Share Market Crash : बाजारात हाहाकार! सेन्सेक्स २४९६ अंकांनी कोसळला, निफ्टी २३१०० च्या खाली; 'ही' पाच प्रमुख कारणे आली समोर

BSE-Nifty : जागतिक तेल बाजारात ब्रेंट क्रूडचा दर ६.७५ टक्क्यांनी वधारून ११४.८ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला.
Share Market Crash : बाजारात हाहाकार! सेन्सेक्स २४९६ अंकांनी कोसळला, निफ्टी २३१०० च्या खाली; 'ही' पाच प्रमुख कारणे आली समोर
Published on
Updated on

मुंबई : भारतीय शेअर बाजार गुरुवारी भीषण घसरणीचा साक्षीदार ठरला. जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या विक्रीच्या सपाट्यात दोन्ही प्रमुख सूचकांक मोठ्या प्रमाणात कोसळले. BSE सेन्सेक्स २४९६.८९ अंकांनी घसरून ७४,२०७.२४ वर बंद झाला, तर NSE निफ्टी ७७५.६५ अंकांच्या पडझडीसह २३,००२.१५ या पातळीवर स्थिरावला.

पश्चिम आशियातील ऊर्जेच्या पायाभूत सुविधांवर वाढलेले हल्ले आणि त्यामुळे पुरवठ्यावर निर्माण झालेले संकट यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर नफावसुलीला पसंती दिली.

HDFC बँक ५ टक्क्यांहून अधिक घसरली

सेंसेक्समधील ३० प्रमुख कंपन्यांपैकी एटरनल, बजाज फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, HDFC बँक, लार्सन अँड टुब्रो आणि बजाज फिनसर्व्ह या समभागांना सर्वाधिक फटका बसला. HDFC बँकेचा शेअर्स ५.१३ टक्क्यांनी कोसळला. बँकेचे अध्यक्ष अतानु चक्रवर्ती यांनी नैतिक कारणास्तव राजीनामा दिल्याने या समभागात मोठी घसरण पाहायला मिळाली.

कच्च्या तेलाच्या दरात भडका

जागतिक तेल बाजारात ब्रेंट क्रूडचा दर ६.७५ टक्क्यांनी वधारून ११४.८ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला. इराणने कतारमधील नैसर्गिक वायू प्रकल्प आणि कुवेतच्या दोन तेल रिफायनरींवर केलेल्या हल्ल्यांनंतर ही दरवाढ झाली आहे. इस्रायलने इराणच्या वायू क्षेत्रावर केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने गुरुवारी सौदी अरेबिया, कतार आणि कुवेतच्या ऊर्जा केंद्रांना लक्ष्य केले, ज्यामुळे जागतिक पुरवठा साखळी धोक्यात आली आहे.

जागतिक बाजारातही विक्रीचे सत्र

आशियाई बाजारात दक्षिण कोरियाचा 'कोस्पी', जपानचा 'निक्केई २२५', चीनचा 'शांघाय कंपोझिट' आणि हाँगकाँगचा 'हँग सेंग' हे सर्व प्रमुख सूचकांक मोठ्या घसरणीसह बंद झाले. युरोपीय बाजारही लाल निशाण्यावर व्यवहार करत होते, तर अमेरिकन बाजार बुधवारी घसरणीसह बंद झाले होते.

एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) बुधवारी २,७१४.३५ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (DIIs) ३,२५३.०३ कोटी रुपयांची खरेदी केली.

शेअर बाजार कोसळण्याची ५ मुख्य कारणे:

१. पश्चिम आशियातील वाढता संघर्ष:

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला आता तीन आठवडे पूर्ण होत आहेत. या भागात होणारे हल्ले आणि प्रतिहल्ले यामुळे अनिश्चितता वाढली असून तेल-वायू पुरवठ्यावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.

२. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ:

वाढत्या तणावामुळे 'वेस्ट टेक्सस इंटरमीडिएट' (WTI) क्रूड ३.१ टक्क्यांनी वधारून ९९.३१ डॉलरवर, तर 'ब्रेंट क्रूड' ४.१ टक्क्यांनी वाढून १११.५९ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे.

३. आशियाई बाजारांतील घसरण:

गुरुवारी आशियाई बाजारांची सुरुवातच मोठ्या घसरणीने झाली. जपानचा निक्केई २.५ टक्के तर कोस्पी २.६ टक्क्यांनी खाली आल्याने भारतीय बाजारावरही दबाव वाढला.

४. फेड रिझर्व्हची कठोर भूमिका (FOMC Meeting 2026):

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर ३.५% ते ३.७५% वर स्थिर ठेवले आहेत. मात्र, महागाई अपेक्षेप्रमाणे कमी होत नसल्याने व्याजदरात कपात होण्याची शक्यता धूसर आहे, असे संकेत जेरोम पॉवेल यांनी दिले आहेत.

५. कॉर्पोरेट घडामोडी:

HDFC बँकेसारख्या दिग्गज कंपनीच्या अध्यक्षांचा राजीनामा यांसारख्या अंतर्गत घडामोडींमुळेही गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा गेला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news