

Stock Market Opening Updates
भारतीय शेअर बाजाराची गुरुवारी (दि.२२) कमकुवत सुरुवात झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ७०० अंकांनी घसरून ८०,९०० च्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक २०० अंकांच्या घसरणीसह २४,६०० च्या खाली व्यवहार करत आहे.
जागतिक कमकुवत संकेतादरम्यान बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. मुख्यतः बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक विक्रीचा दबाव दिसून आला आहे. सेक्टर्समधील निफ्टी बँक, ऑटो, एफएमसीजी, आयटी, फार्मा, कन्झ्यूमर ड्युराबेल्स घसरले आहेत.
सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, पॉवर ग्रिड, एचसीएल टेक, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, आयटीसी, एम अँड एम, टीसीएस, इन्फोसिस, ॲक्सिस बँक, टायटन हे शेअर्स १ ते २ टक्के घसरले आहेत. तर दुसरीकडे अदानी पोर्ट्सचा शेअर्स १ टक्के वाढून खुला झाला आहे.
अमेरिकेतील बाँड उत्पन्नात वाढ झाल्याने जागतिक बाजारातील मूड खराब झाला आहे. अमेरिकेच्या शेअर बाजारातील निर्देशांक २ टक्क्यांनी घसरून बंद झाले. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज ८०० हून अधिक अंकांनी घसरला. आशियाई बाजारातही दबाव दिसून आला.
अमेरिकेतील कर्ज संकटामुळे आयटी शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून येत आहे. निफ्टी आयटी १.४ टक्के घसरला आहे. एचसीएल टेक, टेक महिंद्रा हे शेअर्स प्रत्येकी २ टक्के घसरले आहेत. Mphasis, Persistent आणि टीसीएस हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के घसरले आहेत.