

Stock Market Closing Updates
कमकुवत जागतिक संकेत, आयटी शेअर्समधील विक्रीमुळे भारतीय शेअर बाजारात सोमवारी (दि. १९ मे) दबाव राहिला. सेन्सेक्स- निफ्टी घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स २७१ अंकांनी घसरून ८२,०५९ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ७४ अंकांच्या घसरणीसह २४,९४५ वर स्थिरावला.
निफ्टी रियल्टी, पीएसयू बँक, फार्मा आणि ऑटो शेअर्समध्ये खरेदी राहिली. तर आयटी शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. निफ्टी आयटी १.३ टक्के घसरून बंद झाला. आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग संस्था मूडीजने अमेरिकन सरकारचे क्रेडिट रेटिंग डाऊनग्रेड केले आहे. या पार्श्वभूमीवर आयटी कंपन्यांचे शेअर्स घसरल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आज रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी राहिली. निफ्टी रियल्टी २.२ टक्के वाढला. तर निफ्टी ऑटो निर्देशांक सलग चौथ्या दिवशी वाढून बंद झाला. फार्मा निर्देशांकही वधारला.
बीएसई सेन्सेक्सवर इर्टनलचा शेअर्स ३ टक्के घसरला. इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा, रिलायन्स, एशियन पेंट्स हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरले. एचसीएल टेक, अदानी पोर्ट्स, टायटन, ॲक्सिस बँक हे शेअर्समध्ये काही प्रमाणात विक्रीचा दबाव राहिला. तर दुसरीकडे पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, एनटीपीसी, एसबीआय, एचडीएफसी बँक हे शेअर्स तेजीत राहिले.
गेल्या आठवड्यात दमदार तेजीत राहिलेले संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स आज घसरले. या शेअर्समध्ये आज प्रॉफिट बुकिंग दिसून आले. विशेषतः कोचीन शिपयार्ड, माझगाव डॉक शिपबिल्डर्स आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) चे शेअर्स सर्वाधिक घसरले.
बाजारातील अस्थिरता आणि गुंतवणूकदारांमधील भिती दर्शवणारा इंडिया VIX दिवसभरात ११ टक्क्यांनी वाढला.
सोमवारी आशियाई आणि युरोपीय शेअर बाजारात कमकुवत स्थिती दिसून आली. आशियाई बाजारातील जपानचा निक्केई २२५ निर्देशांक, दक्षिण कोरियाचा कोस्पी, चीनचा शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँग सेंग आदी प्रमुख निर्देशांकांनी लाल रंगात व्यवहार केला.