अर्थवार्ता

अर्थवार्ता

प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्प) 

  •  गत सप्‍ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये एकूण अनुक्रमे 19.45 अंक व 30.54 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक 17539.45 अंक व 58803.33 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये किरकोळ 0.11 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 0.05 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. भारतीय चलन रुपयाचा विचार करता, शुक्रवारच्या सत्रात 31 पैसे कमकुवत होऊन रुपया चलनाचा भाव 79.66 रुपये प्रतिडॉलरवरून 79.87 रुपये प्रतिडॉलरपर्यंत पोहोचला. 10 वर्षांच्या सरकारी रोख्यांचा विचार करता (10 धशरी र्ॠेींशीपाशपीं इेपव धळशश्रव) रोख्यांचा दर 2 बेसिस पॉईंट्सनी वधारून 7.2146 टक्क्यांवरून 7.2318 टक्के झाला. रुपयामधील पडझड प्रामुख्याने दोन कारणांमुळे झाली. देशातील आयातदारांकडून डॉलर चलनाला मोठ्या प्रमाणात मागणी आली. तसेच याच दिवशी आशियातील बहुतांश अर्थव्यवस्थांची चलने डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाली.
  •  आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत भारताचा अर्थव्यवस्था वृद्धीदर (जीडीपी ग्रोथ रेट) तब्बल 13.5 टक्क्यांवर पोहोचला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्‍तिकांत दास यांनी 'व्याजदर वाढीचा कमीत कमी परिणाम अर्थव्यवस्था वृद्धी दरावर कसा होईल,' यावर यामुळे रिझर्व्ह बँकेचे लक्ष असणार असल्याचे प्रतिपादन केले. त्याचप्रमाणे नुकताच रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्था वृद्धीदर 16.2 टक्के राहणार असल्याचे भाकित केले होते. अपेक्षित दरापेक्षा वृद्धीदर कमी का आला, याचेही चिंतन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  •  ऑगस्ट महिन्यात 'वस्तू व सेवा' करामार्फत (जीएसटी) 1.44 लाख कोटींचे करसंकलन झाले. मागील वर्षीच्या तुलनेत कर संकलनात 28 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. परंतु जुलै महिन्याच्या विचार करता, कर संकलन 3.6 टक्क्यांनी घटले. त्याचप्रमाणे निर्मिती क्षेत्राची वाटचाल दर्शवणारा मॅन्युफॅक्‍चरिंग परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) या निर्देशांकाने समाधानकारक वाढ दर्शवली. ऑगस्ट महिन्यात पीएमआय दर 56.4 इतका झाला. 50 पेक्षा अधिक पीएमआय आकडा हा या क्षेत्राची वृद्धी (झीेसीशीी) दर्शवतो, तर त्यापेक्षा कमी आकडा या क्षेत्रात झालेली घट दर्शवतो.
  •  पतमानांकन संस्था 'क्रेडिट स्यूईस'च्या अहवालानुसार 'अदानी उद्योग समूहां'वर एकूण 2.6 लाख कोटींचे कर्ज आहे. मागील 5 वर्षांमध्ये कर्ज रक्‍कम 1 लाख कोटींवरून 2.2 लाख कोटी झाली होती. त्यामध्ये होल्सिम समूहाच्या एसीसी सिमेंट आणि अंबुजा सिमेंट कंपन्या खरेदी केल्याने त्यामध्ये 40 हजार कोटींची भर पडेल. कर्जाची रक्‍कम जरी मोठी असली तरी विविध कर्जे ही दूरच्या कालावधीच्या रोख्यांच्या स्वरूपात विभागली गेली आहेत. पुढील 5 वर्षांत केवळ 26 टक्के कर्जाच्या