

Share Market Opening Bell : केरळमध्ये मान्सूनचे झालेले आगमन आणि भारताच्या अर्थव्यवस्थेने जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनून केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचे सकारात्मक पडसाद आज (दि. २६ मे) देशांतर्गत शेअर बाजारात उमटले. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्समध्ये हिरवळ दिसून आली. निफ्टीनेही वाढीसह २५००० अंकांचा टप्पा ओलांडला. सुरुवातीच्या व्यवहारात, सेन्सेक्स ५६२.३१ अंकांनी वाढून ८२,२८३.३९ वर पोहोचला, तर निफ्टी १७५.७ अंकांनी वाढून २५,०२८.८५ वर पोहोचला. तसेच सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ४४ पैशांनी वाढून ८५.०१ वर पोहोचला आहे.
मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी दिसली. ऋआज सुरुवातीच्या व्यवहारात क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे झाले तर, निफ्टी रिअॅल्टी निर्देशांक वगळता अन्य निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसले. धातू आणि औषध क्षेत्रात सर्वाधिक वाढ दिसून येत आहे. आज सुरुवातीच्या व्यवहारात क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे झाले तर, रिअल्टी, धातू आणि ऑटोमध्ये सर्वाधिक खरेदी दिसून येत आहे. तिन्ही क्षेत्र निर्देशांकांमध्ये एक टक्क्यांहून अधिक वाढ झाली. रिअल इस्टेटमध्ये हडको ४% वाढीसह फ्युचर्समध्ये सर्वाधिक वाढणारा होता. तसेच लोढा. डीएलएफ, एनबीसीसी आणि ओबेरॉयमध्येही खरेदी दिसून येत आहे. एकुणच आज बाजारात व्यवहाराची सुरुवात सकारात्मक झाल्याचे चित्र दिसले.
जपानला मागे टाकून भारताच्या अर्थव्यवस्थेने जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताचा जीडीपी आता ४.१८ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे. ही आकडेवारी देशातील आर्थिक विकास दर्शवते. त्याचबरोबर आरबीआयने २०२४-२५ या आर्थिक वर्षात सरकारला २.६९ लाख कोटी रुपयांचा लाभांश देण्याची घोषणा केली आहे. ही रक्कम सरकारची वित्तीय तूट कमी करण्यास आणि देशाचे वित्तीय आरोग्य मजबूत करण्यास मदत करेल.
१६ वर्षांत पहिल्यांदाच मान्सून आठ दिवस आधी केरळमध्ये दाखल झाला आहे. यंदा देशभरात सर्वत्र पाउस समाधानकारक असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कृषी उत्पादनात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ग्रामीण उत्पन्न वाढीचा अंदाज आहे. याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर पाहण्यास मिळत आहे.