

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजारात (Stock Market Updates) आज गुरुवारी (दि.१९) सलग चौथ्या दिवशी घसरण झाली. सुरुवातीच्या व्यवहारात बाजारात प्रचंड दबाव दिसून येत आहे. सुरुवातीलाच सेन्सेक्स (Sensex) तब्बल १ हजार अंकांनी घसरून ७९,३०० च्या खाली आला. तर निफ्टी (Nifty50) ३०० अंकांच्या घसरणीसह २३,९०० च्या खाली आला. त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास ही घसरण कमी झाली होती.
बाजारातील या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल सुमारे ६ लाख कोटींनी कमी होऊन ४४६.६६ लाख कोटींपर्यंत खाली आले.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने (US Federal Reserve) बुधवारी व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात केली. या २५ बेसिस पॉइंट्सच्या कपातीमुळे फेडरल रिझर्व्ह या मध्यवर्ती बँकेचा बेंचमार्क पॉलिसी रेट ४.२५ टक्के ते ४.५० टक्के श्रेणीत आला आहे. दरम्यान, फेड रिझर्व्हच्या व्याजदरात कपातीच्या निर्णयानंतर अमेरिकेतील शेअर बाजारात मोठी घसरण झाली. कारण फेड रिझर्व्हने २०२५ मध्ये व्याजदरात कमी प्रमाणात कपात होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. याचे पडसाद अमेरिकेसह भारतीय शेअर बाजारात उमटले आणि सेन्सेक्स- निफ्टी धडाम झाले.
सेन्सेक्सवरील ३० पैकी ३० शेअर्स लाल रंगात रंगले आहेत. एशियन पेंट्स, एम अँड एम, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, कोटक बँक, इन्फोसिस, एचडीएफसी बँक हे शेअर्स सर्वाधिक घसरले आहेत. निफ्टीवर विप्रोचा शेअर्स सुमारे २ टक्के घसरला आहे.
क्षेत्रीय पातळीवरील निफ्टी आयटी, निफ्टी ऑटो आणि बँक निर्देशांकाला विक्रीचा सर्वाधिक फटका बसला. निफ्टी आयटी १.१ टक्के घसरला. निफ्टी आयटीवरील LTIMindtree चा शेअर्स ४ टक्के घसरणीसह टॉप लूजर ठरला. Mphasis, एल अँड टी टेक्नॉलॉजीचे शेअर्स प्रत्येकी २ टक्के घसरले.