

Stock Market Updates
शेअर बाजारात शुक्रवारी (दि.११ जुलै) दबाव कायम आहे. सेन्सेक्स २०० अंकांच्या घसरणीसह ८३ हजारांच्या खुला झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ४७ अंकांनी घसरून २५,३०० वर व्यवहार करत आहेत. मुख्यतः प्रमुख आयटी कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रमुख व्यापारी भागीदार देश कॅनडावर नवीन टॅरिफ लागू केले आहे. इतर देशांवर टॅरिफ लागू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याचा दबाव बाजारात दिसून आला आहे.
सेक्टर्समध्ये निफ्टी आयटी निर्देशांक १.४ टक्के घसरला आहे. निफ्टी आयटीवर टीसीएस कंपनीचा शेअर्स २.२ टक्के घसरून टॉप लूजर ठरला आहे. विप्रो, LTIMindtree, इन्फोसिस, एचसीएल टेक हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.
ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सचा शेअर्स वधारला असून या शेअर्सला १० टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले.
सेन्सेक्सवर हिंदुस्तान युनिलिव्हरचा शेअर्स ४.४ टक्के वाढला आहे. त्याचबरोबर एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, ॲक्सिस बँक, एनटीपीसी हे शेअर्सही तेजीत खुले झाले आहेत. तर दुसरीकडे टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक, एम अँड एम, भारती एअरटेल, एचसीएल टेक, रिलायन्स हे शेअर्स १ ते २ टक्के घसरले.
बाजारासाठी कमकुवत संकेत आहेत. बाजारातील घसरणीचे आणखी एक कारण म्हणजे कार्पोरेट कंपन्यांच्या तिमाही निकालांची कमकुवत सुरुवात होय. पहिल्या तिमाहीत टीसीएस आणि टाटा एलेक्ससीच्या उत्पन्न आणि नफ्यात घट झाल्याचे दिसून आले.