुकाराम बीज'. हा दिवस फाल्गुन वद्य द्वितीया या तिथीला साजरा केला जातो. तुकाराम महाराजांनी सोप्या मराठी भाषेत 'गाथा' रचून सामान्य माणसाला भक्तीचा आणि नीतिमत्ता राखत जीवन कसे जगावे, याचा मार्ग दाखवला. त्‍यांचे अभंग स्वाभिमानाने जगण्याबरोबर कठीण प्रसंगातही मनाचे संतुलन कायम कसे राखावे, याची शिकवण देतात. एकीकडे ढोंगबाजीवर प्रहार करत नीतीचा मार्ग कसा धरावा हे सांगतानाच 'जे का रंजले गांजले' या उक्तीप्रमाणे भूतदयेचा संस्कार ते घडवतात. संकटात डगमगणाऱ्या मनाला धैर्याचा आधार देऊन, विठ्ठलभक्तीच्या माध्यमातून आत्मविश्वासाने जीवन जगण्याची कला तुकोबांची गाथा आपल्याला शिकवते.

Tukaram Beej 2026 | संकटात डगमगू नका! तुकाराम महाराजांचे ‘हे’ ५ अभंग मनाला देतील  धैर्य, स्थैर्य आणि नवी उभारी
Dehu Tukaram Beej Sohala 2026: देहूगावात संत तुकाराम महाराज बीजसोहळ्याची भक्तिमय धामधूम

तुकोबांची अभंगवाणी एका दीपस्तंभासारखा प्रकाश दाखवते....

आयुष्‍य कधीच सरळसोट नसतं अचानक संकटांची वादळे मनाला उद्‍ध्‍वस्‍त करतात. अशावेळी तुकोबांची अभंगवाणी एका दीपस्तंभासारखा प्रकाश दाखवते. 'तुका म्हणे' हे केवळ शब्द नसून, ते खचलेल्‍या मनाला हिंमत देणारे आणि संघर्षात तावून सुलाखून निघण्याचे आत्मबळ देणारे मंत्र आहेत. विठ्ठलनामाच्या विश्वासाने आणि साध्या-सोप्या संवादाने तुकोबा आपल्याला प्रत्येक आव्हानाला निर्भयपणे सामोरे जाण्याची कला शिकवतात. तुकाराम बीजनिमित्त जाणून घेवूया मनातील भीती दूर करणारे आणि नैराश्‍य पळवून लावून मनाला नवी उभारी देणारे तुकाराम महाराजांचे ५ अभंग....

Tukaram Beej 2026 | संकटात डगमगू नका! तुकाराम महाराजांचे ‘हे’ ५ अभंग मनाला देतील  धैर्य, स्थैर्य आणि नवी उभारी
Dehu Beej Sohala Traffic Diversion: देहू बीज सोहळा: 4 ते 6 मार्चदरम्यान विशेष वाहतूक बदल लागू

1) मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास । कठीण वज्रास भेदूं आह्मी ॥१॥

मेले तरी आम्ही असों जगविले ।बोलविले बोलों आम्ही ॥२॥

भले तरी देऊं कासेची लंगोटी ।नाठाळाचे माथीं हाणूं काठी ॥३॥

तुकाराम महाराज म्हणतात, जे सज्जन आहेत त्यांच्यासाठी मी अत्यंत नम्र आहे, पण संकटे किंवा 'नाठाळ' प्रवृत्ती समोर आल्यावर मी तितकाच कणखर आहे. तुकोबांचा हा अभंग मनात जेव्हा भीती किंवा न्यूनगंड निर्माण होतो, तेव्हा स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवून परिस्थितीचा सामना करण्याचा कणखरपणा देतो.

2) "असाध्य ते साध्य करितां सायास ।

कारण अभ्यास तुका म्हणे ॥ १ ॥

वाटाड्याने वाटा पुसतीं साकडें ।

निग्रहाचे पुढें काय नव्हे ॥ २ ॥

तुकाराम महाराज म्हणतात, जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि सातत्य (अभ्यास) असेल तर कठीण ध्येयही साध्य होते.तुमच्‍या स्‍वप्‍नपूर्तीमध्‍ये कितीही अडचणी किंवा संकटे आली, तरी ज्याचा ठाम निश्चय आहे, त्याच्यापुढे कोणतीही अडचण टिकू शकत नाही. निग्रहाने चालणाऱ्या माणसाला मार्ग दाखवणारे आपोआप भेटतात. तुकोबांचा हा अभंग अपयशामुळे आलेली हतबलता झटकून पुन्हा प्रयत्न करण्याची जिद्द हा अभंग निर्माण करतो.

3) जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ।

देह कष्टविती परोपकारें ॥ १ ॥

भूतीं दया ओसंडली अंतर्गुणीं ।

पाहिजे ते धणी देणार तो ॥ २ ॥

नका हाव धरुं कशाची रे मनीं ।

पाहिजे ते धणी देणार तो ॥ ३ ॥

तुका म्हणे धीर । तोचि साधू थोर ॥ ४ ॥

तुकाराम महाराज म्हणतात, जो कठीण प्रसंगात, संकट काळात किंवा प्रतिकूल परिस्थितीत आपला 'धीर' (संयम) सोडीत नाही, तोच खरा साधू आणि तोच खरा थोर पुरुष मानावा. संकट आले म्हणून रडत बसणे किंवा डगमगणे हे सामान्यांचे लक्षण आहे, पण धैर्याने उभे राहणे हेच मोठेपण आहे.

४) लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥ १ ॥

ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥ २ ॥

ज्याचें अंगीं मोठेंपण । तया यातना कठीण ॥ ३ ॥

तुका म्हणे जाण । व्हावें लहानाहुनि लहान ॥ ४ ॥

तुकाराम महाराज म्हणतात, मोठेपणात अनेकदा जाच आणि अहंकार असतो; पण लहान होण्यात (नम्रतेत) गोडवा असतो. तुकाराम महाराज देवाकडे एकच मागणी मागतात, ती म्हणजे 'लहानपण'. म्हणजे नम्र राहणाऱ्याला जीवनातील सुखाचा आणि आनंदाचा ठेवा प्राप्त होतो. ज्याच्या अंगी मोठेपण (अहंकार किंवा अधिकार) येते, त्याला तितक्याच कठीण यातना आणि संकटांना सामोरे जावे लागते. तुकाराम महाराज सांगतात की, जर तुम्हाला सुखी व्हायचे असेल, तर मनात अहंकाराचा लवलेशही न ठेवता 'लहानाहून लहान' व्हावे. जो नम्र असतो, त्याला कोणीही इजा पोहचवू शकत नाही आणि तो सहजपणे ईश्वराच्या जवळ पोहोचू शकतो.

५) ठेविले अनंते तैसेचि रहावें ।

चित्तीं असू द्यावें समाधान ॥ १ ॥

परमेश्वराने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे, तिथे समाधानाने राहावे. याचा अर्थ हतबल होणे असा नाही, तर याचा अर्थ असा आहे की, प्रयत्न करून जे प्राप्त झाले आहे त्यात सुखी राहावे. आजच्‍या आधुनिक जगात सततच्या धावपळीत आणि अपेक्षेच्या ओझ्याखाली दबलेल्या मनाला शांत करण्यासाठी 'समाधान' हेच मोठे औषध आहे, असे तुकोबांचा हा अभंग सांगतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news