

सातारा : आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गत काही महिन्यांपासून महागाईचा आलेख चढता राहिला असतानाच आता साखरेच्या दरात वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर साखर महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. दरवाढीमुळे स्वयंपाकघरातील साखरेचा वापर बेताने करावा लागणार असल्याने गोड साखरेची चव कडू होणार आहे.
जिल्ह्यात ऊस उत्पादन क्षेत्र मुबलक असल्याने १७ साखर कारखान्यांमध्ये साखर उत्पादन करण्यात आले आहे. मात्र देशात साखर साठा मर्यादित असल्याने तसेच इथेनॉल निर्मितीकडे कारखानदारांचा वाढता कल यामुळे बाजारपेठेत साखरेच्या दराने उसळी घेतली आहे. मागील एक महिन्यात साखरेच्या दरात सुमारे २० ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे.
सध्या श्रावण महिना सुरु असल्याने व्रतवैकल्यांची रेलचेल वाढली आहे. मंगळागौरीपासून श्रावण पूजेपर्यंत अनेक धार्मिक विधी व महाप्रसादांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सव तोंडावर आला असून दिवाळीपर्यंत ही सण-उत्सवांची रेलचेल सुरुच राहणार आहे. त्यामुळे साखरेला मागणी वाढणार आहे. अशातच साखरेच्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला चाट बसणार आहे. सर्वसामान्यांसह कष्टकरी वर्गाला याचा अधिक फटका बसणार आहे.
गृहिणींसह सर्वच मोठ्यांच्या दिवसाची सुरुवात सकाळच्या गोड चहाने होते. लहाग्यांना नाष्ट्यामध्ये तुपातला शिरा पौष्टिक म्हणून दिला जातो. मात्र साखरेच्या दरात उच्चांकी वाढ झाल्यामुळे स्वयंपाकघराचे मासिक बजेट सांभाळताना गृहिणींना साखरेचा वापर बेताने करावा लागणार आहे. वृत्तपत्र विक्रेते, रात्रपाळीत काम करणारे कर्मचारी यांना वारंवार चहा पिण्याची सवय असते. मात्र साखरेच्या दरवाढीमुळे चहाची तलफ कमी करावी लागणार आहे.