

Stock Market Closing Updates
भारतीय शेअर बाजारात मंगळवारी (दि. ८ जुलै) खालच्या पातळीवरुन रिकव्हरी दिसून आली. सेन्सेक्स २७० अंकांनी वाढून ८३,७१२ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ६१ अंकांच्या वाढीसह २५,५२२ वर स्थिरावला. भारत- अमेरिका यांच्यात होणाऱ्या व्यापार करारापूर्वी बाजाराने सपाट पातळीवर सुरुवात केली होती. पण आजच्या ट्रेडिंग सत्रातील अखेरच्या तासात बाजाराने यू- टर्न घेतला. यामुळे सेन्सेक्स- निफ्टी वधारुन बंद झाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १४ देशांवर २५ ते ४० टक्के टॅरिफ लागू करण्याच्या निर्णयामुळे जागतिक स्तरावर अनिश्चितता निर्माण झाली आहे. पण भारतीय शेअर बाजार सपाट सुरुवातीनंतर तेजीत बंद झाला.
खासगी बँकांच्या शेअर्समधील तेजीमुळे निफ्टी बँक ०.५ टक्के वाढला. आयटी, रियल्टी, मीडिया सेक्टरमध्ये खरेदी दिसून आली. तर दुसरीकडे निफ्टी फार्मा, PSU बँक, एफएमसीजी निर्देशांक घसरले. बाजारातील भयसूचकांक इंडिया VIX ३ टक्के घसरला. जो गुंतवणूकदारांची कमी होत असल्याचे दर्शवतो.
सेन्सेक्सवर कोटक बँकेचा शेअर्स ३.६ टक्के वाढून बंद झाला. इर्टनल, एशियन पेंट्स, एनटीपीसी, भारत इलेक्ट्रॉनिक्स, अदानी पोर्ट्स हे शेअर्स सुमारे १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. एसबीआय, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, एलटी, टेक महिंद्रा, टाटा मोटर्स हे शेअर्सही हिरव्या रंगात बंद झाले. तर दुसरीकडे टायटनचा शेअर्स ६.१ टक्के घसरला. ट्रेंट, ॲक्सिस बँक, मारुती, हिंदुस्तान युनिलिव्हर, सन फार्मा आदी शेअर्समध्येही घसरण दिसून आली.
भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार कराराच्या आशेने गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. भारतासोबत करार करण्याची वेळ जवळ आली आहे, असे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत.