

जयदीप नार्वेकर
जागतिक आर्थिक अनिश्चितता, कृत्रिम बुद्धिमत्तेतील वाढती गुंतवणूक, कच्च्या तेलाच्या किमती आणि भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ यांचा शेअर बाजारावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडून हे वर्ष नव्या संधींबरोबरच आव्हानांचे ठरण्याची शक्यता आहे. देशातील व्याजदर आणखी वाढण्याची चिन्हे असली, तरी भारतीय कंपन्यांच्या समभागांचे मूल्यांकन तुलनेने आकर्षक पातळीवर आल्याने परदेशी गुंतवणूकदार पुन्हा भारतीय बाजाराकडे वळू शकतात.
भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरवाढीची सुरुवात केल्यानंतर आगामी काळात अल्पकालीन रेपो दर आणखी ५० ते ७५ आधार अंकांनी वाढू शकतात, म्हणजेच व्याजदरात आणखी ०.५० ते ०.७५ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. चलनविषयक धोरण अधिक कठोर झाल्यास दीर्घ मुदतीच्या रोख्यांवर दबाव वाढू शकतो. व्याजदरवाढीचा परिणाम उद्योगांच्या कर्जखर्चावर, विस्तार योजनांवर आणि पर्यायाने शेअर बाजारातील गुंतवणुकीवर होऊ शकतो, असा कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी अंदाज व्यक्त केला आहे.
परदेशी गुंतवणूक पुन्हा वाढणार?
वर्षभर भारतीय शेअर बाजाराला मोठ्या चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. भारतीय समभागांचे मूल्यांकन तुलनेने अधिक असल्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर निधी काढून घेतला. अमेरिकेत कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित कंपन्यांच्या समभागांमध्ये आलेल्या तेजीमुळे जागतिक गुंतवणुकीचा ओघ त्या दिशेने वळला. त्याचवेळी पश्चिम आशियातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने अधिक तीव्र झाली. मात्र, गेल्या सहा महिने ते वर्षभराच्या तुलनेत भारतीय समभागांचे मूल्यांकन आता अधिक आकर्षक झाले आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत पुन्हा आकर्षक ठरू शकतो, असे कोटक यांचे मत आहे.
चालू खात्यातील तूट वाढण्याची चिंता
भारतीय अर्थव्यवस्थेसमोर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचे मोठे आव्हान आहे. कोटक यांच्या माहितीनुसार, मार्च २०२६ अखेरच्या आर्थिक वर्षात भारताची चालू खात्यातील तूट २६ अब्ज डॉलर होती. याच काळात देशाने ७२ अब्ज डॉलरचे सोने आयात केले. मात्र, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे चालू आर्थिक वर्षात चालू खात्यातील तूट ६५ ते ७० अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. ही वाढ रुपयाच्या विनिमय दरावर आणि परदेशी गुंतवणुकीच्या प्रवाहावर परिणाम करू शकते.
गुंतवणूकदारांनी कोणती भूमिका घ्यावी?
बाजारातील अनिश्चिततेच्या काळातही भारतीय किरकोळ गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या संयमाचे कोटक यांनी कौतुक केले आहे. परदेशी संस्थांनी मोठ्या प्रमाणावर समभागविक्री केली असतानाही देशांतर्गत गुंतवणूकदारांनी शेअर बाजारावरील विश्वास कायम ठेवला. दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेतील गुंतवणुकीचा धोका
कृत्रिम बुद्धिमत्ता जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे परिवर्तन घडवणार असल्याचे कोटक मान्य करतात. मात्र, या क्षेत्रातील संधींचा लाभ घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी प्रचंड भांडवली गुंतवणूक केली आहे. परिणामी, काही कंपन्यांचे बाजारमूल्य त्यांच्या प्रत्यक्ष आर्थिक कामगिरीच्या तुलनेत अधिक वाढल्याची शक्यता आहे. या मूल्यांकनात सुधारणा झाल्यास जागतिक गुंतवणुकीचा काही भाग पुन्हा भारतासारख्या बाजारांकडे वळू शकतो. तथापि, भारतीय बाजारात सुमारे ७०० अब्ज डॉलरची परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक असल्याने जागतिक भांडवली प्रवाहातील बदलांचा परिणाम भारतावरही होऊ शकतो.