

Stock Market Closing updates
कमकुवत जागतिक संकेत, विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा आणि अमेरिकेच्या टॅरिफ घोषणांमुळे भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) घसरण झाली. सेन्सेक्स ५८५ अंकांनी घसरून ८०,५९९ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक २०३ अंकांनी घसरून २४,५६५ पर्यंत खाली आला. आजच्या सत्रात सर्वाधिक दबाव फार्मा शेअर्सवर दिसून आला.
सेन्सेक्सवर सन फार्माचा शेअर्स ४.४ टक्के, टाटा स्टील ३ टक्के घसरला. मारुती, टाटा मोटर्स, इन्फोसिस, अदानी पोर्ट्स, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एम अँड एम, एलटी, टीसीएस, इटरनल, एनटीपीसी हे शेअर्स १ ते २.६ टक्क्यांपर्यंत घसरले. तर दुसरीकडे ट्रेंटचा शेअर्स ३.२ टक्के वाढला. एशियन पेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी, कोटक बँक हे शेअर्सही तेजीत राहिले.
निफ्टी फार्मा निर्देशांक सलग तिसऱ्या दिवशी घसरला. हा निर्देशांक ३ टक्के घसरला. सन फार्माचा शेअर्स ४.४ टक्के घसरून टॉप लूजर ठरला. अरबिंदो फार्मा, ग्लँड फार्मा, सिप्ला, ग्रॅन्युल्स इंडिया आणि ल्युपिन या शेअर्सवरही दबाव राहिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील १७ प्रमुख औषध कंपन्यांना पत्र लिहून अमेरिकेत औषधांच्या किमती कमी करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर फार्मा कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत.
अमेरिकेने भारतीय आयातीवर २५ टक्के टॅरिफ लागू केले आहे. याचा दबाव आज बाजारात दिसून आला.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) गुरुवारी ५,५८८ कोटी रुपये किमतीच्या भारतीय शेअर्सची विक्री केली. परदेशी गुंतवणूकदार विक्रीवर जोर देत असल्याच्या पार्श्वभूमीवर बाजारातील भावना कमकुवत दिसून आल्या.
आशियाई बाजारातील निर्देशांकही लाल रंगात न्हाऊन निघाले. दक्षिण कोरिया, जपान, चीन आणि हाँगकाँगमधील निर्देशांक खाली आले. अमेरिकेतील बाजारात कमकुवत स्थिती दिसून आल्यानंतर आशियाई बाजारात नकारात्मक कल राहिला.