पुढारी ऑनलाईन डेस्क
जागतिक सकारात्मक संकेत आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून होत असलेल्या खरेदीच्या जोरावर भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी (दि.२६) नवे शिखर गाठले. विशेष म्हणजे बाजारात सलग सहाव्या सत्रांत विक्रमी तेजी कायम राहिली. आजच्या सत्रात सेन्सेक्सने ८५,९३० च्या नव्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. तर निफ्टीने आज पहिल्यांदाच २६,२५० चा सर्वकालीन उच्चांक नोंदवला. त्यानंतर सेन्सेक्स ६६६ अंकांनी वाढून ८५,८३६ वर बंद झाला. निफ्टी २११ अंकांनी वाढून २६,२१६ वर स्थिरावला.
आजच्या सत्रात सेन्सेक्सचा ८५,९३० च्या नव्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श.
निफ्टीने पहिल्यांदाच २६,२५० चा सर्वकालीन उच्चांक नोंदवला.
मेटल आणि ऑटो शेअर्स सर्वाधिक तेजीत.
बीएसई मिडकॅप सपाट.
स्मॉलकॅप ०.४ टक्क्यांनी घसरला.
बाजारातील आजच्या वाढीला ऑटो आणि आयटी शेअर्समधील तेजीचा सपोर्ट मिळाला. क्षेत्रीय निर्देशांकात मेटल आणि ऑटो २ टक्क्यांपर्यंत वाढले. एफएमसीजी, PSU Bank प्रत्येकी १ टक्के वाढले. तर कॅपिटल गुड्स निर्देशांकात घसरण दिसून आली. बीएसई मिडकॅप सपाट पातळीवर बंद झाला. स्मॉलकॅप ०.४ टक्क्यांनी घसरला.
बाजारातील विक्रमी तेजीमुळे आज २६ सप्टेंबर रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १.७३ लाख कोटींनी वाढून ४७६.९८ लाख कोटींवर पोहोचले. २५ सप्टेंबर रोजी बाजार भांडवल ४७५.२५ लाख कोटी होते. याचाच अर्थ आज गुंतवणूकदारांनी १.७३ लाख कोटींची कमाई केली.
सेन्सेक्सवर मारुतीचा शेअर्स सर्वाधिक ४.७ टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर बजाज फिनसर्व्ह, एम अँड एम, टाटा मोटर्स, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स सुमारे २ टक्क्यांनी वाढले. बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, नेस्ले इंडिया या शेअर्सही तेजीत राहिले. तर एलटी, एनटीपीसी हे शेअर्स घसरले.
एनएसई निफ्टी ५० वर मारुती, बजाज फिनसर्व्ह, एम अँड एम, टाटा मोटर्स, हिंदाल्को हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर सिप्ला, एलटी, ओएनजीसी, डिव्हिसलॅब, एनटीपीसी हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले.
निफ्टी बँक ५४,४६७ आणि निफ्टी ऑटो निर्देशांकाने २७,५२६ चा सर्वकालीन उच्चांक नोंदवला. निफ्टी बँकवर पीएनबी, एसबीआय, इंडसइंड बँक हे शेअर्स वाढले. तर निफ्टी ऑटोवरील मारुती, Motherson, एम अँड एम, टाटा मोटर्स, आयशर मोटर्स हे शेअर्स २ ते ४ टक्क्यांदरम्यान वाढले.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने नुकतीच व्याजदरात कपात केली आहे. दरम्यान, फेड रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल आज आणखी व्याजदर कपातीबाबत संकेत देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. आशियाई बाजारातील निर्देशांकही आज वाढले होते. जपानचा निक्केई (Nikkei 225 Index) २ टक्के वाढला. तर हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांक ३ टक्क्यांहून अधिक वाढला.
२५ सप्टेंबर रोजी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) ९७३ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांचा खरेदीवर जोर राहिली. त्यांनी याच दिवशी १,७७८ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.