

Stock Market Today : रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने (एमपीसीने ) ६ जून रोजीच्या धोरण आढाव्यात रेपो दर ५० बेसिस पॉइंट्सने कमी करून ५.५% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आज (दि. ६ )आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली. या घोषणेचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसला. बँक निफ्टी विशेषतः २८० अंकांनी वधारला. तर सेन्सेक्स २२७ अंकांनी तर निफ्टी ८० अंकांनी वधारला.
आज शेअर बाजाराची सुरुवात लाल रंगाने झाली. बेंचमार्क निर्देशांक किंचित घसरणीसह लाल रंगात घसरले. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स मागील बंदच्या तुलनेत ८ अंकांनी घसरून ८१,४३४ वर उघडला. निफ्टी २ अंकांनी घसरून २४,७४८ वर उघडला. बँक निफ्टी ६१ अंकांनी घसरून ५५,६९९ वर उघडला. चलन बाजारात, रुपया ५ पैशांनी कमकुवत होऊन ८५.८४/$ वर व्यवहार करत होता. यानंतर सेन्सेक्स १३३ अंकांनी घसरगुंडी अनुभवली. निफ्टी १४ अंकांनी खाली व्यवहार करत होता. बँक निफ्टी ६५ अंकांनी कमकुवत होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्स तेजीत होते. इंडसइंड बँक, कोल इंडिया, टाटा स्टील, डॉ. रेड्डी, इटरनल, एनटीपीसी सारखे शेअर्स निफ्टीवर तेजीत होते. एचडीएफसी लाईफ, अपोलो हॉस्पिटल, ट्रेंट, टाटा मोटर्स खाली आले.
आरबीआयने यावर्षी रेपो दरात सलग तिसर्यांदा कपात केली आहे. RBI ने या वर्षी फेब्रुवारीपासून आता 100 बेसिस पॉइंट्सने दर कमी केला आहे. तथापि, गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की, आता पॉलिसीमध्ये जागा खूपच मर्यादित आहे. त्यामुळे भविष्यात व्याजदरात आणखी कपात करण्याची शक्यता कमी आहे.