रोख्यांचा कालावधी पूर्ण होत आहे. सुमारे 30 टक्के कर्ज हे परकीय चलन स्वरूपात उचलण्यात आले आहे. अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी ट्रान्समिशनने भांडवल बाजारमूल्याच्या द‍ृष्टीने देशातील 10 वी सर्वात मोठी कंपनी बनण्याचा मान पटकवला. यावर्षी कंपनीच्या समभागात तब्बल 125 टक्क्यांची वाढ दर्शवली. शुक्रवारच्या सत्रात कंपनीचे बाजारमूल्य 4.4 लाख कोटींवर पोहोचले. यामुळे बाजारमूल्याचा विचार करता कंपनीने 'एलआयसी', 'भारती एअरटेल', 'आयटीसी'सारख्या कंपन्यांना मागे टाकले.
  • ऑगस्ट महिन्यात यूपीआयच्या माध्यमातून 6.6 अब्ज व्यवहार झाले. व्यवहार झालेले मूल्य एकूण 10.73 लाख करोड रुपये इतके आहेत. एकूण व्यवहार हे मागील महिन्याच्या तुलनेत 4.6 टक्के वाढले, तर या व्यवहारांच्या मूल्यामध्ये 1 टक्क्यांची वाढ झाली.
  •  'झी एंटरटेनमेंट' आणि 'सोनी' यांच्या एकत्रीकरणास (मर्जर) 'कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया' या सरकारी संस्थेचा अडथळा. एकत्रीकरण पूर्ण झाल्यास ही कंपनी 10 अब्ज डॉलर्स किमतीची होईल. परंतु यामुळे टीव्ही प्रसारण आणि मनोरंजन क्षेत्रात एकाच कंपनीची मक्‍तेदारी निर्माण होईल, असे या सरकारी संस्थेचा कयास आहे. त्यामुळे सर्व बाजू तपासून मगच या एकत्रीकरणास मान्यता दिली जाईल, असे सरकारी संस्थेचे म्हणणे.
  • रिलायन्स समूहाची 45 वी वार्षिक सभा संपन्‍न. दिवाळीपर्यंत देशातील 4 प्रमुख महानगरांमध्ये '5 जी' सेवा सुरू होणार. मुकेश अंबानींची पुढील पिढी व्यवसायात सक्रिय. रिलायन्स-जिओच्या चेअरमनपदी 'आकाश अंबानी.' ईशा अंबानींकडे रिलायन्स रिटेलचा कार्यभार, तर सर्वात धाकटे अनंत अंबानींकडे नवीन ऊर्जा क्षेत्रातील व्यवसायांचा कार्यभार सुपूर्द.
  • 'स्पाईस जेट' प्रवासी विमान वाहतूक कंपनीचा एकूण संचित तोटा 6700 कोटींवर पोहोचला. आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीला 1721.9 कोटींचा तोटा झाला होता. त्यामध्ये मागील जून तिमाहीत 787.9 कोटी तोट्याची भर पडली. यामुळे स्पाईस जेटकडे असलेल्या मालमत्ता आणि कंपनीवर असलेले कर्ज यातील फरक 6691.2 कोटींवर पोहोचला.
  •  केंद्र सरकारने विविध संस्था तसेच विविध कामांसाठी निधी वाटप करण्याच्या प्रक्रियेत बदल केले. यासाठी 'कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया' तर्फे नवीन 'एक्सपेंडिचर मॅनेजमेंट स्कीम' राबवली जाणार. यासाठी केंद्र सरकारकडून संबंधित संस्थेच्या बँक खात्यात गरजेच्यावेळी आणि गरजेपुरता थेट निधी जमा केला जाणार. यामुळे संबंधित संस्थेच्या खात्यात निधी विनावापर पडून राहण्याचे प्रमाण घटेल. केंद्र सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांसाठी ही प्रक्रिया लागू होईल. यापुढे निधी वापरानुसार निधी वाटप करण्यात येईल.
  •  26 ऑगस्ट रोजी संपलेल्या सप्‍ताहात भारताची परकीय गंगाजळी 3.007 अब्ज डॉलर्सनी घटून 561.046 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेच्या अहवालानुसार युनायटेड किंगडम देशाला मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news