

विधिषा देशपांडे
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, जर आपले भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर महागाईवर मात करण्याची क्षमता असलेल्या योजनेत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. याबाबत अनेक फॉर्म्युले सांगितले जातात. यामध्ये आज आपण 25/2/25/35 या फॉर्म्युल्याविषयी जाणून घेणार आहोत. यामध्ये तुम्ही फक्त दरमहा 2000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करून स्वतःला करोडपती बनवू शकता.
करोडपती बनणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. सामान्यतः लोकांना असे वाटते की आपला पगार किंवा मिळकत कमी असल्याने करोडपती बनणे हे केवळ मृगजळ आहे; परंतु योग्य रणनीतीने योग्य वेळी गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुटपुंज्या पगारातही तुम्ही स्वतःला करोडपती बनवू शकता. मात्र, यामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न्स कुठे मिळतात हे पहावे लागेल. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर महागाईवर मात करण्याची क्षमता असलेल्या योजनेत गुंतवणूक करा. यासाठी एक फॉर्म्युला पाहू ज्यामध्ये तुम्ही फक्त 2000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करून स्वतःला करोडपती बनवू शकता.
तुटपुंज्या पगारात करोडपती होण्याचे सूत्र 25/2/5/35 या फॉर्म्युल्यामध्ये आहे. यामध्ये तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक धोरण अवलंबावे लागेल आणि म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करावी लागेल. या सूत्रानुसार,
25 म्हणजे वयाच्या 25 व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू करू शकता.
2 म्हणजे किमान रु. 2,000 च्या एसआयपीसह गुंतवणूक सुरू करा.
5 म्हणजे दरवर्षी ही एसआयपीची रक्कम 5 टक्क्यांनी वाढवा.
35 म्हणजे ही एसआयपी अखंडितपणाने 35 वर्षे सुरू ठेवा.
तुम्ही 25 वर्षांत 2,000 रुपयांपासून एसआयपी सुरू करता. आता तुम्हाला दरवर्षी 5 टक्के रक्कम वाढवायाची आहे, याचा अर्थ एसआयपी सुरू केल्यानंतर पहिल्या वर्षासाठी दरमहा 2,000 रुपये गुंतवल्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी तुम्हाला तुमच्या 2,000 रुपयांमध्ये 5 टक्के म्हणजेच फक्त 100 रुपये वाढवावे लागतील. अशाप्रकारे तुम्हाला दुसर्या वर्षासाठी 2,100 रुपयांची एसआयपी चालवावी लागेल. त्यापुढील वर्षी, रु. 2,100 च्या 5 टक्के रक्कम म्हणजेच रु. 105 वाढवा. याचा अर्थ दुसर्या वर्षी तुमचा मासिक एसआयपी होईल 2205 रुपये. अशाप्रकारे दरवर्षी तुम्हाला चालू एसआयपी रकमेच्या 5 टक्के वाढ करायची आहे. ही गुंतवणूक 35 वर्षे सुरू राहणार आहे. 35 वर्षांनंतर तुम्ही 60 वर्षांचे व्हाल तेव्हा या गुंतवणुकीद्वारे एक चांगला सेवानिवृत्ती निधी जमा झालेला असेल.
एसआयपी कॅलक्युलेटरनुसार 35 वर्षे गुंतवणूक करत राहिल्यास, तुम्ही एकूण 216768 रुपयांची गुंतवणूक कराल. एसआयपीवर सरासरी परतावा 12 टक्के मानला जातो. अशा स्थितीत तुम्हाला गुंतवणुकीवर 1,77,71,532 रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे, गुंतवलेली रक्कम आणि व्याजाची रक्कम एकत्र करून तुम्हाला पैसे मिळतील तेव्हा ते रु. 1,99,39,220 (सुमारे 2 कोटी रुपये) होईल. अशा प्रकारे वयाच्या 60 व्या वर्षी तुम्ही 2 कोटी रुपयांचे मालक व्हाल.