

Stock Market Updates
भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी (दि.२९ जुलै) सुरुवातीच्या घसरणीतून सावरत जोरदार रिकव्हरी केली. सेन्सेक्स ४४६ अंकांनी वाढून ८१,३३७ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १४० अंकांच्या वाढीसह २४,८२१ वर स्थिरावला. विशेषतः फार्मा आणि रियल्टी सेक्टरमध्ये बंपर खरेदी दिसून आली. निफ्टी रियल्टी १.६ टक्के आणि निफ्टी फार्मा निर्देशांक १.३ टक्के वाढून बंद झाला.
सेन्सेक्स आणि निफ्टीची सुरुवात घसरणीसह झाली होती. पहिल्या तिमाहीतील कमाईचे सकारात्मक आकडे आणि मजबूत जागतिक संकेतांमुळे बाजाराला घसरणीतून सावरण्यास मदत झाली. यामुळे बाजारातील तीन सत्रातील घसरण थांबली. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक सारख्या हेवीवेट शेअर्समधील खरेदीमुळे गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या.
सेन्सेक्सवर रिलायन्सचा शेअर्स २.२ टक्के वाढला. त्याचबरोबर एलटी, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, मारुती, भारती एअरटेल हे शेअर्स १ ते २ टक्के वाढले. बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, एचसीएल टेक हे शेअर्सही तेजीत बंद झाले. तर दुसरीकडे ॲक्सिस बँक, टीसीएस, टायटन, बजाज फिनसर्व्ह, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स घसरले.
विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री आणि कार्पोरेट कंपन्यांची कमकुवत कमाईच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स आणि निफ्टी गेल्या तीन सत्रात घसरले. पण आज या घसरणीला ब्रेक लागला.
शेअर बाजारातील भयसूचकांक इंडिया VIX निर्देशांक आज २.९ टक्के घसरला. या निर्देशांकात झालेली घसरण गुंतवणूकदारांची चिंता कमी झाल्याचे संकेत देते. यामुळे शेअर बाजाराला मोठा आधार मिळतो. दरम्यान, जागतिक मजबूत संकेतामुळेही शेअर बाजाराला उभारी मिळाली.