

Stock Market Closing Updates
भारतीय शेअर बाजाराने याआधीच्या सत्रातील पडझडीतून सावरत बुधवारी (दि.२१) तेजीत व्यवहार केला. सेन्सेक्स ४१० अंकांनी वाढून ८१,५९६ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १२९ अंकांनी वाढून २४,८१३ वर स्थिरावला. आजच्या सत्रात रियल्टी, फायनान्सियल सर्व्हिसेस आणि फार्मा शेअर्समधील तेजीमुळे बाजाराला उभारी मिळाली.
सेक्टर्समध्ये निफ्टी रियल्टीची (Nifty Realty) १.७ टक्के वाढून सर्वात चांगली कामगिरी राहिली. निफ्टी फार्मा १.२ टक्के, निफ्टी पीएसयू बँक ०.७ टक्के वाढला. निफ्टी आयटी आणि निफ्टी मेटलही वाढून बंद झाले. तर बीएसई मिडकॅप ०.९ टक्के आणि स्मॉलकॅप ०.५ टक्के वाढला.
सेन्सेक्सवर २,२१४ शेअर्स वधारले. तर १६१५ शेअर्समध्ये घसरण झाली आणि १२६ शेअर्समध्ये कोणताही चढ-उतार दिसून आला नाही.
सेन्सेक्सवर बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, सन फार्मा, टेक महिंद्रा, बदाद फायनान्स, नेस्ले इंडिया, टाटा मोटर्स, एनटीपीसी हे शेअर्स १ ते २ टक्के वाढले. तर इंडसइंड बँक, कोटक बँक, पॉवर ग्रिड, आयटीसी हे शेअर्स घसरले.
निफ्टी ५० वर भारत इलेक्ट्रॉनिक्स, टाटा स्टील आणि सिप्ला, एचडीएफसी लाईफ हे टॉप गेनर्स शेअर्स ठरले. तर दुसरीकडे इंडेक्सइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील आणि कोटक महिंद्रा बँक आणि ग्रासीम हे शेअर्स घसरले. निफ्टी ५० वर ३७ शेअर्समध्ये वाढ दिसून आली. तर १३ शेअर्स घसरले.
आजच्या तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात ३ लाख कोटींची वाढ झाली. २१ मे रोजी बाजार भांडवल ४४१.०६ लाख कोटींवर पोहोचले. याआधी ते २० मे रोजी ४३८.०३ लाख कोटी होते. याचाच अर्थ आज गुंतवणूकदारांच्या कमाईत ३ लाख कोटींची वाढ झाली.
दरम्यान, आज बाजारात परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या विक्रीचा दबाव दिसून आला नाही. मंगळवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) सलग दुसऱ्या सत्रात विक्रीवर जोर दिला. एनएसईवरील आकडेवारीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी मंगळवारी एका दिवसात १०,०१६ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. ही गेल्या दोन महिन्यांतील एका दिवसातील सर्वात मोठी विक्री राहिली. तर दुसरीकडे देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (DII) खरेदीमुळे बाजाराला मोठा सपोर्ट मिळाला. त्यांनी एका दिवसात ६,७३८ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.