

पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्थव्यवस्थेच्या मंद गतीची चिंता आज बुधवारी (दि.८) भारतीय शेअर बाजारात (Stock Market) दिसून आली. आजच्या सत्रात चढ- उतारानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ घसरणीसह बंद झाले. आजच्या सत्रात सेन्सेक्स (Sensex) सुमारे ७०० अंकांच्या घसरणीसह ७७,५०० च्या खाली आला होता. त्यानंतर त्यात रिकव्हरी दिसून आली. सेन्सेक्स ५० अंकांच्या किरकोळ घसरणीसह ७८,१४८ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक (Nifty) १८ अंकांच्या घसरणीसह २३,६८८ वर स्थिरावला. विशेष म्हणजे बीएसई सेन्सेक्सने आज दिवसाच्या निचांकी पातळीवरून सुमारे ६५० अंकांची रिकव्हरी केली.
बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट पातळीवर बंद झाले. आजच्या अस्थिरतेनंतर सत्राच्या शेवटच्या तासात दोन्ही निर्देशांक घसरणीतून सावरले. रिलायन्स आणि आयटी शेअर्समधील तेजीचा बाजाराला आधार मिळाला. पण मिडकॅप्स आणि बँकिंग शेअर्समध्ये तीव्र घसरण झाल्याने व्यापक बाजाराची कामगिरी कमकुवत राहिली.
एफएमसीजी, ऑईल आणि गॅस, आयटी निर्देशांकांत वाढ झाली. तर पीएसयू बँक, फार्मा, मेटल, मीडिया, बँक आणि ऑटो निर्देशांकात घसरण दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप प्रत्येकी १ टक्के घसरले.
अपेक्षेपेक्षा कमकुवत जीडीपी अंदाज, तिसऱ्या तिमाहीतील कॉर्पोरेट कमाईबाबतची चिंता, मजबूत आर्थिक आकडेवारीने अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची कमी झालेली शक्यता यासह अनेक घटक आज बाजारातील घसरणीसाठी कारणीभूत ठरले.
सेन्सेक्सवर अल्ट्राटेक सिमेंट, अदानी पोर्ट्स, आयसीआयसीआय बँक, एलटी, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, झोमॅटो, एसबीआय हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले. तर टीसीएस. रिलायन्स, आयटीसी, एशियन पेंट्स हे शेअर्स १.८ ते २ टक्के वाढले.
निफ्टी ५० निर्देशांकावर अपोलो हॉस्पिटल, ट्रेंट, श्रीराम फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज ऑटो हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले. तर ओएनजीसी, टीसीएस, रिलायन्स, एशियन पेंट्स, आयटीसी हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले.
झोमॅटोचा (Zomato Share Price) शेअर्स आज सलग चौथ्या सत्रात घसरला. गेल्या चार सत्रात हा शेअर्स तब्बल १४ टक्क्यांनी घसरला आहे. डिसेंबर २०२४ या शेअर्सने ३०४ रुपयांचा उच्चांक गाठला होता. आज तो २५० रुपयांपर्यंत खाली आला.