

Stock Market Updates
भारतीय शेअर बाजार बुधवारी (दि. ९ जुलै) लाल रंगात खुला झाला. सुरुवातीला सेन्सेक्स ५० अंकांनी घसरून ८३,६५० वर तर निफ्टी ५० निर्देशांक १५ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २५,५०० वर व्यवहार करत होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या औषध उत्पादनांवर जादा आयात शुल्क (tariffs) लागू करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सावध झाले आहे. परिणामी, भारतीय बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स- निफ्टीत घसरण झाली.
सेन्सेक्सवर टाटा स्टील, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एलटी हे शेअर्स घसरले आहेत. तर एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, एम अँड एम, ट्रेंट, मारुती, रिलायन्स, बजाज फायनान्स हे शेअर्स तेजीत खुले झाले आहेत.
ट्रम्प यांनी मंगळवारी औषधांच्या आयातीवर २०० टक्के, कॉपरवर ५० टक्के आणि सेमीकंडक्टरवर नवीन शुल्क लागू करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे व्यापार तणाव वाढून जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. याचे पडसाद बाजारात उमटले आहेत. यामुळे निफ्टी मेटल निर्देशांक ०.८ टक्के घसरला आहे. निफ्टी आयटी, रियल्टी आणि ऑईल अँड गॅस निर्देशांकही घसरले आहेत.
दरम्यान, भारताचा अमेरिकेसोबत होणाऱ्या ट्रेड डीलपूर्वी बाजारात अस्थिरता दिसून येत आहे. सलग आठव्या दिवशी बाजारात सुस्त स्थिती राहिली आहे. मुख्यतः मेटल आणि आयटी शेअर्सवर दबाव आहे. तर निफ्टी FMCG चांगली कामगिरी करत आहे.