Stock Market Today: शेअर बाजारात भूकंपानंतर मोठी रिकव्हरी! निफ्टीने पुन्हा गाठला 23,900चा टप्पा; कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

Stock Market Today: परदेशी गुंतवणूकदारांची मोठी खरेदी, कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण आणि कंपन्यांचे दमदार निकाल यामुळे बाजाराला आधार मिळाला.
Stock Market Today
Stock Market TodayPudhari
Published on: 
Updated on: 

Stock Market Today: आज शेअर बाजारात जोरदार रिकव्हरी पाहायला मिळाली. सलग चार सत्रांपासून सुरू असलेल्या तेजीला मंगळवारी ब्रेक लागला होता. त्यामुळे बुधवारी बाजाराची सुरुवातही घसरणीसह झाली. मात्र, खालच्या स्तरावर गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याने बाजाराने पुन्हा उसळी घेतली. सकाळी 9.35 वाजण्याच्या सुमारास निफ्टी 100 अंकांहून अधिक वधारून 23,900 च्या पार पोहोचला. सेन्सेक्समध्येही तेजी दिसून आली.

बुधवारी बाजार उघडताच निफ्टी 68 अंकांनी घसरून 23,742 वर, तर सेन्सेक्स 65 अंकांनी घसरून 76,853 वर उघडला. विशेष म्हणजे, मंगळवारी निफ्टी 370 अंकांच्या वाढीसह 23,810 वर बंद झाला होता.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही तेजी

बाजारातील रिकव्हरीचा परिणाम व्यापक बाजारावरही दिसून आला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात व्यवहार करत होते. क्षेत्रीय निर्देशांकांचा विचार करता आयटी आणि मीडिया क्षेत्र वगळता बहुतांश क्षेत्रांमध्ये तेजी होती. एफएमसीजी क्षेत्रात सर्वाधिक 1.5 टक्क्यांची वाढ झाली. याशिवाय कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्येही चांगली खरेदी दिसून आली.

बाजाराला आधार देणारे दोन महत्त्वाचे घटक

कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांची वाढलेली खरेदी हे बाजारासाठी महत्त्वाचे सकारात्मक संकेत आहेत. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 104 डॉलरवर व्यवहार करत आहेत. दुसरीकडे, मंगळवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) भारतीय शेअर बाजारात 9,836 कोटी रुपयांची खरेदी केली. 2 नोव्हेंबर रोजीही त्यांनी 3,114 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) मंगळवारी 3,678 कोटी रुपयांची विक्री केली.

Stock Market Today
Gold Silver Price Today: सोन्याचे भाव पुन्हा वाढू लागले, चांदी मात्र स्वस्त झाली! दिवाळीच्या खरेदीआधी ताजे दर पाहा

जागतिक बाजारात मात्र घसरण

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारांमध्ये घसरण दिसत आहे. जपानचा निक्केई निर्देशांक 3.15 टक्क्यांनी, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक 1.9 टक्क्यांनी घसरला. अमेरिकेच्या डाऊ जोन्स फ्युचर्समध्येही 0.4 टक्क्यांची घसरण झाली.

अमेरिकेतील काही राज्यांमध्ये मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये डेमोक्रॅटिक पक्ष आघाडीवर असल्याचे चित्र होते. जॉर्जिया आणि फ्लोरिडामध्ये ट्रम्प यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. ट्रम्प यांच्या धोरणांबाबत अमेरिकन जनतेमध्ये नाराजी असल्याचे या निकालांमधून दिसत आहे.

ट्रम्प यांची राजकीय ताकद कमी झाल्यास भारतासाठी ते सकारात्मक ठरू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या किमती आणि आंतरराष्ट्रीय तणावावरही या घडामोडींचा परिणाम होऊ शकतो.

Stock Market Today
Diwali Bonus Scam: सरकार ८ हजार रुपये देणार! WhatsApp वर दिवाळी बोनसचा मेसेज आला आहे? क्लिक करण्याआधी हे नक्की वाचा

FIIs पुन्हा भारतीय बाजारात सक्रिय?

परदेशी गुंतवणूकदारांच्या खरेदीत वाढ झाल्याने बाजारात आशावाद निर्माण झाला आहे. इंडेक्स फ्युचर्समधील त्यांची लॉन्ग पोझिशन 10.55 टक्क्यांवरून 12.32 टक्क्यांवर पोहोचली आहे. कॅश मार्केटमध्ये सलग तिसऱ्या दिवशी 6,836 कोटी रुपयांची मोठी खरेदी झाल्याचे आकडेवारीतून दिसते. कॅश, इंडेक्स आणि स्टॉक फ्युचर्समधील एकत्रित खरेदी 14,549 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

जियोजित इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण, अमेरिकेतील बॉन्ड यील्डमधील घसरण, FIIs च्या विक्रीचा कमी झालेला दबाव आणि दुसऱ्या तिमाहीचे चांगले निकाल यामुळे बाजाराचा आत्मविश्वास वाढला आहे.

निफ्टीसाठी कोणते स्तर महत्त्वाचे?

SAMCO Securities चे तांत्रिक संशोधन विश्लेषक नील पारेख यांच्या मते, निफ्टी सध्या तेजीच्या दिशेने वाटचाल करत आहे. निफ्टीसाठी 23,600 हा महत्त्वाचा आधार असून त्यानंतर 23,500 हा पुढील आधार असेल. दुसरीकडे, 24,000 हा महत्त्वाचा अडथळा आहे. हा स्तर पार केल्यास निफ्टी 24,200 पर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे आगामी सत्रांमध्ये कच्च्या तेलाचे दर, परदेशी गुंतवणूकदारांची खरेदी आणि जागतिक बाजारातील घडामोडींवर गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.