Stock Markets Updates
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लागू केलेल्या 'टॅरिफ'चा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांवर मोठा परिणाम दिसून आला नाही. शेअर बाजाराने आज घसरणीसह सुरुवात केली होती. पण त्यानंतर बाजाराने यू-टर्न घेतला आणि सेन्सेक्स- निफ्टी सपाट पातळीवर हिरव्या रंगात बंद झाले. सेन्सेक्स ७९ अंकांनी वाढून ८०,६२३ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक २१ अंकांच्या किरकोळ वाढीसह २४,५९६ वर स्थिरावला. विशेषतः IT, मीडिया आणि फार्मा शेअर्समध्ये खरेदी दिसून आली.
ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादले आहे. रशियाकडून केल्या जात असलेल्या तेल खरेदीमुळे त्यांनी हे टॅरिफ लागू केले आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात सुरुवातीला काही प्रमाणात दबाव राहिला. दुपारच्या सत्रात बाजारात घसरण वाढत गेली. पण त्यानंतर आजच्या सत्रातील अखरेच्या तासात जोरदार रिकव्हरी दिसून आली. यामुळे सेन्सेक्स- निफ्टी वाढून बंद झाले.
क्षेत्रीय निर्देशांकातील निफ्टी आयटी, मीडिया आणि फार्मा ०.५ ते १ टक्के वाढून बंद झाले. ऑटो आणि पीएसयू बँक निर्देशांकही वाढला. तर दुसरीकडे रियल्टी निर्देशांकात घसरण दिसून आली.
सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इटरनल, ॲक्सिस बँक, मारुती, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स ०.५ ते १.७ टक्क्यांपर्यंत वाढले. तर दुसरीकडे अदानी पोर्ट्स, ट्रेंट, टाटा मोटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, एनटीपीसी, एम अँड एम हे शेअर्स ०.५ ते १.५ टक्क्यांपर्यंत घसरले.