

Indian Stock Market: जागतिक शेअर बाजारांमध्ये सध्या तेजीचं वातावरण आहे. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया आणि तैवानसारख्या देशांच्या बाजारांनी गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला आहे. मात्र याच काळात भारतीय शेअर बाजाराची वाटचाल तुलनेने संथ राहिली आहे. निफ्टीने गेल्या एका वर्षात नकारात्मक परतावा दिला असून अनेक गुंतवणूकदारांच्या अपेक्षांवर पाणी फिरलं आहे.
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, यामागे केवळ परदेशी गुंतवणूकदारांची (FII) विक्री जबाबदार नाही. भारतीय बाजारातील सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली कंपन्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसणे हेही एक महत्त्वाचे कारण आहे.
भारतातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात विशेष वाढ झालेली नाही. उलट कंपनीच्या बाजारमूल्यात घट झाली आहे. त्याचप्रमाणे HDFC बँक, TCS, इन्फोसिस यांसारख्या दिग्गज कंपन्यांचाही वेग मंदावलेला दिसतो. भारतीय बाजाराची दिशा ठरवणाऱ्या या कंपन्याच अपेक्षित कामगिरी करू शकत नसल्याने संपूर्ण बाजारावर दबाव निर्माण होत आहे. याउलट, जगातील आघाडीच्या बाजारांमध्ये मोठ्या कंपन्यांनीच तेजीचं नेतृत्व केलं आहे.
दक्षिण कोरियाच्या बाजाराने गेल्या वर्षभरात जबरदस्त झेप घेतली आहे. यामागे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचा मोठा वाटा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे सॅमसंगच्या शेअरमध्ये मोठी तेजी आली. कंपनीचं बाजारमूल्य विक्रमी पातळीवर पोहोचलं आहे.
जपानच्या बाजाराला सॉफ्टबँक ग्रुपने नवी उंची दिली आहे. AI क्षेत्रातील गुंतवणूक आणि तंत्रज्ञान कंपन्यांमधील वाढत्या संधींमुळे कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. याचा थेट फायदा जपानी बाजाराला झाला.
तैवानच्या शेअर बाजाराचा कणा मानली जाणारी TSMC ही कंपनी आज जगातील सर्वात महत्त्वाच्या चिप उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. Apple, NVIDIA, AMD यांसारख्या कंपन्यांसाठी अत्याधुनिक चिप्स तयार करणाऱ्या TSMC मुळे तैवानच्या बाजाराला मोठी चालना मिळाली आहे.
अमेरिकेतील शेअर बाजाराच्या तेजीचं सर्वात मोठं कारण म्हणजे NVIDIA. AI क्रांतीमुळे कंपनीची मागणी प्रचंड वाढली आहे. डेटा सेंटर्स आणि AI साठी लागणाऱ्या चिप्सच्या बाजारात NVIDIA आघाडीवर असल्याने कंपनीचं बाजारमूल्य विक्रमी पातळीवर पोहोचलं आहे.
चीनमध्ये Tencent आणि Alibaba सारख्या कंपन्यांवर नियामक दबाव असला तरी इतर मोठ्या कंपन्यांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे चीनचा बाजार पूर्णपणे कोसळलेला नाही.
भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असली तरी शेअर बाजाराला पुढे नेण्यासाठी मोठ्या कंपन्यांकडून दमदार कामगिरी अपेक्षित आहे. रिलायन्स, HDFC बँक, TCS, इन्फोसिस यांसारख्या बाजारातील 'लीडर' कंपन्यांच्या शेअरमध्ये जोपर्यंत मोठी हालचाल दिसत नाही, तोपर्यंत निफ्टी आणि सेन्सेक्सला मोठी झेप घेणं कठीण मानलं जात आहे.
याशिवाय परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री, जागतिक अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि कमाईतील दबाव यामुळे भारतीय बाजार सध्या सावध पवित्र्यात आहे.
सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, जगातील अनेक बाजारांमध्ये आघाडीच्या कंपन्या तेजीचं इंजिन बनल्या आहेत. भारतात मात्र हे इंजिन अजून पूर्ण वेगाने धावू लागलेलं नाही. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराची गाडी सध्या अपेक्षेपेक्षा मंद गतीने पुढे जाताना दिसत आहे.