पुढारी ऑनलाईन डेस्क : अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासह सात जणांवर अमेरिकेतील न्यूयॉर्क कोर्टात लाचखोर (US bribery charges) आणि फसवणुकीचा आरोप निश्चित केला आहे. दरम्यान, अदानी समुहाने गौतम अदानींवरील आरोप फेटाळून लावले आहेत. अदानी समुहाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, "अदानी ग्रीनच्या संचालकांवर अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने केलेले आरोप बिनबुडाचे असून ते आम्ही फेटाळत आहोत. यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनेच म्हटल्याप्रमाणे, "हे आरोपपत्रातील आरोप आहेत आणि जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रतिवादींना निर्दोष मानले जाते." आम्ही शक्य सर्व कायदेशीर मार्ग शोधू." असे अदानी समुहाने नमूद केले आहे.
गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासह सात जणांवर सिक्युरिटीज फसवणूक, वायर फ्रॉड आणि फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ॲक्ट (FCPA) चे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकेत आरोप ठेवण्यात आले आहेत. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. त्यांच्यावर अमेरिकेत त्यांच्या कंपनीला कंत्राट मिळण्यासाठी २६५ दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचा आणि हे प्रकरण लपवल्याचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणी गौतम अदानी आणि त्यांच्या पुतण्याला अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन फेडरल कोर्टात त्यांच्यावरील आरोप निश्चित करण्यात आले आहेत. सौरऊर्जा कंत्राट मिळवण्यासाठी लाच देणे आणि सुमारे ३ अब्ज डॉलर्स उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा अदानींवर आरोप आहे.
या आरोपानंतर अदानी एंटरप्रायजेसचा शेअर्स २० टक्क्यांनी घसरून २,२५७ रुपयांवर आला. अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या शेअर्सला २० टक्क्यांचे लोअर सर्किट लागले. अदानी पोर्ट्स शेअर्सदेखील २० टक्के घसरला. यामुळे अदानींच्या शेअर्सचे बाजार भांडवल २.२५ लाख कोटींनी कमी होऊन १२ लाख कोटींवर आले.