

Stock Market Updates
मुंबई : भारतीय शेअर बाजारात बुधवारी (दि.३०) दबाव दिसून आला. सुरुवातीला सेन्सेक्स १५० अंकांनी घसरून ८०,१४० च्या खाली तर निफ्टी ५० निर्देशांक २४,३०० जवळ खुला झाला. त्यानंतर दोन्ही निर्देशांक लगेच सपाट पातळीवर आले. विशेषतः फायनान्सियल शेअर्सवर अधिक दबाव राहिला आहे.
परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात सलग दहाव्या दिवशी खरेदी कायम ठेवली आहे. आशियाई बाजारातूनही मजबूत संकेत दिसून येत आहेत. पण भारतीय शेअर बाजाराने बुधवारी सावध सुरुवात केली.
सेन्सेक्सवर बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv), बजाज फायनान्स (Bajaj Finance) हे शेअर्स अनुक्रमे ६ टक्के आणि ५.५ टक्के घसरले आहेत. टाटा मोटर्स, एसबीआय, अल्ट्राटेक सिमेंट, ॲक्सिस बँक, टाटा स्टील, इंडसइंड बँक, रिलायन्स हे शेअर्सही घसरले आहेत. तर पॉवरग्रिड, सन फार्मा, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, एम अँड एम, एलटी हे शेअर्स तेजीत खुले झाले आहेत.
क्षेत्रीय पातळीवर संमिश्र ट्रेंड दिसून येत आहे. निफ्टी ऑटो आणि पीएसयू बँक सुमारे १ टक्के घसरले आहेत. तर दुसरीकडे एफएमसीजी, आयटी आणि फार्मा निर्देशांक तेजीत आहेत. दरम्यान, भय सूचकांक इंडिया VIX दोन टक्क्यांनी वाढून १७ वर पोहोचला आहे. यातून बाजारातील अस्थिरता आणि अनिश्चितता दिसून येते.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) भारतीय बाजारात सलग १० व्या सत्रांत खरेदी कायम ठेवली आहे. त्यांनी १० सत्रांत ३७,३०० कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली आहे. मंगळवारी (२९ एप्रिल) परदेशी गुंतवणूकदारांनी २,३८५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. तर, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनीदेखील (DIIs) तिसऱ्या दिवशी खरेदीवर जोर दिला. त्यांनी मंगळवारी एका दिवसात १,३६९ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. यामुळे सध्याच्या भू-राजकीय तणावाच्या परिस्थितीत बाजाराला मोठा आधार मिळाला आहे.