

ज्योतिषशास्त्रानुसार, शतभिषा नक्षत्रात राहूची शक्ती अनेक पटींनी वाढते. त्याचे परिणाम अधिक तीव्र आणि निर्णायक असतात. यावर्षी याचा लाभ प्रामुख्याने तीन राशींना मिळणार आहे.
Rahu Gochar 2026
मुंबई : ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत शक्तिशाली मानला जाणारा राहू ग्रह २०२६ मध्ये आपली चाल बदलणार आहे. नवीन वर्षात राहू स्वतःच्याच 'शतभिषा' नक्षत्रात विराजमान होणार आहे. २ ऑगस्ट २०२६ पर्यंत तो याच नक्षत्रात राहील. राहूचे स्वतःच्या नक्षत्रात होणारे हे भ्रमण काही राशींच्या जातकांसाठी भाग्योदयाचे ठरणार असून, त्यांना आकस्मिक धनलाभ आणि करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी मिळणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, शतभिषा नक्षत्रात राहूची शक्ती अनेक पटींनी वाढते. यामुळे त्याचे परिणाम अधिक तीव्र आणि निर्णायक असतात. चंद्र राशीवर आधारित केलेल्या विश्लेषणानुसार, प्रामुख्याने तीन राशींना याचे सर्वाधिक लाभ मिळतील.
मीन राशीच्या जातकांसाठी हे नक्षत्र परिवर्तन अत्यंत लाभदायक ठरेल. दीर्घकाळापासून परदेशी जाण्याचा प्रयत्न करत असणाऱ्यांचे स्वप्न यावर्षी पूर्ण होऊ शकते. आठव्या भावाशी संबंधित असलेल्या राहूमुळे मीन राशीच्या जातकांना अनपेक्षित आर्थिक लाभ किंवा रखडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत आहेत. नोकरीत बढती किंवा बदलीचे योग असून गुरु ग्रहाच्या शुभ स्थितीमुळे नवीन संधी चालून येतील.
मकर राशीच्या धन भावात राहूचे स्थान असल्याने आर्थिक आघाडीवर मोठे बदल होतील. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळतील. गुंतवणूक आणि व्यवसायातून मोठा नफा कमावण्याची संधी मिळेल. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ सुवर्णकाळासारखा असेल. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे स्वप्न साकार होईल. सप्तम भावातील गुरूमुळे अविवाहितांचे विवाह जमण्याचे योग आहेत. भागीदारीतील व्यवसायातही यश मिळेल.
तूळ राशीच्या पाचव्या भावात राहूचे भ्रमण होणार असल्याने त्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. मीडिया, आयटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि कला क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्यांना मोठे यश लाभेल. अकराव्या भावावर राहूची दृष्टी असल्याने उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षित नफा मिळू शकतो. नवम भावावरील राहूच्या दृष्टीमुळे तुमची ओढ अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाकडे वाढेल.
टीप : वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.