

श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातला पाचवा महिना असून तो भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित आहे. या महिन्यात भक्त उपवास करतात, पूजा-अर्चा करतात आणि भगवान शंकराचा आशीर्वाद घेतात. तसेच नागपंचमी, रक्षाबंधन आदी अनेक सण साजरे केले जातात. या महिन्यात महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात. जाणून घेऊया या ज्योतिर्लिंगांबाबत...
भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. 1984 साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते. बिबट्याच्या संवर्धनासाठी येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत. घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वपूर्ण म्हणून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्राचे स्थानमाहात्म्य महत्त्वपूर्ण आहे. श्रावणामासाठी त्र्यंबकराज देवस्थान सजले असून, यंदा झालेल्या भरपूर पावसाने गोदामाईचे उगमस्थान आणि भाविकांच्या फेरीचे स्थान ब्रह्मगिरी पर्वतही निसर्गरम्यतेमुळे सजला आहे. श्रीमंत बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे यांनी 1755 ते 1786 या कालखंडात मंदिराची उभारणी केली. त्याकाळात मंदिर बांधण्यासाठी 16 लाख रुपये खर्च करण्यात आल्याच्या नोंदी आहेत. 31 वर्षे मंदिर निर्माणाचे काम सुरू होते. गोदाकाठी वसलेले त्र्यंबकेश्वर मंदिर काळ्या भक्कम पाषाणापासून निर्मित असून, येथील शिल्प-वास्तुकला अप्रतिम आहे. श्रावणात येथे दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी असते.
छत्रपती संभाजीनगरपासून 30 किमी अंतरावर असणार्या वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराचा उल्लेख शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारताती आढळतो. सोळाव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराव यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार प्रथम केला. त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांनी पुन्हा मंदिराची पुनर्बांधणी केली. लाल रंगाच्या दगडांचा वापर, शिखरावर नक्षीकाम हे या मंदिराचे वैशिष्ट्य असून, शिवलिंगाची स्वयंभू पिंड ही गर्भगृहात आहे. मंदिराजवळ शिवालय तीर्थ असून, 56 पायर्या आहेत. येथे राज्यभरातून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. घृष्णेश्वर हे जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांजवळ असल्याने वेरूळला आलेले पर्यटक आवर्जून घृश्णेश्वराचे दर्शन घेतात.
परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम् .. या ज्योतिर्लिंग स्रोत्रात बीड जिल्ह्यातील परळीचा उल्लेख प्रारंभीच आहे. यादवांच्या काळात श्रीकरणाधीप हेमाद्री याने मंदिराची उभारणी केल्यानंतर अहिल्यादेवींंनी आपल्या कार्यकाळात मंदिराचा जीर्णोद्धार केला. आकर्षक लांब पायर्या, आकर्षक प्रवेशद्वार, सभामंडप व गाभारा समपातळीवर असल्याने दर्शनास सोपे असणारे वैजनाथाचे मंदिर आहे. हेमाडपंथी आणि आकर्षक शैलीकाम असणार्या मंदिराचा परिसर प्रशस्त आहे. परभणी-लातूर रेल्वे मार्गावर परळी वैजनाथ आहे. वैद्यांचा स्वामी अशी भावना असल्यामुळे परळीच्या महादेव पिंडीला स्पर्श केल्यास रोग बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. येथे दरवर्षी श्रावण महिन्यात भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.
हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगचा संदर्भ थेट पांडवकालीन आहे. पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासाच्या काळात मंदिर बांधल्याचे म्हटले जाते. अर्थात पुढे यादवकाळात मंदिराची बांधणी झाली. चुना न वापरता केवळ खाचा करून मंदिर बांधले असून, हेमाडपंथी शैलीचे काम आहे. मंदिरावर आकर्षक असे कोरीव काम असून, महादेवाची पिंड गाभार्यात आहे. इतर दोन ज्योतिर्लिंगाप्रमाणेच या मंदिराचीही नव्याने उभारणी अहिल्यादेवींनी केल्याचे मानले जाते. संत नामदेव कीर्तन करत असताना तत्कालीन पुजार्यांनी त्यांना अडवले व मंदिराच्या मागील बाजूस ढकलले. नामदेवांनी अत्यंत भक्तिभावाने पांडुरंगाचा धावा केला तेव्हा संपूर्ण मंदिर फिरले आणि महाद्वार नामदेवांच्या दिशेने आले, अशी आख्यायिका आहे.