

Stock Market Opening Updates
भारतीय शेअर बाजार शुक्रवारी (दि. ४ जुलै) सपाट पातळीवर खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ४० अंकांनी वाढून ८३,२६० वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक २५,४०० वर व्यवहार होता. त्यानंतर दोन्ही निर्देशांक लाल रंगात गेले.
सेन्सेक्सवर बजाज फायनान्सचा शेअर्स ३ टक्के आणि बजाज फिनसर्व्हचा शेअर्स २ टक्के वाढीसह खुला झाला आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स, इर्टनल, हिंदुस्तान युनिलिव्हर, अदानी पोर्ट्स, रिलायन्स हे शेअर्सही तेजीत आहेत. तर दुसरीकडे ट्रेंटचा शेअर्स ७ टक्के घसरला आहे. टेक महिंद्रा, टाटा स्टील, मारुती, टायटन, पॉवर ग्रिड आदी शेअर्समध्येही घसरण दिसून आली आहे.
१३ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांपैकी बारा निर्देशांक किरकोळ वाढीसह खुले झाले आहेत. निफ्टी एफएमसीजी निर्देशांक ०.३ टक्के वाढला आहे. तर बीएसई स्मॉलकॅप ०.४ टक्के आणि मिडकॅप ०.३ टक्के वाढला आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परस्पर टॅरिफ लागू करण्याबाबत ९ जुलैची डेडलाईन दिली दिली आहे. त्याआधी गुंतवणूकदारांचे भारत आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या संभाव्य द्विपक्षीय व्यापार कराराकडे लक्ष लागले आहे. याचा परिणाम बाजारात दिसून आला आहे.
एनएसईच्या आकडेवारीनुसार, विदेशी गुंतवणूकदारांनी ३ जुलै रोजी १,४८१ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १,३३३ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.