

Stock Market Closing
जागतिक नकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात मंगळवारी (दि.२७) अस्थिरता दिसून आली. बीएसई सेन्सेक्स ६२४ अंकांनी घसरून ८१,५५१ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १७४ अंकांच्या घसरणीसह २४,८२६ वर स्थिरावला.
गेल्या दोन सत्रात बाजारात तेजी राहिली होती. पण आज या तेजीला ब्रेक लागला. मुख्यतः आजच्या सत्रात ऑटो, आयटी आणि एफएमसीजी शेअर्समध्ये मोठी विक्री दिसून आली.
क्षेत्रीय निर्देशांकातील निफ्टी FMCG ची सर्वात खराब कामगिरी राहिली. हा निर्देशांक ०.८ टक्के घसरून बंद झाला. त्यासोबतच निफ्टी ऑटो आणि निफ्टी आयटी घसरले. हे दोन्ही निर्देशांक प्रत्येकी ०.७ टक्के घसरले. निफ्टी ऑईल आणि गॅस, निफ्टी मेटल, निफ्टी प्रायव्हेट बँकही घसरणीसह बंद झाले. तर दुसरीकडे निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी रियल्टी प्रत्येकी ०.२ टक्के वाढले.
बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप सपाट पातळीवर हिरव्या रंगात बंद झाले.
आजच्या घसरणीमुळे बीएसईवर सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४४३.६६ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. जे २६ मे रोजी ४४४.७९ लाख कोटी रुपयांवर होते. आजची बाजार भांडवलातील घट सुमारे १.१३ लाख कोटी रुपयांची आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १.१३ लाख कोटींची घट झाली.
सेन्सेक्सवर अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, टाटा मोटर्स, ॲक्सिस बँक, एनटीपीसी, एम अँड एम, एचसीएल टेक, इटर्नल, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, टीसीएस हे शेअर्स १ ते २ टक्के घसरले. तर दुसरीकडे इंडसइंड बँक, सन फार्मा, अदानी पोर्ट्स, नेस्ले इंडिया हे शेअर्स वाढून बंद झाले.
इंडिगो एअरलाईन्सची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडचा (InterGlobe Aviation Ltd (IndiGo) शेअर्स आजच्या सत्रात ३ टक्क्यांपर्यंत घसरला. त्यानंतर हा शेअर्स १.९ टक्के घसरणीसह बंद झाला. या कंपनीचे सह-संस्थापक राकेश गंगवाल एका मोठ्या ब्लॉक डीलमध्ये त्यांचा सुमारे ५.८ टक्के हिस्सा विकणार असल्याच्या वृत्तानुसार त्यांचे शेअर्स घसरले.
बाजारात गेल्या दोन सत्रात तेजी राहिली. यामुळे आज प्रॉफिट बुकिंग दिसून आले. परिणामी, सेन्सेक्स- निफ्टी घसरले.
अमेरिकेच्या १० वर्षांच्या ट्रेझरी यिल्डमध्ये वाढ झाल्याने जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारांना अमेरिकन बाँड आकर्षित करत आहेत. यामुळे भारतासारख्या उदयोन्मुख बाजारातून भांडवल बाहेर पडू शकते. याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात दिसून आल्याचे विश्लेषक सांगतात.