

Stock Market updates
मुंबई : भारतीय शेअर बाजारातील सात सत्रांतील तेजीला गुरुवारी (दि.२४) ब्रेक लागला. सेन्सेक्स आज ८० हजारांवर खुला झाला. त्यानंतर सेन्सेक्स १०० हून अधिक अंकांच्या घसरणीसह ८० हजारांच्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक २९ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,३०० जवळ व्यवहार करत आहे.
बुधवारी सेन्सेक्स ५२० अंकांनी वाढून ८०,११६ वर बंद झाला होता. तर निफ्टी ५० निर्देशांक १६१ अंकांच्या वाढीसह २४,३२८ वर स्थिरावला होता. आज बाजारात सुस्ती दिसून येत आहे.
हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बँकिंग शेअर्स घसरणीचा शेअर बाजारावर दिसून येत आहे. दरम्यान, परदेशी गुंतवणुकीचा ओघ आणि अमेरिका-चीन दरम्यान व्यापार तणाव कमी होण्याच्या अपेक्षेने बाजाराला काही प्रमाणात आधार मिळाला.
सेन्सेक्सवर भारती एअरटेल, एम अँड एम, आयसीआयसीआय बँक, Eternal, रिलायन्स, टीसीएस, एचसीएल टेक, इन्फोसिस, एचडीएफसी बँक हे शेअर्स घसरले आहेत. तर इंडसइंड बँकेचा शेअर्स सर्वाधिक ४ टक्के वाढला आहे. नेस्ले इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, ॲक्सिस बँक, मारुती, बजाज फायनान्स हे शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत.
क्षेत्रीय पातळीवर निफ्टी फायनान्सियल, ऑटो, मेटल, रियल्टी, ऑईल अँड गॅस हे लाल रंगात खुले झाले. तर निफ्टी पीएसयू बँक आणि फार्मामध्ये तेजी दिसून आली. निफ्टी फार्मा १.३ टक्के वाढला आहे. निफ्टी फार्मावर नॅटको फार्माचा शेअर्स ७ टक्के वाढला आहे. त्याचबरोबर डिव्हिस लॅब ५ टक्के, लुपिनचा २.५ टक्के वाढला आहे.
भारतीय बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम राहिला आहे. एनएसईच्या आकडेवारीनुसार, बुधवारी परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) ३,३३२ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी १,२३४ कोटींच्या शेअर्सची विक्री केली.
ओपेक प्लस देश उत्पादन वाढवणार असल्याच्या वृत्तामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत २ टक्क्यांनी घसरण झाली. ब्रेंट प्रति बॅरेल ६६ डॉलर्सच्या जवळ पोहोचले आहे. दुसरीकडे, सोन्याचा दरदेखील त्याच्या विक्रमी उच्चांकावरून घसरला आहे.