

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय बेंचमार्क इक्विटी निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी ५० मध्ये गुरुवारी (दि.१२) घसरण झाली. सेन्सेक्स २३६ अंकांनी घसरून ८१,२८९ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ९३ अंकांच्या घसरणीसह २४,५४८ वर स्थिरावला. आजच्या सत्रात IT वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले.
पुढील आठवड्यात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात होणार असल्याच्या अपेक्षेने आज आयटी शेअर्समध्ये तेजी राहिली. पण देशांतर्गत महागाई आकडेवारीच्याआधी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने इतर बहुतांक्ष क्षेत्रांमध्ये घसरण झाली. आज आयटी वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले. मीडिया निर्देशांक २ टक्के आणि FMCG निर्देशांक १ टक्के घसरला. बीएसई मिडकॅप ०.५ टक्के आणि स्मॉलकॅप १ टक्के घसरला.
सेन्सेक्सवर एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा मोटर्स, मारुती, एलटी, एशियन पेंट्स, रिलायन्स हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले. तर टेक महिंद्रा, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, इन्फोसिस, अदानी पोर्ट्स हे शेअर्स सुमारे १ टक्के घसरले.
निफ्टीवर एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, कोल इंडिया, हिरो मोटोकॉर्प हे शेअर्स प्रत्येकी २ टक्के घसरले. तर दुसरीकडे अदानी एंटरप्रायजेस, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले.
निफ्टी आयटी निर्देशांकाने आजच्या सत्रात ४६ हजारांच्या नव्या उच्चांकाला स्पर्श केला. आयटी निर्देशांकावर कॉफोर्ज, Persistent Systems आणि टेक महिंद्रा हे शेअर्स आघाडीवर आहेत. त्यानंतर आयटी निर्देशांक ०.७ टक्के वाढीसह ४५,७०१ वर स्थिरावला.