

Stock Market Updates
मुंबई : भारतीय शेअर बाजाराची आज गुरुवारी (दि.१५) सुस्त सुरुवात झाली. त्यानंतर सेन्सेक्स- निफ्टी घसरले. सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरून ८०,९०० च्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक १४७ अंकांनी घसरून २४,५०० वर व्यवहार करत आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सलग चौथ्या दिवशी वाढीसह चांगली कामगिरी करत आहेत. दरम्यान, रियल्टी आणि बँक शेअर्सवर दबाव दिसून आला.
सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड, एनटीपीसी, कोटक बँक, नेस्ले इंडिया, इन्फोसिस, इंडसइंड बँक, सन फार्मा हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के घसरले. तर टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील हे शेअर्स तेजीत खुले झाले आहेत.
सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या अमेरिका-चीन व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर आठवड्याच्या सुरुवातीला जोरदार तेजी राहिली होती. पण काल बुधवारी अमेरिकेतील बाजारात संमिश्र स्थिती दिसून आली. दरम्यान, आशियाई बाजारात आज काही प्रमाणात दबाव दिसून आला. जपानचा निक्केई निर्देशांक घसरला आहे.
देशातील महागाईत घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरबीआयकडून व्याजदर कपातीच्या आशेने भारतीय शेअर बाजाराने बुधवारी (दि.१४) तेजीत व्यवहार केला होता. बुधवारी सेन्सेक्स १८२ अंकांनी वाढून ८१,३३० वर, तर निफ्टी ५० निर्देशांक ८८ अंकांनी वाढून २४,६६६ वर बंद झाला. पण आज गुरुवारी दोन्ही निर्देशांक लाल रंगात रंगले.