

मुंबई : भारत आणि पाकिस्तानने शस्त्रसंधी करण्याचा घेतलेला निर्णय, अमेरिका आणि चीनमधील निवळलेले व्यापार युद्ध याचे सकारात्मक पडसाद सोमवारी (12 मे) शेअर बाजारात उमटले. सेन्सेक्सने 2,975 आणि निफ्टी निर्देशांकाने 916 अंकांनी उसळी घेतली. एका दिवसात निर्देशांकांनी इतकी झेप घेण्याची गत चार वर्षांतील ही पहिलीच वेळ ठरली आहे. दरम्यान, निर्देशांक उसळल्यामुळे गुंतवणूकदारांनी 16 लाख कोटी रुपयांची बंपर कमाई केली आहे.
पहलगामच्या हल्ल्यानंतर भारताने सिंदूर मोहीम हाती घेत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले सुरू केले. पाकिस्ताननेही त्याला प्रत्युत्तर देत सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले आणि गोळीबार सुरू केला. परिणामी, गेल्या सप्ताहातील शेवटच्या दोन सत्रांत मिळून सेन्सेक्स 1,292 आणि निफ्टी 406 अंकांनी खाली आला. भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी, चीन-अमेरिकेने परस्परांवर लादलेली शुल्क कपात मागे घेतली. व्यापार युद्ध निवळण्याचे संकेत मिळाल्याने गुंतवणूकदारांची मानसिकता बदलली.
मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सेन्सेक्सने तब्बल 3.74 टक्क्यांची उसळी घेत 82,430 अंकांवर झेप घेतली. सेन्सेक्सचा यापूर्वीचा उच्चांक 85,978 आहे. सेन्सेक्सने जवळपास तीन हजार अंकांची उसळी घेतल्याने बीएसईतील गुंतवणूकदारांनी 16 लाख 6 हजार कोटी रुपयांची कमाई केली. तर, कंपन्यांचे भांडवली मूल्य 416 लाख 40 हजार 850 कोटींवरून 432 लाख 47 हजार 426 कोटी रुपयांवर गेले आहे.
राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) निफ्टी निर्देशांकाने 3.82 टक्क्यांनी उसळी घेत 916 अंकांवर झेप घेतली. निफ्टी आयटीने 6.7 टक्क्यांची आणि रिअल्टी निर्देशांकाने 5.9 टक्क्यांनी उसळी घेतली. निफ्टी मेटल, एनर्जी, बँक, कन्झ्युमर ड्युरेबल्स, ऑईल अँड गॅस आणि एफएमसीजी निर्देशांकाने 5.8 टक्क्यांपर्यंत उसळी घेतली. बीएसई-30 निर्देशांकातील 28 कंपन्यांच्या शेअर भावात वाढ झाली. एचसीएल टेक 5.9, टाटा स्टील 5.6, इटर्नल 5.5 आणि टीसीएसच्या शेअर भावात 5.4 टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
व्यापार युद्धाच्या भीतीमुळे सराफी बाजारातील सोन्याचा भाव वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) धरून एक लाख रुपयांच्या पार गेला होता. सोमवारी सराफी बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव 1,800 रुपयांनी घटून 96,880 रुपयांवर आला. तसेच, 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,650 रुपयांनी घटून 88,800 रुपयांवर आला. चांदीचा प्रतिकिलो भाव अकराशे रुपयांनी कमी होऊन 97,900 रुपयांवर आला.