

देशात आता कॅशलेस व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. बहुतांश लोक कॉलेज फी, किराणा सामान, वीज-बिल, अगदी रेस्टॉरंटचे बिलही UPI ने भरतात. पण जसा UPI वापर वाढलाय, तसाच फसवणूक करणाऱ्यांचा धोका देखील वाढलाय. सायबर गुन्हेगार तुमच्या छोट्या-छोट्या चुकांच्या शोधात असतात आणि एकदा चूक झाली की तुमचे संपूर्ण बँक खाते रिकामे करायला त्यांना काही सेकंदही लागत नाहीत. त्यामुळे, UPI वापरताना सावधगिरी खूप महत्त्वाची आहे.
फोनवर, मेसेजवर किंवा सोशल मीडियावर कोणीही तुमचा UPI पिन विचारला तर तो कधीही देऊ नका. लक्षात ठेवा बँकेचा अधिकारी, सरकारी कर्मचारी किंवा कंपनीतील कोणीही तुमचा पिन विचारत नाही. जर कोणी स्वतःला बँक अधिकारी सांगून पिन मागत असेल, तर ते नक्की फसवणूक आहे.
UPI मध्ये "पे रिक्वेस्ट" येते तेव्हा काळजीपूर्वक पाहा. आपण ज्या ई-कॉमर्स साइटवरून खरेदी केली आहे त्यांच्याकडूनच ती रिक्वेस्ट आली आहे का हे तपासा. अनोळखी नंबर किंवा साइटवरून पे रिक्वेस्ट आली तर लगेच नाकारावी.
प्रत्येक QR कोड पैसे मिळविण्यासाठीच नसतो. काहीवेळा फसवणूक करणारे बनावट QR कोड लावून लोकांना जाळ्यात अडकवतात. म्हणूनच रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी, अज्ञात दुकानांमध्ये QR कोड स्कॅन करण्यापूर्वी खात्री करा. शंका आली तर UPI ऐवजी रोख किंवा इतर डिजिटल पर्याय वापरा.
UPI व्यवहारांसाठी नेहमीच Google Play Store किंवा Apple App Store वरून अधिकृत अॅप्स डाउनलोड करा. अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या लिंक्सवरून अॅप डाउनलोड करू नका. अशा अॅप्समुळे तुमचे पासवर्ड, पिन आणि वैयक्तिक माहिती चोरी होऊ शकते.
UPI वापरत असाल तर मोबाईलमध्ये नेहमीच लॉक ठेवा – पिन, पॅटर्न किंवा फिंगरप्रिंटने. यामुळे तुमचा मोबाईल हरवला तरी इतर कुणालाही तुमच्या UPI अॅपमधून व्यवहार करता येणार नाहीत.
बँकेकडून आलेले प्रत्येक SMS किंवा नोटिफिकेशन वाचा. कधी तुमच्या खात्यातून अनधिकृत व्यवहार झाला तर लगेच बँकेला कळवा.
UPI वापर सोयीचा आहे, पण योग्य काळजी घेतली नाही तर धोका मोठा आहे. त्यामुळे UPI वापरताना प्रत्येक व्यवहार नीट तपासा, पिन कोणालाही सांगू नका, QR स्कॅन करताना सावध रहा आणि फक्त अधिकृत अॅप्स वापरा. छोटीशी सावधगिरी तुम्हाला मोठ्या फसवणुकीपासून वाचवू शकते.