

शैलेश धारकर
सक्रिय (अॅक्टिव्ह) टेक फंडांमध्ये वर्षभरात सरासरी 5.8 टक्के घसरण झाली आहे, तर दुसरीकडे ‘निफ्टी आयटी इंडेक्स’ तब्बल 17 टक्क्यांनी गडगडला आहे. तज्ज्ञांच्या मते, या सक्रिय योजनांना त्यांच्या वैविध्यपूर्ण स्वरूपामुळे फायदा झाला आहे. डिजिटल आणि आयटी कंपन्यांव्यतिरिक्त, नव्या युगातील कंपन्या (न्यू जनरेशन कंपन्या) या योजनांचा मुख्य आधार आहेत.
निर्देशांक आणि फंडांच्या कामगिरीतील तफावत
टेक फंड आणि आयटी सूचकांक यांच्या कामगिरीतील या मोठ्या फरकाचे कारण ‘निफ्टी इंडिया डिजिटल निर्देशांका’च्या रचनेवरून स्पष्ट होते. हा इंडेक्स भारतातील तंत्रज्ञान क्षेत्राचे व्यापक प्रतिनिधित्व करतो. यातील 10 मोठ्या कंपन्यांपैकी सहा कंपन्या इंटरनल, भारती एअरटेल, पीबी फिनटेक, इन्फो एज (इंडिया), वन 97 कम्युनिकेशन्स आणि स्विगी या गैर-आयटी क्षेत्रातील आहेत. गेल्या एका वर्षात सुमारे 3.5 टक्क्यांची घसरण नोंदवणार्या या निर्देशांकाची कामगिरी सक्रिय टेक फंडांच्या कामगिरीशी सुसंगत राहिली आहे.
वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओचा लाभ
फंड मॅनेजर्सनी टेक फंडांच्या मजबुतीचे श्रेय त्यांच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओला दिले आहे. इन्व्हेस्को फंडाचे व्यवस्थापक हितेन जैन सांगतात की, आमची योजना आयटी सेवांसह अशा व्यवसायांमध्ये गुंतवणूक करते जिथे तंत्रज्ञान हा मुख्य विषय आहे. यामध्ये ग्राहक तंत्रज्ञान (कंझ्युमर टेक), फिनटेक, औद्योगिक तंत्रज्ञान, हार्डवेअर आणि दूरसंचार क्षेत्राचा समावेश होतो. ज्या कंपन्यांनी तंत्रज्ञानात सुरुवातीलाच मोठी गुंतवणूक केली आहे आणि जिथे विकासाची मोठी संधी आहे अशा कंपन्यांमध्ये हा फंड गुंतवणूक करतो. हा प्रामुख्याने विकासोन्मुख (ग्रोथ ओरिएंटेड) फंड असून, त्याच्या संरचनेत ‘व्हॅल्यू’चा वाटा सुमारे 25 टक्के आहे.
भविष्यातील वाटचाल
बाजारातील घसरणीमुळे समभागांचे मूल्यांकन (व्हॅल्युएशन) आता रास्त झाले आहे. अशा स्थितीत तंत्रज्ञान फंडांमध्ये आयटी समभागांचे वजन (वेटेज) वाढू शकते. जैन यांच्या मते, आकर्षक मूल्यांकनामुळे आयटी समभागांमधील गुंतवणूक वाढवली जाऊ शकते; मात्र फंडाची मूळ रणनीती बदलणार नाही.
सध्या भारतीय आयटी समभागांवर दबाव कायम आहे. ‘एआय’मधील वेगवान प्रगतीमुळे या क्षेत्रातील पारंपरिक आणि मनुष्यबळावर आधारित व्यवसाय मॉडेलमध्ये अडथळे येऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. जागतिक ग्राहकांनी तंत्रज्ञानावरील अवांतर खर्चात (डिस्क्रीशनरी स्पेंडिंग) कपात केल्याने बाजारातील गुंतवणूकदारांचा उत्साह मावळला आहे.
मोतीलाल ओसवाल एएमसीने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, ‘एआय’चा प्रभाव कोडिंगसारख्या खालच्या स्तरावरील तांत्रिक नोकर्यांवर त्वरित दिसून येईल. मात्र, हा भाग भारतीय आयटीच्या एकूण कामाचा छोटा हिस्सा आहे. येणार्या काळात ग्राहक कंपन्यांकडे अधिक सवलतींची मागणी करू शकतात. भारतीय आयटी कंपन्या स्वतःच्या ‘एआय’ साधनांचा वापर करून याला उत्तर देऊ शकतात, ज्यामुळे मजुरीचा खर्च कमी होईल आणि काही लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाईल. मात्र, यामुळे नफ्याचे प्रमाण (प्रॉफिट मार्जिन) एका मर्यादित कक्षेतच राहण्याची शक्यता आहे.
जागतिक गुंतवणुकीचा आधार
एडेलवाईस टेक्नॉलॉजीसारख्या काही फंडांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय विस्तारामुळे फायदा झाला आहे. एडेलवाईस फंडाचे अध्यक्ष आणि सीआयओ (इक्विटीज) त्रिदीप भट्टाचार्य यांनी सांगितले की, आमच्या जागतिक पोर्टफोलिओची मांडणी हे टेक फंडाच्या सरस कामगिरीचे महत्त्वाचे कारण ठरले आहे. गेल्या दोन वर्षांत आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान चक्राच्या विकासाला अनुसरून अमेरिकन तंत्रज्ञान क्षेत्रात धोरणात्मकरीत्या 20 ते 30 टक्के अतिरिक्त गुंतवणूक कायम ठेवली. यामुळे आम्हाला अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांमधील ‘एआय’वरील खर्चात झालेल्या वाढीचा प्रभावी लाभ घेता आला. तसेच, भारतीय आयटी क्षेत्रातील बदलांचे व्यवस्थापन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यास मदत झाली.