

संदीप पाटील
भांडवली बाजारात सध्या संपत्ती निर्मितीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी निवृत्तीनंतरचे जीवन स्वाभिमानाने जगण्यासाठी ‘एसआयपी’ (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) आणि ‘एसडब्ल्यूपी’ (सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन) यांचे समीकरण सर्वाधिक प्रभावी ठरत आहे.
वाढती महागाई आणि वाढलेले आयुर्मान लक्षात घेता, केवळ बचतीवर अवलंबून राहणे आता धोक्याचे ठरू शकते. अशा वेळी दरमहा 15,000 रुपयांची छोटी गुंतवणूक तुम्हाला भविष्यात दरमहा 1.5 लाख रुपयांची ‘फिक्स पेन्शन’ कशी मिळवून देऊ शकते, याचा हा ताळेबंद.
या जादुई नियोजनाचा पाया हा दोन महत्त्वाच्या टप्प्यांवर आधारित आहे. पहिल्या टप्प्यात आपण थेंबे थेंबे तळे साचवतो आणि दुसर्या टप्प्यात त्या साचलेल्या तळ्याचा वापर आपल्या गरजांसाठी करतो. समजा एखाद्या 30 वर्षीय तरुणाने आजपासून दरमहा 15,000 रुपयांची ‘एसआयपी’ सुरू केली, तर पुढील 30 वर्षांसाठी ही गुंतवणूक सुरू राहिल्यास आणि त्यावर वार्षिक 12 टक्के सरासरी परतावा मिळाल्यास, वयाच्या 60 व्या वर्षी त्याच्याकडे 5.29 कोटी रुपयांचा अवाढव्य निधी जमा होतो. ही संपत्ती निर्मितीची पहिली पायरी आहे, जी केवळ शिस्त आणि संयमावर अवलंबून असते.
वयाच्या 60 व्या वर्षी जेव्हा हा 5.29 कोटी रुपयांचा निधी तयार होतो, तेव्हा खर्या अर्थाने ‘एसडब्ल्यूपी’ या दुसर्या टप्प्याचा खेळ सुरू होतो. या टप्प्यावर तुम्ही तुमचा जमा झालेला निधी सुरक्षित अशा ‘हायब्रीड’ किंवा ‘लार्ज कॅप’ फंडात वर्ग करता. तिथून तुम्ही दरमहा 1.5 लाख रुपये काढण्याचे नियोजन करता. या प्रक्रियेत तुमची मूळ रक्कम फंडात गुंतवलेलीच असते, ज्यावर वार्षिक अंदाजे 8 टक्के परतावा मिळत राहतो. विशेष म्हणजे, दरमहा 1.5 लाख रुपये (म्हणजेच वर्षाला 18 लाख रुपये) काढूनही तुमच्या मूळ निधीवर परतावा मिळत असल्याने, वयाच्या 80 व्या वर्षांपर्यंत हा निधी कमी होण्याऐवजी वाढून 9 कोटी रुपयांच्या आसपास पोहोचू शकतो.
बँक मुदत ठेवी (एफडी) किंवा इतर पारंपरिक योजनांच्या तुलनेत हा पर्याय अधिक फायदेशीर ठरण्याचे कारण म्हणजे यातील कर सवलत. बँकांमधील व्याजावर तुम्हाला स्लॅबनुसार कर भरावा लागतो, मात्र ‘एसडब्ल्यूपी’ मध्ये केवळ भांडवली नफ्यावर कर आकारला जातो, जो तुलनेने खूपच कमी असतो. याशिवाय महागाईचा दर वाढत गेला, तरी इक्विटी आधारित गुंतवणुकीतील परतावा त्याला मागे टाकण्याची क्षमता राखतो. या नियोजनामुळे तुम्हाला कोणत्याही मालकाच्या किंवा ऑफिसच्या कटकटीशिवाय हक्काचे आर्थिक स्वातंत्र्य मिळते. ‘एसआयपी’ हा पैसा उभा करण्याचा मार्ग आहे, तर ‘एसडब्ल्यूपी’ हा त्याच पैशातून नियमित उत्पन्न मिळवण्याचा मार्ग आहे. हे नियोजन यशस्वी करण्यासाठी गुंतवणूक शक्य तितक्या लवकर सुरू करणे आणि बाजारातील चढ-उतारांच्या काळातही ती सुरू ठेवणे आवश्यक आहे.